व्हिसा आणि स्थलांतर नियमांमध्ये बदल

Story: विश्वरंग |
07th January, 11:41 pm
व्हिसा आणि स्थलांतर नियमांमध्ये बदल

न्यूझीलंडने आपल्या व्हिसा आणि इमिग्रेशन नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. याचा अनेक परदेशी नागरिकांना थेट फायदा होणार आहे. या बदलांचा मुख्य उद्देश देशातील कामगारांची कमतरता भरून काढणे आणि परदेशी नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी अधिक सुलभ करणे असल्याची माहिची मिळाली आहे. तसेच इमिग्रेशन धोरणामध्येही बदल करण्यात आले आहे. यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना न्यूझीलंडमध्ये नोकरी आणि शिक्षणाच्या दृष्टीने अनेक लाभ होणार आहेत.

न्यूझीलंडने कामगारांसाठी वर्क एक्सपीरियन्सची आवश्यकता ३ वर्षांवरून २ वर्षांपर्यंत कमी केली आहे, यामुळे कामगारांना अधिक लवकर आणि सोप्या पद्धतीने रोजगार मिळू शकेल, असा याचा उद्देश आहे. सीझनल कामगारांसाठी दोन नवीन प्रकारचे व्हिसा सादर करण्यात आले आहेत. अनुभवी कामगारांसाठी ३ वर्षांचा मल्टी एंट्री व्हिसा आणि कमी अनुभवी लोकांसाठी असलेल्या कामगारांसाठी ७ महिन्यांचा सिंगल एंट्री व्हीसा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

याशिवाय, न्यूझीलंड सरकारने मान्यताप्राप्त एम्प्लॉयर वर्क व्हिसा आणि विशिष्ट उद्देश वर्क व्हिसासाठी पूर्वी असलेले ठरावीक पगाराचे निकष काढून टाकले आहेत. यामुळे आता कंपन्यांना बाजारातील दरानुसार कामगारांना वेतन देता येणार आहे. याशिवाय, कमी अनुभवाच्या कामांवरील व्हिसा कालावधी २ वर्षांवरून ३ वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

या बदलेल्या नियमांमुळे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे. पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा अंतर्गत विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे ३ वर्षांपर्यंत न्यूझीलंडमध्ये राहण्याची आणि काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, मास्टर डिग्री पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पात्रतेतून वगळण्यात येणार नाही, यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.

या नियमांमध्ये कंपन्यांना अनुभव पातळी ४ आणि ५ च्या नोकऱ्यांसाठी २१ दिवसांच्या अनिवार्य भरती प्रक्रियेपासून सूट देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक आणि परदेशी कामगारांची भरती प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होणार आहे. न्यूझीलंडच्या या धोरणात्मक बदलांमुळे भारतीय आणि इतर परदेशी कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध होतील, तर कंपन्यांना देखील आवश्यक मनुष्यबळ मिळवणे सोपे जाईल.

- गणेशप्रसाद गोगटे