शिक्षिकेच्या हातातले सोन्याचे काकण हे केवळ दागिना नसून, ते तिच्या आठवणी, पहिल्या मैत्रिणीचा आणि तिच्या स्वतःच्या आयुष्यातील तीव्र संघर्षाचे प्रतीक होते. कष्ट, त्याग आणि निस्वार्थ प्रेमाची ही एक हृदयस्पर्शी कहाणी.

शाळेत एका मुलीने विचारलं: “मॅडम, मी तुम्हाला कित्येक वर्षांपासून बघतेय. तुमच्या हातात हे सोन्याचं काकण कायम असतं. तुम्ही ते कधी बदलत नाही.”
संपूर्ण वर्ग शांत झाला. शिक्षिकेच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. तिने काकणाकडे पाहिलं; डोळ्यांत पाणी दाटलं. काही न बोलता ती फक्त हसली आणि शिकवण पुढे चालू ठेवली.
त्या दिवशी घरी जाताना ती नदीकाठी थांबली. पाण्यात पाय बुडवत आकाशाकडे पाहिलं आणि भूतकाळात हरवली - तिच्या पहिल्या मैत्रिणीच्या आठवणीत...
तिच्या मैत्रिणीचं आयुष्य म्हणजे लालसर माती, खाणी, घाम आणि धूळ. गरीब घर, पण गाण्यांनी भरलेलं मन. बारा वर्षांची होताच वडिलांचा मृत्यू झाला. आईवर सगळा भार आला. खाणीवर, शेतात, मजुरीवर काम करावं लागलं. ती लहान असूनही आईसोबत पाण्याचे हंडे भरायची. काही वर्षांनी तिचं लग्न एका साध्या, प्रामाणिक मुलाशी झालं.
सुरुवातीचे दिवस सुखाचे होते. नवरा प्रेमळ होता; पण सासू कटकटीची. ती शांत राहिली. नवरा पोलिसात भरती झाला, पण त्याच वेळी गावात रोगराई पसरली. शेत नापीक झालं, जंगलं संपली, उपासमार वाढली. अशातच नवऱ्याचं पत्र आलं, “एक वर्ष पगार मिळणार नाही.” ती कोसळली, पण धीर धरून म्हणाली, “खनिजावर कामाला जाते.” सासूने तिला रोखलं नाही, फक्त म्हणाली, “घरचं काम करून मग जा.” ती शांतपणे सगळं सांभाळू लागली.
वर्षभरानंतर नवरा परतला. हातात छोटीशी पिशवी, फार काही नव्हतं. “सगळा पगार उधारीला गेला,” तो म्हणाला.
ती हसली. एका वर्षानंतर ती आई झाली, पण बाळ वाचलं नाही. त्या रात्री ती देवाला विचारत होती, “माझं काय चुकलं?” आणि रडू लागली.
काही दिवसांनी त्याची आई गेली. तो तिला म्हणाला, “इथे थांबू नकोस, शहरात चल. माझ्या पोस्टिंगनुसार आपण राहू.” त्यांनी शहरात संसार मांडला. दोन वर्षांनी मुलगा, नंतर मुलगी झाली. संसार कसाबसा चालला.
एक दिवस तो म्हणाला, “तुझ्या वडिलांना तुला लग्नात काकण द्यायचं होतं ना? त्यांना ते जमलं नाही आणि मला पण जमलं नाही.” विषय बदलत ती म्हणाली, “काळजी नको. माझ्याकडे एक काम आलंय.” तिने नवजात बाळांना आणि त्यांच्या आईंना तेल लावण्याचं काम सुरू केलं.
त्याने विचारले, “काय घेणार आहेस पैसे साठवून, काकण?”
ती हसली, “नाही रे, मुलीच्या लग्नाला उपयोगी येतील.”
नंतर तो म्हणाला, “आता सेवानिवृत्तीपूर्वी मुलीचं लग्न करू.” त्यांनी साधेपणाने लग्न केलं. त्याच वर्षी मुलाने स्वतः पसंत केलेल्या मुलीशी लग्न केलं आणि वेगळा राहू लागला. दोघं वृद्ध एकमेकांचा आधार बनून राहिले. निवृत्तीवेतन मिळू लागले.
चार वर्षांनी तो सराफाकडे गेला. घरी परतताना अचानक कोसळला. रुग्णालयात नेलं; पक्षाघात झाला होता. डॉक्टर म्हणाले, “उपचारांसाठी दोन-तीन महिने लागतील.” मुलगा खर्चाच्या भीतीने पळून गेला. ती त्याच्याजवळ उभी होती. त्याचा हात खिशाकडे गेला. तिने हात घालून पाहिलं - सोन्याचं काकण!
ती रडत म्हणाली, “मी पैसे आणते.” ती थेट सोनाराकडे गेली. सगळं सांगितल्यावर शंभू सोनार म्हणाला, “हे काकण मी परत घेऊ शकत नाही. हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. पण पैशांची गरज असेल तर मी देतो.”
ती म्हणाली, “मला उसने पैसे नकोत.”
तो म्हणाला, “ठीक आहे, हे काकण मी ठेवतो. जमेल तेव्हा पैसे द्या.”
तिने उपचार केले. तो बरा झाला. आता दोघं गावाकडे राहायला गेले. नातवंडं येऊ लागली.
एक दिवस नातीने विचारलं, “आजी, गोष्ट सांग ना.”
आजी म्हणाली, “तुला माझ्या आवडीच्या काकणाची गोष्ट सांगते.”
गोष्ट ऐकून नात म्हणाली, “आजी, मी
काम करायला लागले की ते काकण तुला आणते.”
आजी हसत म्हणाली, “नको गं, ते काकण मीच आणलंय. तुझ्या लग्नात तुला दाखवते.”
तेवढ्यात पाऊस सुरू झाला. वीज चमकली. नात तिला बिलगली.
नदीकिनारी बसलेली शिक्षिका आपल्या हाताकडे पाहत होती. तेच ते काकण तिच्या हातात चमकत होतं. तिला जाणवलं - जणू तिची आजी पुन्हा तिच्या समोर उभी आहे.

स्नेहा बाबी मळीक