बॉर्डर-गावस्कर मालिकेत दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण आपण संघाची बेंच स्ट्रेंथ पाहिली, तर भविष्यासाठी भारतीय संघात फलंदाजीमध्ये मजबूत पर्याय आहेत, परंतु गोलंदाजीबाबत मात्र योग्य पर्याय दिसत नाहीत.
फलंदाजीतील खराब कामगिरीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहली यांचे कसोटी भवितव्य टांगणीला लागले आहे. या दोघांची जागा घेण्यासाठी निवड समितीकडे काही चांगले पर्याय आहेत, पण गोलंदाजीत कोणताही चांगला पर्याय दिसत नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही, त्यामुळे त्याच्यावर ताण वाढला आणि त्याच्या पाठीच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे निर्णायक पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात तो गोलंदाजीही करू शकला नाही. ३६ कसोटी खेळूनही मोहम्मद सिराजला मॅचविनर गोलंदाज बनता आलेले नाही. प्रसिद्ध कृष्णाकडे चांगला वेग आहे, पण तो योग्य लाइन-लेंथ गोलंदाजी करण्यात सातत्याने अपयशी ठरतो. आकाश दीप आणि मुकेश कुमार यांच्याकडे कौशल्य आहे, पण त्यांना खेळाच्या सर्वोच्च स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्याच्या पुरेशा संधी अद्याप मिळालेल्या नाहीत. सर्वात मोठी अडचण आहे, ती डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांची. अर्शदीप सिंगने मर्यादित षटकांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे, परंतु लाल चेंडूने तो तितका प्रभावी ठरला नाही. यश दयाल आणि खलील अहमद देखील आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. टी. नटराजन हा एक चांगला पर्याय होता, पण दुखापतींमुळे तो क्रिकेटपासून दूर आहे.
निवड समितीने रोहित आणि कोहलीला संघातून वगळण्याचा निर्णय घेतल्यास किंवा दोघांनी निवृत्तीची घोषणा केली, तर या दोन स्थानांसाठी किमान सहा फलंदाज दावा करण्यास तयार आहेत. यातील सर्वात प्रमुख दावेदार तामिळनाडूचा साई सुदर्शन. मॅके येथे ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघाकडून खेळताना या डाव्या हाताच्या फलंदाजाने सर्वांना प्रभावित केले. संघातील दुसरा डावखुरा पर्याय म्हणजे देवदत्त पडिक्कल. त्याला काही कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. अभिमन्यू ईश्वरन संघात तीन वर्षांपासून आहे, परंतु भारतीय निवड समिती त्याला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मोठ्या आव्हानांसाठी योग्य मानत नाही. कसोटी संघातील स्थानासाठी सर्वात मोठे दावेदार असलेल्या तीन नावांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, तीन कसोटींचा अनुभव असलेला रजत पाटीदार आणि मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.
- प्रवीण साठे