बेळगाव : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झालेल्या मुलीचा गैरफायदा घेत तिच्यासह अन्य एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सवसुद्दी गावानजीक असलेल्या डोंगराळ भागात घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याप्रकरणात तिघांचा समावेश असल्याची बाब देखील समोर आली असून या नराधमांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अभिषेक, आदिल जमादार आणि कौतुक बडिगेर अशी या तिघांची नावे आहेत.
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या प्रकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेकची एका मुलीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. मागे एक दिवस त्याने या मुलीला आपण सौंदत्तीला जात असल्याचे सांगितले. सदर मुलीने देखील सोबत येण्यात होकार दिला. या मुलीने आपल्यासोबत अन्य एका मुलीला देखील घेतले होते. दोघीही बसस्थानकाकडे गेल्या. येथे त्यांना अभिषेक भेटला. अभिषेक हा अर्टिगा कार घेऊन आला होता, दोघी मुली कारमध्ये बसल्या. यावेळी कारमध्ये अन्य तिघेजण होते.
दरम्यान चालकाने गाडी रायबाग तालुक्यातील सवसुद्दी गावाजवळील डोंगराळ भागाकडे वळवली. दुपारी या मुलींवर तिघा नराधमांनी अत्याचार केला. तक्रारदार मुलीवर अभिषेक आणि चालक कौतुक बडीगेर यांनी तर गाडीतील मुलीवर आदिल जमादार याने बलात्कार केला. यादरम्यान आरोपींनी आपल्या मोबाइलवर व्हिडिओ देखील बनवला. पुढे त्यांना ब्लॅकमेल करत गोव्यात येणास सांगितले. पीडित मुलींनी याबाबत घरी माहिती दिली. त्यानंतर काल १३ जानेवारी रोजी पीडित मुलीने तिच्या चुलत भावासह हारुगेरी पोलीस स्थानकात येत तक्रार नोंदवली. तक्रार दाखल करत अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली.