मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (पीवायक्यू) सोडवणे हा स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा आधारस्तंभ आहे. यामुळे परीक्षेचे स्वरूप, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. आजच्या बहुपर्यायी (एमसीक्यू) युगातही त्यांची महती टिकून आहे.

आपल्या सर्वांना लहानपणापासून हेच शिकवण्यात आले आहे की बोर्डाची परीक्षा असली की त्या वर्षाच्या आधीच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या. कारण याचा फायदा होतो. सुमारे ५-६ वर्षांपूर्वीचे प्रश्न लक्षात आले की, त्यांचे पुनरावृत्ती लक्षात यायचे. अर्थात, हे लेखी, दीर्घोत्तरी प्रश्नांच्या बाबतीत असायचे. त्या काळात बहुपर्यायी प्रश्न विचारण्याची पद्धत नव्हती.
परंतु जसा काळ पुढे सरकत गेला, तसतसे परीक्षांचे स्वरूप बदलले. जणूकाही सर्व ठिकाणी परीक्षांचे स्वरूप आता एमसीक्यू पद्धतीचेच झालेले आहे. एक प्रश्न, चार पर्याय. एक बरोबर उत्तर, तर तीन चुकीची उत्तरे.
एका दशकाहून अधिक परीक्षा जेव्हा झाल्या, त्या परीक्षांचे जेव्हा पृथक्करण केले, तेव्हा साधारणपणे परीक्षेचा आणि प्रश्नांचा पॅटर्न लक्षात यायला लागला. नंतर-नंतर स्वरूप अधिक स्पष्ट होऊ लागले. परंतु यात प्रश्न जसेच्या तसे पुनरावृत्त होत नव्हते. मात्र, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, हे लक्षात यायला लागले.
आधीच्या बोर्डाच्या परीक्षेत थेट प्रश्न जसाच्या तसा पुनरावृत्त व्हायचा. येथे ही शक्यता नसते. परंतु कोणते प्रश्न विचारले जातात, याचा एक अंदाज येतो. त्यामुळे जीपीएससी, यूपीएससी, रेल्वे, बँकिंग, एमबीए, सीईटी (सीबीआय), इन्शुरन्स यासाठी ज्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात, त्यांमधील फरक सुद्धा लक्षात यायला लागतो. म्हणजे नेमक्या कोणत्या भागात आपल्याला स्कोअर करता येईल आणि कोणत्या भागात आपल्याला कठीण जाईल, हे सुद्धा लक्षात यायला लागते.
या दोन प्रकारानंतर आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे, कोणत्या प्रश्नांवर माझा 'वेळ' जास्त जाणार आहे? हे ही खूप महत्त्वाचे आहे. मुले खूपदा वरच्या पहिल्या दोन भागांचा जास्त विचार करतात आणि दुर्दैवाने तिसरा भाग दुर्लक्षित राहतो. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, प्रत्येक प्रश्नाला सारखेच गुण आहेत. त्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या प्रश्नांची भरपूर तयारी केली आणि फक्त त्याच्याच भरवशावर पेपर सोडवला, तर ते घातक ठरते.
लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचाच आहे आणि ज्या विषयांचा नीट अभ्यास केला नव्हता, त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे घातक आहे. कधी कधी उत्तर माहिती नसले तरी 'लॉजिक' च्या आधारे उत्तर दिले, तरी ते बरोबर येऊ शकते. प्रत्येक प्रश्न गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. खूपदा 'भरवश्याच्या म्हशीला टोणगा' अशी परिस्थिती उद्भवते. ज्याचा जास्त अभ्यास आणि सराव केला होता, तोच अवघड गेला असेच खूपदा होते.
एकदा मागील प्रश्न असेच डोळ्याखालून गेले, तर घड्याळाच्या हिशोबाने कोणत्या प्रश्नांना प्रथम सामोरे जायचे, याचा प्राधान्यक्रम ठरवता येतो. इंटरनेटवर सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. जीपीएससी परीक्षेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यांना नकारात्मक मार्किंग नाही. त्यामुळे अंदाजे उत्तरे देता येतात. इतर परीक्षांना उत्तर बरोबर देत असूनसुद्धा आत्मविश्वास नसल्यामुळे चुकीची उत्तरे दिली जातात.
जीपीएससी परीक्षेचा पण एक पॅटर्न असतो: दोन विभाग असतात – कोअर सब्जेक्ट आणि जनरल विषय. जुन्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका जर घड्याळ लावून सोडवल्या, तर लक्षात येते की पेपर पूर्ण सोडवणे किती कठीण आहे, किंवा सोडवण्यास खूप वेळ लागला. एकदा सराव झाला की, आपोआप कळायला लागते की, कुठून सुरुवात करायची आणि कुठे 'एंड' करावा. निबंधात्मक प्रश्न सर्वात शेवटी घ्यायचे. इंग्रजी व्याकरणाचे आधी घ्यायचे. त्यातही वाक्ये आणि त्यातील सोपे प्रश्न आधी घ्यावे. हातातील घड्याळाला सांगायचे की, १० मिनिटांत मी शांत डोक्याने सर्व इंग्रजी संपवणार आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नांचा विचार मनात येत नाही आणि फोकस वाढतो.
हे कधी शक्य होते? जेव्हा आपण कमीत कमी २५ 'मॉक टेस्ट' दिलेल्या असतात. जुने प्रश्न सोडवून एक बेसलाईन आत्मविश्वास तयार होतो. आपल्याच चुका आपल्याला कळायला लागतात आणि मेंदू आपला घड्याळाशी स्पर्धा करायला तयार होतो. म्हणून पीवायक्यू अतिशय महत्त्वाच्या ठरतात.

अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)