मुख्य संशयित अजूनही फरार : उमाकांत यांच्यावर अंत्यसंस्कार

पेडणे :उमाकांत खोत यांच्या जमीन वादातून झालेल्या खूनप्रकरणी मांद्रे पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. मात्र, या प्रकरणातील मुख्य संशयित जमीनमालक अशोक कुमार नेदुरुमली अद्याप फरार आहे. उमाकांत यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वरचावाडा मोरजी येथील ज्येष्ठ नागरिक उमाकांत खोत यांचा जमीन वादातून खून झाला होता. मांद्रे पोलिसांनी जमीन मालक अशोक कुमार नेदुरुमली, सुपरवायझर लोकेश पट्टा स्वामी, जेसीपी ऑपरेटर रोहित कुमार प्रजापती व विजी सुप्पन यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता तिघांना १४ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. मात्र, मुख्य संशयित जमीन मालक अशोक कुमार नेदुरुमाली फरार आहे.
उमाकांत खोत यांच्या मृतदेहावर वरचावाडा मोरजी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उमाकांत यांच्या पश्चात पत्नी, दोन अविवाहित मुली व एक अविवाहित मुलगा असा परिवार आहे.
उमाकांत खोत यांची कुळाची असलेली जमीन अशोक कुमार यांनी जमीन मालकाकडून परस्पर विकत घेतली होती. परंतु जमीन मालकाने कुळाला विश्वासात न घेता जमीन विकली. शिवाय कुळाच्या जमिनीत बेकायदेशीर रस्ता केला. या संदर्भात उमाकांत खोत यांनी गेल्या वर्षापासून टीसीपी विभागाला लेखी स्वरूपात तक्रारी दिल्या. मात्र, कुणीच दखल घेतली नाही. डोंगर कापणीचेही काम सुरू होते. दि. ५ रोजी उमाकांत खोत आपल्या जमिनीमध्ये बेकायदेशीर डोंगर कापणीचे काम सुरू असल्याची पाहणी करण्यासाठी तेथे गेले होते. त्या ठिकाणी तलाठीही उपस्थित होते. परंतु तलाठी त्या ठिकाणी पोचण्यापूर्वीच उमाकांत खोत यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केला होता.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी सर्व्हे क्र. १५ ६/३ मधील जमिनीतील प्रकल्पाला सरकारने दिलेली मान्यता रद्द करावी. या प्रकल्पाला थारा देऊ नये, अशी मागणी स्थानिकांनी केली. आमदार जीत आरोलकर यांनी तुमची मागणी सरकारकडे लेखी स्वरूपात द्या. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते.
मुख्य संशयिताच्या शोधात पथके बंगळुरूकडे
या प्रकरणातील मुख्य संशयित जमीनमालक अशोक कुमार नेदुरुमली अद्याप फरार अाहे. तो बंगळुरू येथे राहत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके बंगळुरूसह विविध ठिकाणी रवाना झाली आहेत, अशी माहिती मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांनी दिली.