पर्ये भूमिका देवस्थानात तणाव; ३८ जणांवर गुन्हे

कालोत्सवातील मानापमानावरून वाद : दगडफेकीत पोलीस, भाविक जखमी; मोठा पोलीस फौजफाटा तैनात


16th January, 12:10 am
पर्ये भूमिका देवस्थानात तणाव; ३८ जणांवर गुन्हे

देवस्थानच्या प्रांगणात भाविक व पोलिसांमध्ये सुरू असलेली झटापट.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : अनेक वर्षांपासून पर्येतील श्री भूमिका देवीच्या गावकर, राणे व माजिक या महाजन गटांमध्ये धार्मिक हक्कावरून वाद सुरू आहे. बुधवारी देवीचा पारंपरिक कालोत्सव साजरा करण्यावरून अचानक वाद उफाळून आला. यावेळी दगडफेक व हाणामारी झाली. यात गावकर, राणे व माजिक या तिन्ही गटांचे २५ हून अधिक लोक जखमी झाले. १५हून अधिक पोलिसांनाही दुखापत झाली. नंतर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले. रात्री उ‌शिरा पोलिसांनी ३८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
वादावादीचे पर्यवसान हाणामारी, दगडफेेकीत झाले. दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक अनंत गावकर गंभीररीत्या जखमी झाले. जखमी झालेल्या काही भाविक, पोलिसांवर साखळी सरकारी सामाजिक रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. दोघांची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले. सायंकाळी परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी तणावपूर्ण शांतता आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करून पारंपरिक कालोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
माजिक, राणे व गावकर या महाजन गटांमध्ये देवस्थानच्या हक्कावरून तीव्र वाद आहे. यंदा १५ व १६ जानेवारी रोजी पारंपरिक कालोत्सव आयोजित करण्यात आला होता. याला गावकर गटाकडून हरकत घेण्यात आली. गावकर गटाला हक्क बहाल करण्यात येत नाहीत, तोपर्यंत कालोत्सव साजरा करण्यास देऊ नये, अशी मागणी त्यांनी मामलेदारांकडे केली होती. यावर मामलेदारांनी सुनावणी घेऊन सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले; मात्र निर्णय दिला नव्हता.


देवस्थानच्या सभागृहामध्ये निदर्शने करताना गावकर व राणे समाज.
बुधवारी सकाळी कालोत्सवाला सुरुवात झाली. गावकर व राणे महाजन गटाच्या भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात प्रवेश केला असता त्यांना पोलिसांनी मंदिराच्या गर्भकुडीमध्ये प्रवेश करण्यापासून अडविले. यामुळे वाद निर्माण झाला. ते भाविक मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होते; मात्र पोलिसांनी कडे करून त्यांना अडविले होते. यावेळी भाविक व पोलिसांमध्ये झटापट सुरू झाली. उपअधीक्षक जीवबा दळवीही मंदिरात होते. दोन्ही गटांनी मंदिराच्या प्रांगणात ठिय्या मारून निदर्शने केली. देवस्थानात हक्क द्या, आमच्यावर अन्याय करू नका, अशी मागणी ते करत होते. यावेळी अचानक दुसऱ्या गटाने त्यांच्यावर दगडफेक केली व दंडुक्याने मारहाण केली. यामुळे जमाव खवळला तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या हाणामारीत गावकर व राणे गटांच्या सुमारे २५हून अधिक जणांना मार बसला. या धक्काबुक्की, दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाले. निरीक्षक अनंत गावकर यांच्या डोक्याला मार बसल्यामुळे त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले. जखमी भाविकांवर साखळी सामाजिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोघा भाविकांना मात्र पुढील उपचारासाठी गोमेकॉत पाठवण्यात आले.
आमदार देविया राणे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर दुपारी २च्या सुमारास तणाव काही प्रमाणात निवळला. त्यानंतर देवदर्शनाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.
व्हिडिओ, फोटोंच्या आधारे संशयितांना शोधण्याचे प्रयत्न
गावकर व राणे या दोन्ही गटांच्या मंडळींनी सायंकाळी वाळपई पोलीस स्थानकावर मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तणाव निर्माण करणाऱ्या ३८ जणांवर गुन्हे दाखल केले. व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारे संशियाताना शोधण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. बेकायदा जमाव करणे, हिंसक कृती करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आदी कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पोलिसांचा हलगर्जीपणा जबाबदार!
पत्रकारांशी बोलताना गावकर व राणे गटाच्या मंडळींनी सांगितले की, पोलिसांसमक्ष काही भाविकांनी दगडफेक केली व शस्त्रे घेऊन देवस्थान परिसरात प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना अडविले असते तर तणावाची परिस्थिती निर्माण झाली नसती. या परिस्थितीला पोलिसांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कारणीभूत आहे. सरकारने या संदर्भात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी.

पर्ये भागात शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पारंपरिक उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. भाविक देवदर्शन घेत आहेत. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. महाजन गटाच्या हक्कावरून निर्माण झालेले मतभेद व वाद यावर कायदेशीर पद्धतीने तोडगा काढला जाईल. कायद्यानुसार हक्क बहाल करण्यात येतील. झालेल्या घटनेची पोलीस निश्चितच सखोल चौकशी करतील.
_ डॉ. देविया राणे, आमदार, पर्ये