मुलांनी फॅशन, टाईमपास म्हणून परीक्षांना बसू नये

अभ्यासक्रम कसा आटोक्यात आणावा, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, टाइम टेबल व अभ्यासाचे विषय यांची सांगड कशी घालावी, किंबहुना परीक्षेत जर यश मिळवायचे असेल तर नेमके काय करायला हवे? पाच दिवस सखोल या सर्वांची चर्चा झाली.

Story: यशस्वी भव: |
12th January, 03:28 am
मुलांनी फॅशन, टाईमपास म्हणून परीक्षांना बसू नये

गेल्या तीन महिन्यांमध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना जीपीएससी संदर्भात मार्गदर्शन केले. फोंड्यातील जीपीएससी विषयातील कोच प्रा. उमेश दाणी यांच्या मदतीने प्री-क्लिनिंग, तसेच स्क्रीनिंग, जे.एस.ओ., मामलेदार, सब रजिस्ट्रार, बीडिओ या पदांसाठी भरवण्यात येणाऱ्या परीक्षणाच्या अभ्यासक्रमाचा तीन तासांच्या कार्यक्रमात बराच ऊहापोह झाला. सिलॅबस अर्थात अभ्यासक्रम कसा आटोक्यात आणावा, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, टाइम टेबल व अभ्यासाचे विषय यांची सांगड कशी घालावी, किंबहुना परीक्षेत जर यश मिळवायचे असेल तर नेमके काय करायला हवे? पाच दिवस सखोल या सर्वांची चर्चा झाली. 

पाचशेपैकी चुणचुणीत असे ५० ते ६० युवक-युवती शोधता आले. त्यांच्यातील गुणदोष हेरत आले. अनेक जणांनी उत्तम संवाद साधला. मुद्देसूद उत्तरे दिली. त्यांची बॉडी लँग्वेज उत्तम होती. थोडी जरा शिस्तबद्ध तयारी केली तर जीपीएसच काय, यूपीएससी सुद्धा ही मंडळी क्रॅक करू शकतात अशी खात्री वाटली. 

या पाचशे लोकांचा आम्ही पुढे एक व्हाट्सअप ग्रुप केला. ग्रुपवरील खूपशा मुलांना आगामी काळात येणाऱ्या संभाव्य परीक्षांबद्दल अतिउत्सुकता होती. त्यांचे ग्रुपवर प्रश्न असायचे की परीक्षा कधी आहे? किती वाजता आहे? फ्री स्क्रीनिंगमध्ये फिजिकल फिटनेस टेस्ट आली आहे? मध्ये आहे? की नंतर आहे? कट ऑफ किती आहे? असे अनावश्यक प्रश्न जास्त विचारत होते. गंमत म्हणजे ते सर्व परीक्षांना बसत होते पण कोणाची दहा टक्के सुद्धा अभ्यासाची तयारी झालेली नव्हती. 

या परीक्षांना बसण्याला काय अर्थ आहे? अभ्यासातील विषयाबद्दल विचारले तर त्यांना काहीच येत नव्हते मग नुसते फॅशन म्हणून बसण्याला काहीच अर्थ नाही. तयारी करायची नाही आणि उगाच गर्दी वाढवायची आणि जी मुले मनापासून तयारी करत आहेत त्यांना नकारात्मकता दाखवायची. हे योग्य नव्हे. जे विद्यार्थी जे.एस.ओ. या परीक्षेला बसत होते त्यांना साधी गुजरात राज्याची राजधानी देखील कोणती आहे हे ठाऊक नव्हते. 

प्री स्क्रीनिंग यामुळेच खूप महत्त्वाची आहे. योग्य नियोजन केलेले, अभ्यास केलेले विद्यार्थी ही परीक्षा सहजरित्या पास होतात त्यामुळे फॅशन म्हणून कोणीही या परीक्षांना बसू नये. नीट अभ्यास करावा. यश नक्कीच मिळेल.


अॅड. शैलेश कुलकर्णी, 
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)