मोदी सरकारवर टीका करण्यासाठी सीमा सुरक्षा दलावरच आरोप करणे कितपत योग्य आहे, याचा विचार एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री करीत नसेल, तर त्या नेत्याला जबाबदार आणि सक्षम कसे काय म्हणता येईल?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तीव्र भाजप विरोधाचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. याच कारणासाठी असेल कदाचित त्यांच्याकडे इंडी आघाडीचे नेतेपद सोपविण्याची इच्छा मध्यंतरी काही विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली होती. ममता या त्या राज्यातील लोकप्रिय नेत्या आहेत, याबद्दलही संशय नाही. याच कारणास्तव मोदी लाट असो किंवा नसो, तृणमूल काँग्रेसला त्या राज्यात बहुमत मिळून वारंवार सत्ता प्राप्त होत असल्याचे दिसते. अशा नेत्याची काही विधाने अनेक वेळा बेलगाम असल्याचे दिसून येते. ममता बॅनर्जी अलीकडे भाजप किंवा केंद्रातील एनडीए सरकारविरोधात काही वक्तव्ये करीत नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटत असे. ही उणीव त्यांनी नुकतीच भरून काढली आहे. बांगलादेशातील अलिकडच्या सत्तांतरानंतर त्या देशात निर्माण झालेली अराजकाची स्थिती भारतासारख्या शेजारी देशाला त्रासदायक ठरली आहे. ज्या देशाच्या निर्मितीत भारताने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याच देशाचे सध्याचे सत्ताधारी भारतविरोधात बोलताना दिसतात. पदच्युत पंतप्रधान शेख हसिना यांनी भारतात घेतलेला राजकीय आश्रय तेथील हंगामी सरकारला पसंत नाही. दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक स्तरावर त्या देशात गोंधळाचे वातावरण आहे. कधी काळी पाकिस्तानचा भाग असलेला तो प्रदेश पुन्हा पाकिस्तानप्रमाणेच धर्मांध शक्तीच्या अधिपत्याखाली गेला आहे. विकासाऐवजी असंतोष आणि आंदोलने सुरू आहेत. अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवरील अत्याचार वाढत आहेत. तेथील मुस्लिम जनताही असमाधानी आहे. याच कारणास्तव त्या देशातील लोक आपला शेजारी देश असलेल्या भारतात शिरकाव करू पाहत आहेत. अशी घुसखोरी अनेक दृष्ट्या भारताला हानिकारक ठरत आली आहे. रोहिंग्यांनी यापूर्वीच भारतात घुसून अनेक भागांत आपले बस्तान बसविले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, ममता बॅनर्जी यांनी सीमा सुरक्षा दलावरच आरोप करीत देशविघातक शक्तींना अप्रत्यक्ष समर्थन दिल्याचे दिसून येते.
ममता बॅनर्जी यांनी जे विधान केले आहे, ते धक्कादायक तर आहेच, शिवाय निषेधार्ह आहे. सीमा सुरक्षा दलाने घुसखोरांना अर्थात दहशतवाद्यांना पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्यास मुभा दिली असून, हे सारे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून घडते आहे, असा दावा त्यांनी केला आहे. घुसखोरांमुळे राज्यात अस्वस्थता पसरली आहे, असेही त्या म्हणतात. मोदी सरकारवर टीका करण्यासाठी सीमा सुरक्षा दलावरच आरोप करणे कितपत योग्य आहे, याचा विचार एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री करीत नसेल, तर त्या नेत्याला जबाबदार आणि सक्षम कसे काय म्हणता येईल, असा प्रश्न निर्माण होतो. केंद्र सरकार घुसखोरीविरोधात विविध पातळ्यांवर कारवाई करीत असताना, भाजप नेत्यांनी सतत घुसखोरांना आवरण्यासाठी प्रयत्न चालविले असताना, केवळ पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार बांगलादेशी नागरिकांना येण्यास प्रोत्साहन देत आहे, हे निवेदन आक्षेपार्ह आहे. भारताची अन्य देशांशी असलेली सीमा ४,०९६ किलोमीटर असून त्यापैकी २,२१७ किलोमीटर एवढे अंतर पश्चिम बंगालला लागून आहे. एवढ्या मोठ्या अंतराची देखरेख आणि रक्षण ज्या पद्धतीने सीमा सुरक्षा दल करीत आहे, ते प्रशंसनीय आहे. त्यातही हे दल अंतर्गत सुव्यवस्था आणि कायदा याकडे लक्ष देण्यासाठी पोलिसांना सहकार्य करीत असते.
पश्चिम बंगालच्या पोलीस खात्याच्या मते, घुसखोरांना पकडून योग्य यंत्रणेच्या ताब्यात देण्यात हयगय केली जात नाही. तरीही सीमेवरील त्रुटीमुळे घुसखोर राज्यात प्रवेश करीत असतात. पासपोर्ट देताना केंद्र सरकारची कार्यालये योग्य खबरदारी घेत नसल्यामुळे विमानांतून कोणीही राज्यात येत असतो असे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे. अर्थात ममता बॅनर्जींच्या सुरात सूर मिळवणे अधिकाऱ्यांना भाग पडते.
ममता बॅनर्जी आपली प्रशासनावरील पकड घट्ट करण्यात यशस्वी ठरल्या नसून, ते अपयश लपविण्यासाठी वेगळेच विषय समोर आणले जातात, अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे. याचबरोबर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना, सुरक्षा दलाला लक्ष्य करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, असा टोला मारला आहे. एकंदरीत ममता बॅनर्जी ज्या प्रकारे बोलल्या, त्यांनी सुरक्षा दलावर खापर फोडले याचे पडसाद राजकीय क्षेत्रात उमटणे साहजिक आहे. राजकीय वादात सुरक्षा दलाला खेचणे अयोग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांना का सांगावे लागते, असाच प्रश्न अनेकांना पडला असेल.