कार्तिक द्वादशीला तुळशी विवाह होताच, गोव्यात लग्नसमारंभांना सुरुवात होते. तीन दिवसांच्या या सोहळ्याची सुरुवात 'दिवा दाखवणे' या विधीने होते, ज्यात 'लामण दिवा' माटवामध्ये टांगला जातो. हा दिवा म्हणजे मंगलकार्याचा आरंभ.

गोव्यात कार्तिक द्वादशी दिवशी तुळशी विवाह होतो आणि त्यानंतर गोव्यात लगीनघाई सुरू होते. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत गोव्यात लग्न समारंभ होत नाही. कार्तिक द्वादशी दिवशी तुळशी मातेवर मंगलाष्टका पडतात आणि विवाह-इच्छुक मुलामुलींच्या घरी मंगल कार्याची तयारी होऊ लागते.
गोव्यातील विवाह सोहळा हा तीन दिवसांचा असतो. पहिला दिवस 'दिवा दाखवणे', दुसरा दिवस 'हळद समारंभ' आणि तिसरा दिवस 'विवाह समारंभ'. यात पहिल्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी वधू आणि वर या दोघांच्याही घरी मंडप म्हणजेच मांडव उभारून संध्याकाळी 'मंडप देवते'चे पूजन होते. मंडप देवतेच्या पूजनापूर्वी गोव्याचे 'दायज' असलेला 'लामण दिवा' माटवामध्ये टांगला जातो. या दिव्याच्या पूजनानेच मंगल कार्याची सुरुवात केली जाते. सनातन संस्कृती आणि प्रकाशाचे किती जिव्हाळ्याचे नाते आहे, हे इथे पुन्हा एकदा अधोरेखित होते. लग्न समारंभाच्या प्रत्येक विधीवेळी घरणीबाई त्याचे महत्त्व आपल्या ओव्यांमधून व्यक्त करताना दिसते.
'दिवा दाखवण्या'च्या दिवशी वधूच्या हातावर मेहंदी काढली जाते. तिला सौभाग्यालंकारानी सौभाग्यालंकारांनी सजवले जाते. हे सौभाग्यालंकार घालताना घरणीबाई दिवा दाखवतानाचे गीत गाऊ लागते. तेच हे गीत. विवाह-इच्छुक नवरदेव मुलगा आपल्या पालकांसोबत या दिव्याच्या शोधात कुठे-कुठे जातो, वाटेत त्याला काय भेटते हे सांगताना घरणीबाई म्हणते:
तानलाडू भूकलाडू
बांदले शेल्या पदरी
चाल केली नगरी
काय गिरजे तीरी
गिरजे तिरीच्या बाजारा
आम्हा लागली गराज
काशा शिसयाची
एक मणू कासा शिसा
दोन मणू इंगळे
गनिस देवाचे साळेक
दिवा घडईला
घडप्याने घडईला
वतयानी वतयीला
चितयांनी चितयीला
दोन गे ताटीचो
धाई गे वातीचो
सोबत इनीयेचो
दिवो घडईलो
लग्न ठरलेला नवरदेव दिव्याच्या शोधात 'तान लाडू भूक लाडू' ची शिदोरी गाठीस बांधून पायी चालत जात असताना गिरिजा नदीच्या काठी असलेल्या नगरामध्ये पोहोचतो. त्या नगरामध्ये त्याला 'काशा' आणि 'शीशा' हे धातू मिळतात. एक मन 'काशा' 'शीशा' आणि दोन मन 'इंगळे' म्हणजेच कोळसे घेऊन त्यापासून प्रत्यक्ष श्री गणरायाच्या शाळेमध्ये सुंदर दिवा तयार होतो. 'गिरीजा' म्हणजे पार्वती. गिरिजा नदीच्या काठी वसलेल्या नगरामध्ये श्री गणरायाचे अधिपत्य असून, त्याच्या शाळेत लग्नाचा दिवा तयार होतो, अशी कल्पना घरणीबाई करत असताना तिच्या तल्लख प्रतिभेची कल्पना येते.
हा दिवा 'घडप्याने' म्हणजे आकार देणाऱ्याने त्याला आकार दिला. 'वतायाने वताईला' म्हणजे दिव्याला सुशोभित केले आणि 'चित्ता' यांनी 'चित्तायला' म्हणजे दिव्यावर सुंदर असे नक्षीकाम केले. प्रत्यक्ष गणेश देवाच्या शाळेमध्ये तयार झालेला हा दिवा दिसायला कसा आहे याचे वर्णन करताना घरणीबाई सांगते: दोन ताटीचा आणि दहा वातीचा असा हा सुंदर दिवा ज्याला सोबत इनीयेचो म्हणजेच सुंदर अशी साखळी आहे, ज्या साखळीच्या मदतीने दिवा मांडवाला टांगला जातो.
असे म्हटले जाते की, विवाह समारंभात अठरा पगड जातींचा हातभार लागतो. आपल्या समाजामध्ये सध्या जाती-जमातीवरून अनेक वादविवाद होताना दिसून येत असले तरी पूर्वीच्या काळी या प्रत्येक माणसाच्या हातभाराशिवाय कोणतेही मंगल कार्य पूर्ण होताना दिसत नव्हते. प्रत्येक जाती-जमातीला समान महत्त्व होते. या दिव्याच्या गीतामध्येसुद्धा आपल्याला ते दिसून येते. लग्न म्हटल्यावर लग्नासाठी लागणारे सामान आणण्यासाठी दिवा त्या त्या माणसांच्या घरी जाऊन तिथे असलेल्या वस्तूवर प्रकाश टाकतो, हे सांगताना घरणीबाई गाते:
थयसून दिवा
चाली गेला
कुमारच्या घरी गेला
कऱ्याच्या वझ्यार
तेंनी उजवोड केला....
