पहाटे भररस्त्यात दर्शन : स्थानिकांत भीती
शहरातील मुख्य रस्त्यावर दिसून आलेला गवा.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : शहरात मंगळवारी रात्री गव्याने प्रवेश केल्याने सर्वांची तारांबळ उडाली. फोंडा अग्निशामक दलाच्या जवळून गव्याने शहरात प्रवेश केला. गेल्या सोमवारी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान तो पेट्रोल पंपाजवळ फिरत असल्याचे आढळून आले होते.
मंगळवारी रात्री वारखंडे येथे अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळून अचानक गवा मुख्य रस्त्यावर प्रकटला. त्यावेळी रस्त्यावरील वाहतूकदारांनी सावधगिरी बाळगून वाहने पुढे नेली. काही ग्रामस्थांनी व्हिडिओ काढून व्हायरल केले. रात्री ११.३० च्या सुमारास घडलेला प्रकार सर्वत्र पसरला. गव्याने मुख्य रस्त्यावरून वरच्या बाजाराच्या दिशेने धूम ठोकली. त्यावेळी वन खात्याच्या काही कर्मचाऱ्यांनी बाजारात धाव घेऊन गव्याची पाहणी केली.
रात्रीची वेळ असल्याने बाजारात सामसूम होती. काही वाहनचालक ये-जा करत असल्याने त्यांना गव्याचे दर्शन घडले. या गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शहर परिसरातच ठाण मांडल्याचा संशय
गेल्या सोमवारी पहाटे ४ ते ५ या वेळेत गवा वरच्या बाजारात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ आढळून आला होता. परिसरात असलेल्या अनेक दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये गवा कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात गवा शहराच्या परिसरात ठाण मांडून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.