आपल्या भारत देशाला, आपल्या संस्कृतीला सण उत्सवांची परंपरा लाभली आहे. आपल्या मुख्य सणांपैकी मकर संक्रांतीचा सण हा अधिक महत्त्वपूर्ण आहे. जानेवारी महिन्याच्या १४ किंवा १५ तारखेला हा सण साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात जेव्हा सूर्य दक्षिणायन ते उत्तरायण म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा करतात. देशातील विविध भागात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. परंतु सगळीकडे सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि त्याचे आभार मानले जातात.
मकर संक्रांत हा सण मला फार आवडतो. कारण माझी आई, काकी घरी तिळगुळ करते आणि मला सगळ्यांना वाटायला पाठवते. तिळगुळ देताना “तिळगुळ घ्या गोड बोला” असं सगळ्यांना सांगून मी तिळगुळ देते. तसेच माझी आई, काकी हळदीकुंकू करते, संक्रांतीनिमित्त वाण वाटते. सर्व स्त्रिया आमच्या घरी येतात तेव्हा मला फार आनंद वाटतो. तसेच या दिवसात आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसतात. आम्हा मुलांसाठी पतंग उडवायचा म्हणजे एक उत्सवच असतो. तसेच या सणात धार्मिकदृष्ट्या दानालाही महत्त्व आहे. आपली संस्कृती आपल्याला दातृत्वाची शिकवणही देऊन जाते. खरंच खऱ्या अर्थाने संक्रमण करणारा हा क्षण मला फार फार आवडतो.
नाव : कु. गौरवी वारंग
इयत्ता : पाचवी
शाळा : शारदा माध्यमिक विद्यालय,
कासारवर्णे, पेडणे - गोवा.