बायंगिणी कचरा प्रकल्पावरून मंत्री-आमदार आमनेसामने

प्रकल्प होणारच : बाबूश; प्रकल्प होऊ देणार नाही : आमदार फळदेसाई


16th January, 12:02 am
बायंगिणी कचरा प्रकल्पावरून मंत्री-आमदार आमनेसामने

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बायंगिणी कचरा प्रकल्पावरून आता कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात आणि स्थानिक आमदार राजेश फळदेसाई आमनेसामने उभे ठाकले आहेत. मंत्री मोन्सेरात यांनी प्रकल्पासाठीची निविदा नव्याने जारी करण्यात येणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. त्याबरोबर आमदार फळदेसाई यांनी कोणत्याही स्थितीत बायंगिणीत कचरा प्रकल्प होऊ देणार नसल्याचे सांगितले.
बायंगिणी कचरा प्रकल्प तिसवाडी तालुक्यासाठी उपयुक्त असून तो होणारच, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. दर वाढल्याने प्रकल्पाची निविदा नव्याने जारी केली जाणार आहे. ऑगस्टपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे, असेही मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पर्यावरणमंत्री अालेक्स सिक्वेरा व अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाला यापूर्वीच सर्व मान्यता मिळाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही विरोधातील याचिका फेटाळल्या आहेत. यामुळे आता प्रकल्पाला विरोध करू नये. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सर्व ती काळजी घेण्यात येईल, असे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.


प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते : राजेश फळदेसाई
बायंगिणी कचरा प्रकल्पाला जुने गोवे पंचायतीसह स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. हा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूर्वीच दिले आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी हा मुद्दा उकरून काढून जुने गोवे परिसरातील लोकांना पुन्हा रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये, असे आमदार राजेश फळदेसाई यांनी म्हटले आहे.
सोनसडोजवळ बसून जेवण करणेही शक्य
मडगाव नजीकच्या सोनसडो कचरा प्रकल्पाबाबत आता कोणतीही समस्या राहिलेली नाही. सोनसडोजवळ बसून आता कोणालाही जेवण करणेही शक्य आहे. एक माशीही जवळ फिरकणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सोनसडोबाबत बोलताना दिली.