घरात कुमार शृंगरिता
कऱ्याचा वजा घेऊन
देव सैवाराक येता....
गणेश देवाच्या शाळेमध्ये घडलेला दिवा कुंभाराच्या घरी जातो. कुंभाराच्या घरी लग्नासाठी लागणारे 'करे' (मातीची भांडी) असतात. त्या कऱ्यांवर तो प्रकाश टाकतो आणि त्या कऱ्यांचे ओझे घेऊन नवरदेव 'सैवाराक' म्हणजेच स्वयंवराला जातो. म्हणजेच लग्न पार पाडण्यासाठी जातो.
थयसून दिवा
चाली गेला
कासाराच्या घरी गेला
हातातल्या चुड्यार
तेंनी उजवोड केला....
घरात कुमार शृंगरिता
चुड्याचा वजा घेऊन
देव सैवाराक येता....
पुढे 'करे' घेऊन दिवा कासाराच्या घरी जातो. लग्नासाठी लागणारा चुडा घेऊन स्वयंवराला येतो.
अशाप्रकारे दिवा लग्नासाठी लागणारे प्रत्येक सामान आणण्यासाठी त्या त्या कारागिराच्या घरी जातो. 'गावकऱ्याच्या' घरी जाऊन पाटा, वल्ली, पंखे इत्यादी सामान घेऊन येतो. 'तेलीयाच्या' घरी जाऊन तेल घेऊन येतो. 'फुलकाराच्या' घरी जाऊन फुले आणतो. 'विणकाराच्या' घरी जाऊन 'साडा' आणतो. शेवटी सोनाराच्या घरून पायातील वेढे आणि गळ्यातील मणी घेऊन येतो:
थयसून दिवा
चाली गेला
सोनाराच्या घरी गेला
गळ्यातल्या मण्यार
तेंनी उजवोड केला....
घरात कुमार शृंगरिता
गळ्यातलो मणी घेऊन
देव सैवाराक येता....
अशाप्रकारे लग्नासाठी लागणारे सगळे सामान गोळा केल्यानंतर दिवा मांडवाच्या दारी परत येतो. तिथे आल्यावर सुंदर असा मांडव बघून दिवा उल्हासतो, संतोषतो आणि मांडवाचे प्रवेशद्वार प्रकाशमान करतो.
थयसुन दिवा चाली गेला
माटवाचे दारी आला
माटवाचे परी पाहून
दीवा संतोषला
वरील गीतामध्ये लग्नासाठी लागणाऱ्या प्रत्येक प्रतिमांचा उपयोग करून सुंदर असे गीत घरणीबाईने ओवीबद्ध केले आहे. हे गीत चालू असताना ज्या ज्या अलंकारांच्या वस्तूंची नावे घेतली जातात, त्या त्या वस्तू नवरी मुलीच्या अंगावर चढवल्या जातात. अत्यंत खेळीमेळीमध्ये तिला पूर्ण सजवतात. फक्त गळ्यातला मणी आणि 'माटव डाऊल' तेवढे लग्नाच्या दिवशी घालतात.
दिवा मांडवाला चढवल्यानंतर वधू किंवा वरासह मान-पानाप्रमाणे प्रत्येक जण दिव्याला हळदी-कुंकू, अक्षता, पुष्प अर्पण करतात. सर्वात शेवटी नवरदेवाच्या घरीही अशाच प्रकारे दिवा दाखवण्याचा पहिला दिवस सरतो आणि मंगल कार्यांच्या उत्सवाला सुरुवात होते.
सनातन संस्कृतीने प्रकाशाचे आणि दिव्याचे महत्त्व जाणूनच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात दिवा प्रकाशमान करून केली जाते. याला लग्नासारखे मंगल कार्य अपवाद कसे असणार? ज्याप्रमाणे दिवा उजळताच अंधार चिरून प्रकाश पसरतो, हाच प्रकाश वर-वधूच्या जीवनामध्ये पसरून त्यांचा संसार प्रकाशमान व्हावा, हीच इच्छा या विधीनिमित्त प्रत्येकाच्या मनात असते.
ना जातीचे बंधन, ना सान-थोरांची गणना. पूर्वी लग्नामध्ये गावातील प्रत्येक घर आनंदाने सहभागी व्हायचे. त्यामुळे लग्नघर जरी फक्त एक असले तरी सोहळा सबंध गावाचा असायचा. गाव ह्या अशाच सोहळ्यांनी एकमेकांशी बांधून असायचा. आपल्याला कधीतरी गावातील कोणाला तरी कोणाची गरज लागेल ही भावना आत कुठेतरी असल्यामुळे भांडण-तंटेही कमी किंवा क्षणिक असायचे. आज आपल्याकडे सर्व काही आहे पण ही संस्कृती जपून धरणारी मने मात्र विरळ होताना दिसत आहेत.

गाैतमी चाेर्लेकर गावस