पणजी : बायंगिणी कचरा प्रकल्प संपूर्ण तिसवाडी तालुक्यासाठी उपयुक्त असून हा प्रकल्प होणारच, असे कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यानी स्पष्ट केले आहे. एकंदरीत दर वाढल्याने प्रकल्पाची निविदा नव्याने जारी केली जाणार आहे. निविदा जारी होउन ऑगस्टपर्यंत काम सुरू करण्यात येईल, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यानी सांगितले.
कचरा व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीनंतर बोलताना मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पर्यावरण खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा व इतर अधिकारी उपस्थित होते.
बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा यापूर्वीच सर्व मान्यता मिळालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही विरोधातील याचिका फेटाळलेल्या आहेत. यामुळे आता प्रकल्पाला विरोध करण्यात काही अर्थ नाही. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येईल, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.
प्रकल्पाचा आराखडा तयार करून निविदा तीन वर्षांपूर्वी जारी झाली होती. निविदा जारी होऊनही तेव्हा काम सुरू झाले नाही. आता दर वाढलेले आहेत. यामुळे नव्याने निविदा जारी केली जाईल. दोन महिन्यात निविदा जारी होऊन ऑगस्टपर्यंत कामाला सुरवात होणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास अंदाजे दोन वर्षे लागतील. भारतीय पुरातत्व विभाग तसेच सर्व यंत्रणांनी कचरा प्रक्रीया प्रकल्पाला मान्यता दिली आहे, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.
सोनसोडो जवळ बसून जेवण करणेही शक्य
सोनसोडोतील कचऱ्या बाबत आता कोणतीही समस्या नाही. सोनसोडो जवळ बसून जेवण करणेही शक्य आहे. एक माशीही येथे फिरकणार नाही, अशी प्रतिक्रीया मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सोनसोडो बाबत बोलताना दिली