तिस्क-उसगाव, धारबांदोडा पोस्ट कार्यालयांबाबत नागरिकांच्या तक्रारी
फोंडा : तिस्क-उसगाव आणि धारबांदोडा पोस्ट कार्यालयात महाराष्ट्रातील पोस्टमनची भरती केल्यापासून पत्रे मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात पाठवण्यात आलेले पत्रे जानेवारी महिन्यात देण्यात आल्याने स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. वेळेवर लोकांना पत्रे मिळत नसल्याने परीक्षेला उपस्थित राहण्याची संधी युवकांची हुकली आहे. त्यामुळे पोस्ट कार्यालयातील व्यवहार सुधारण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे .
पोस्ट कार्यालयात महाराष्ट्र राज्यातील युवकांची नोकर भरती केल्यामुळे स्थानिक पोस्टमन असलेल्या अनेकांना घरी राहण्याची वेळ आली होती. स्थानिक पोस्टमनाद्वारे लोकांना वेळेवर पत्रे मिळत होती. पण गेल्या एक-दोन वर्षापासून पोस्ट कार्यालयात महाराष्ट्र राज्यातील युवकांची भरती केल्यामुळे लोकांना वेळेवर पत्रे मिळत नाही. नोव्हेंबर महिन्यात पाठवण्यात आलेली पत्रे लोकांना जानेवारी महिन्यात मिळत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. काही खासगी कंपन्याकडून पाठवण्यात आलेल्या पत्रांचाही यात समावेश आहे. उशिरा पत्रे मिळत असल्याने अनेक युवक परीक्षेत पोहचले नसल्याने बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे.
तिस्क -उसगाव येथील पोस्टमन म्हणून एका युवतीची नियुक्ती करण्यात आली आहे. पण त्या युवती सोबत लोकांना पत्रे देण्यासाठी एक वृद्ध पाहिला फिरत असल्याचे दिसून येत आहे. पत्रे देण्यासाठी फिरत असताना युवतीबरोबर फिरणाऱ्या वृद्ध महिलेकडून लोकांना उलट -सुलट उत्तरे मिळत आहेत. वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाेस्टमनचा कारभार संशयास्पद
तिस्क - उसगाव परिसरातील पोस्टमनचा कारभार सध्या संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे. दोन-तीन महिन्यापूर्वी पोस्टामधून पाठविण्यात आलेला एका व्यक्तीचा एक धनादेश गायब होण्याचाही प्रकार उघडकीस आला होता. धनादेश पोस्ट कार्यालयात पोहोचला आणि त्यानंतर धनादेश त्या व्यक्तीच्या स्वाधीन केल्याचा संदेश मोबाईलवर आला. पण प्रत्यक्षात संबंधिताला धनादेश मिळालाच नसल्याने, धनादेश गायब झाल्याचा आरोप संबंधिताकडून केला जात आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.