'जैवविविधता हॉटस्पॉट' पश्चिम घाट हा रंगीबेरंगी आणि अनोख्या फुलांचा खजिना आहे. कास पठारापासून ते मांसाहारी वनस्पतींपर्यंत, पश्चिम घाटातील प्रत्येक फूल निसर्गाच्या अद्भुत रहस्यांची गाथा आहे.

'जैवविविधता हॉटस्पॉट' म्हणून प्रचलित असलेला पश्चिम घाट, फक्त दाट अरण्ये, धबधबे किंवा दुर्मिळ प्राण्यांसाठीच नव्हे, तर असंख्य रंगीबेरंगी आणि अनोख्या फुलांसाठीही जगप्रसिद्ध आहे. पश्चिम घाटातील फुलं इतकी रहस्यमय आहेत की रहस्य ऐकून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू सारख्या राज्यांत पसरलेला पश्चिम घाट हा निसर्गाचा जणू खजिनाच, तर त्या पश्चिम घाटातील फुलं म्हणजे या जैवविविधतेचं सौंदर्यपूर्ण रूप.
साताऱ्याजवळील कास पठार हा महाराष्ट्राचा अभिमान. पावसाळा ओसरल्यानंतर संपूर्ण पठार जणू रंगीत गालिच्याने मढले जाते. कधी जांभळा, कधी पिवळा, कधी गुलाबी. मातीतील आर्द्रता, तापमान आणि सूर्यप्रकाशाच्या प्रमाणावर हा बदल अवलंबून असतो. कास पठारावरील युट्रिक्युलारिया (Utricularia) नावाचे एक सूक्ष्म जांभळे फूल फक्त ३ ते ४ तासांपुरतेच फुलते व दुपारपर्यंत ते कोमेजून जाते. तरीही त्याच्या बीजांमधून पुढच्या वर्षी पुन्हा नवजीवन फुलते.
पश्चिम घाटात केवळ सुगंधीच नव्हे, तर मांसाहारी फुलझाडेही आढळतात. ड्रोसेरा इंडिका (Drosera indica) या वनस्पतींच्या पानांवर चिकट थेंब असतात. हे थेंब लहान कीटकांना आकर्षित करून त्यांना पकडतात आणि गिळून टाकतात. इम्पॅशियन्स मिनोरा (Impatiens minor) ही फुले अत्यंत ओलसर वातावरणातच फुलतात. त्यामुळे या फुलांवरून त्या परिसरातील आर्द्रतेचा अंदाज लावता येतो.
अनेक फुले परागकण वाहकांना (जसे मधमाशा, फुलपाखरे) आकर्षित करण्यासाठी सुगंध वापरतात, पण पश्चिम घाटातील काही फुले सुगंध नसतानाही केवळ रंगांच्या बदलाने संवाद साधतात. स्टोबिलॅन्थस (Strobilanthes) या जातीची फुले काही वर्षांनी एकदाच फुलतात आणि नंतर कोमेजतात. त्यांच्या फुलण्याच्या वेळी निळ्या-जांभळ्या रंगाची झळाळी संपूर्ण डोंगररांगा उजळवते. पश्चिम घाटात काही फुले अशीही आहेत, जी अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेली आहेत. कॅलोट्रोपिस गिगांटिया (Calotropis gigantea) हे असेच एक नाव. कॅलोट्रोपिस गिगांटिया (रुई) सारख्या फुलाच्या दुधाळ रसाचा वापर पारंपरिक औषधांमध्ये केला जातो.
पश्चिम घाटाचे जैववैविध्यपूर्ण हृदय गोवा, केवळ समुद्रकिनारे, किल्ले आणि पर्यटनस्थळांनी नव्हे तर निसर्गाच्या उंच रांगा, झरे, झाडे आणि दुर्मिळ फुलांनी सजलेला स्वर्ग आहे. काही फुलं तर शतकानुशतकांपासून या डोंगरांवर शांतपणे उमलत आहेत. पश्चिम घाटात फुलणारे प्रत्येक फूल हे निसर्गाचे अनमोल रत्न आहे.
पश्चिम घाटातील गावांमध्ये फुलं ही जीवनाचा एक भाग असतात. गावातील देवळांमध्ये रोज फुलांची पूजा केली जाते. सण, लग्न आणि पारंपरिक नृत्यांमध्ये फुलांच्या माळा, गजरे, तोरणांचा वापर केला जातो. धालो, शिगमो अशा सणांमध्ये तर स्थानिक फुलांचा वापर आवर्जून केला जातो. ही फुलं केवळ रंगबेरंगी आनंद नसून गोव्याच्या निसर्ग, संस्कृती आणि जीवनाशी असलेल्या नात्यांचे दर्शन आहे.
काही फुलं अशीही आहेत, जी फक्त गोव्याच्या जंगलातच उमलतात. उदाहरणार्थ, कारवी (Strobilanthes callosa) हे फूल गोव्यातील उंच डोंगराळ भागात आढळते. या फुलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते दर आठ वर्षांनी एकदाच फुलते. फुलताना संपूर्ण डोंगर रांगा जांभळ्या रंगाच्या गालिच्यासारख्या भासतात.
फुले ही केवळ रंग, सुगंध आणि सौंदर्यापुरती मर्यादित नसून ती निसर्गाचा समतोल राखून ठेवण्यासही महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक फुलामागे पर्यावरणीय चक्राचा एक महत्त्वाचा धागा लपलेला असतो. फुले आणि त्यांच्याशी संबंधित वनस्पती जैवविविधतेचा पाया आहेत. जंगलातील मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि झाडे फुलांद्वारे बीजे निर्माण करून पसरवतात. फुलझाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि प्राणवायू सोडतात. फुलझाडांच्या मुळांमुळे जमिनीचा धूप रोखला जातो, पावसाचे पाणी जमिनीत साठते आणि जलचक्र सुरळीत राहते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या सर्व नैसर्गिक क्रिया महत्त्वाच्या असतात.
पश्चिम घाटातील अनेक फुलांच्या जातींना मानवी हस्तक्षेप, वनोत्पादन, पर्यटन व हवामानबदल यामुळे धोका निर्माण झाला आहे. युनेस्कोच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जवळपास १०% स्थानिक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फुलांचा हा निसर्गसंपदा वारसा टिकवण्यासाठी संवर्धन, संशोधन आणि जनजागृती आवश्यक आहे.

स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)