गोव्यातील गुन्ह्यांमध्ये बहुतांश लोक बाहेरील असतात. त्यामुळे स्थलांतर, पर्यटन या गोष्टींमुळे गुन्ह्यांचे प्रमाण शून्य होणार नाही. पण घडलेल्या गुन्ह्यांचा तपास होतानाच त्या गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होणे आवश्यक आहे, तरच गुन्हे कमी होतील.
गोव्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात गोवा पोलिसांना ९६.६७ टक्के यश आल्याचे पोलिसांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले. २०२४ मध्ये गोव्यात गंभीर गुन्ह्यांची संख्या सुमारे १८० होती, तर सर्व गुन्ह्यांची संख्या २,०९६ इतकी होती ज्यात आयपीसी आणि बीएनएसच्या कलमांखाली नोंद झालेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यातील १,८४४ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये खून, बलात्कार, खुनाचे प्रयत्न, दरोडे अशा प्रकारच्या घटनांचा समावेश होतो. अन्य गुन्ह्यांमध्ये चोरी, फसवणूक, अपहरण, मारहाण अशा गुन्ह्यांचा समावेश असतो. अशा प्रकरणांच्या तपासाची टक्केवारी ८७.९८ टक्के आहे. गोव्यातील गुन्ह्यांचा तपास आजकाल जास्त वेगाने होत असतो. पोलीस खात्यात आणि तपासात झालेल्या सुधारणांमुळे अनेक घटनांच्या तपासात बऱ्यापैकी यश येत असते. हे यश पुरेसे नाही. किंबहुना ते अर्थहीन आहे, असेच म्हणावे लागेल. कारण ज्या प्रकरणांचा तपास यशश्वीपणे पूर्ण केल्याचे पोलीस सांगतात, त्या प्रकरणांमधील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण सरासरी ३० टक्क्यांपेक्षाही कमी असते. याचाच अर्थ गुन्ह्यांचा तपास हा वरवरचा दिखाऊपणा झाला आहे. त्याला गंभीर तपासाची पार्श्वभूमी नाही. कारण तपास पूर्ण झाला म्हणजे इथे सगळे संपत नाही. आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली तरच त्या तपासाला खरे यश येते. त्यामुळे तपास दर चांगला आहे म्हणून गोवा पोलिसांनी हुरळून जाऊ नये. आपण फार मोठे काम केले आहे, असेही समजू नये. ज्या दिवशी गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण ९६.६७ होईल, त्या दिवशी गोवा पोलिसांच्या कर्तबगारीला खऱ्या अर्थाने सलाम करावा लागेल. तोपर्यंत पोलिसांनी फक्त यशश्वी तपासाची आत्मस्तुती करावी.
देशातच गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांच्या आसपास आहे. गोव्यात तर सर्वात कमी आहे. हे प्रमाण किमान देशातील टक्केवारीच्या आसपास यायला हवे. गोवा पोलिसांनी तपास लावला या आत्मसंतुष्टतेतून बाहेर पडून तपासासोबतच गुन्हा सिद्ध करणे हे फार महत्त्वाचे आहे, हेही लक्षात घ्यावे. अन्यथा आरोपी निर्दोष, पुराव्याअभावी सुटत असतील तर अशा तपासाला काही अर्थ राहत नाही. २०२४ मध्ये खून, दरोडे, बलात्कार, खुनाचे प्रयत्न असे १८० गंभीर गुन्हे गोव्यात नोंद झाले. त्यातील १७४ गुन्ह्यांचा तपास लागला. फक्त सहा गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही. गोव्यात २०२३ मध्ये गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण ३३ टक्के होते. जर तपास लागलेल्या गुन्ह्यांना सिद्ध करण्यात पोलिसांना यश येत नाही तर तपास योग्य पद्धतीने होत नाही, असेच म्हणावे लागेल. २०२३ मधील ३३ टक्के हा सरासरी दर पाहिला किंवा त्यापूर्वी २०२२ मध्ये २५ टक्क्यांच्या आसपास असलेला दर जो २०२१ मध्ये १९ टक्के होता. आरोप सिद्ध होण्याचा दर पाहिला तर पोलीस तपासात ९६ टक्के यश आल्याचे सांगतात, ते त्यातील किती टक्के आरोपींना शिक्षा होईल हे सांगू शकत नाहीत. गेल्या तीन वर्षांतील गुन्हे सिद्ध होण्याचा दर पाहिला तर ७० ते ७५ टक्के आरोपी निश्चितच सुटू शकतात, एवढे साधे गणित आहे. त्यामुळेच तपासाला वैज्ञानिक पुरावे, साक्षीदार यांची जोड आवश्यक आहे. त्यासाठी घटनास्थळावरील गोष्टींचा योग्य तपास करणे, फॉरेन्सिकचा जास्तीत जास्त वापर होणे, पंचनामा, साक्षीदार या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. जोपर्यंत तपास वैज्ञानिकदृष्ट्या ठोस होत नाही तोपर्यंत फक्त तपासाचीच टक्केवारी वाढेल, पण दोशी सहीसलामत सुटतील.
गुन्ह्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. त्याचे श्रेय पोलिसांना द्यायला हवे. सीसीटीव्हीचे वाढत असलेले जाळे, समुपदेशन, भाडेकरूंची पडताळणी, पोलीस गस्त अशा गोष्टींमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे ही चांगली गोष्ट आहे. गोवा हे पर्यटन राज्य आहे. वर्षाला लाखो पर्यटक गोव्यात येतात. लाखो लोक गोव्यात नोकऱ्यांसाठी स्थलांतरित होतात. त्यातून काही प्रमाणात गुन्हेगारी स्वरुपाचे लोकही येतात, हे याआधीही सिद्ध झाले आहे. गोव्यातील गुन्ह्यांमध्ये बहुतांश लोक बाहेरील असतात. त्यामुळे स्थलांतर, पर्यटन या गोष्टींमुळे गुन्ह्यांचे प्रमाण शून्य होणार नाही. पण घडलेल्या गुन्ह्यांचा तपास होतानाच त्या गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होणे आवश्यक आहे, तरच गुन्हे कमी होतील.