मांगल्याचा, सौंदर्याचा गोवा आज बेहोशी, मद्यपी, जुगारी, व्यसनी बदफैली आणि बेशिस्त पर्यटकांचा स्वर्ग ठरलेला आहे आणि त्याचा फटका हाताच्या बोटावर मोजण्याइतके शिल्लक राहिलेल्या गोवेकरांना बसलेला आहे.
आज ग्रेगोरियन कॅलेंडरच्या २०२५ या वर्षाचा पहिला दिवस असून या कालगणनेचा स्वीकार जागतिक स्तरावर होत असल्याने पहिल्या दिवसाला उत्सवी स्वरूप लाभलेले आहे. प्रदीर्घ काळ गोव्यावर पोर्तुगिजांची सत्ता असल्याकारणाने ख्रिसमसनंतर येणारे ग्रेगोरियन कालगणनेतील नववर्ष इथे साजरे केले जाते. त्यामुळे देश विदेशातल्या पर्यटकांचे तांडे 'खाओ, पियो, मजा करो' अशा भावनेने गोव्यात नववर्ष साजरे करण्याच्या हेतूने येतात. गोवा मुक्तीनंतर ते आजतागायत ही भूमी पर्यटकांसाठी बेभान होऊन नाचण्याची, दारू पिऊन नशेत रममाण होण्याची भूमी असल्याची धारणा प्रकर्षाने उभी राहिली आणि अशीच मानसिकता घेऊनच पर्यटक गोव्यात येत असतात. एकेकाळी गोवा मुक्त झाला, त्यावेळी इथल्या समाजवाद, भारतीय बाणा, सर्वजनांचे कल्याण व गोमंतकीय विचारप्रणालीने भारवलेल्या आपल्या तरुणाईने बुलंदपणे 'इंकलाब जिंदाबाद'चा नारा देऊन, क्रांतीची स्वप्ने पाहिली होती. त्यांच्या अपरिमित अशा त्यागामुळे देशात स्वातंत्र्याची पहाट शतकानंतर आली आणि स्वराज्याच्या मधुर फळांचा आस्वाद आम्ही घेत आहोत. 'तोडा, फोडा'पासून परावृत्त होऊन आम्ही बाबा आमटेंसारख्या महापुरुषाने आरंभलेल्या 'भारत जोडो'चे सच्चे पाईक झालो असतो तर धर्मांधता, अस्पृश्यता, जातीयता यांचा अंधार नष्ट करणे शक्य झाले असते. परंतु आज राजकारणी या बाबींचा चलनी नाण्यासारखा उपयोग सत्ता सोपान चढण्यासाठी करू लागलेले आहेत. त्यामुळे २०२५ मध्ये आपल्या देशाला सशक्त, सुदृढ करण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक ऊर्जा जागवण्याची गरज आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यांच्या कुशीत असलेले आपले गोवा राज्य, पर्यटकांचा स्वर्ग म्हणून आततायीपणे विस्तारण्यास आम्ही मुभा दिल्याने केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र विसर्जनच्या गैरव्यवस्थापनाच्या ताणतणावाखाली दिवसेंदिवस चेंगरत चाललेले आहे. कोकण काशी, पूर्वेकडचे रोम अशी ओळख असलेले आपले राज्य कॅसिनो, सनबर्नची मायानगरी होण्याच्या वाटेवर आहे. एका बाजूला महामार्ग, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्गाच्या विस्ताराला प्राणपणाने विरोध करणारे आमचेच हात सरकारी आणि खासगी जंगलांचे अस्तित्व लोप पावत असताना शांत आहेत. पूर्वजांनी वड, पिंपळ, औदुंबरात देवत्व पाहिले, त्यांना आम्ही सिमेंट-काँक्रिटच्या बंदिवासात संत्रस्त करू लागलो आहोत. 'खाओ, पियो, मजा करो'च्या वृत्तीमुळे डोंगर माथ्यावरून कोसळणाऱ्या जलप्रपातांचा निसर्ग सुंदर परिसर ध्वनी प्रदूषणाबरोबर कचऱ्याने विद्रूप करण्यातच धन्यता मानू लागलो आहोत. कमी काम आणि सरकारी ऐष आराम देणारी बाबूगिरी आमचे आकर्षण ठरत असल्याने असंतुलित विकासाने आमच्या समाजव्यवस्थेला सूज आणली आहे. जेथे कधीकाळी माडतीसारखा जंगली वृक्ष राज्याचे संचित ठरला होता, त्याऐवजी माडच राज्य वृक्ष होण्यास योग्य असल्याची मानसिकता वृद्धिंगत पावली होती. परंतु सतर्क पर्यावरणवाद्यांच्या लढ्यामुळे माडाबरोबर माडतीचा राज्यवृक्ष दर्जा सुरक्षित राहिलेला असला तरी माट्टीमळ इतिहासजमा करण्यासाठी होणारे प्रयत्न आम्ही हताशपणे पाहत आहोत. कल्पवृक्ष म्हणून ज्या माडाकडे पाहिले होते, त्याचे अस्तित्व दूरध्वनीच्या वाढत्या मनोऱ्यांच्या वावटळीत संकट छायेखाली आहे.
आम्ही मलाबार ट्री निम्फसारख्या फुलपाखराला राज्याचे संचित म्हणून अधिसूचित केलेले असले तरी त्यांच्यासाठी सदाहरित, निम्न सदाहरित जंगल क्षेत्राचा अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने बेफिकीर झालेलो आहोत. पट्टेरी वाघाचे दर्शन आणि बिबट्याचे लोकवस्तीच्या परिसरात आगमन, ज्या समाजाने पूर्वापार स्वीकारले होते, त्यांच्याच उच्च विद्याविभूषित पिढीला त्यांचे स्थलांतर प्राणी संग्रहालयात करावे, अशी धारणा वाढलेली आहे. कोंबडे, बकरे, गाई, खेकडे, मासे, शंख शिंपले यांच्यातील मांसावर मुक्तपणे ताव मारणाऱ्या समाजाला रानडुक्कर, हरण, साळिंदर, पिसय अशा जंगली श्वापदांच्या मटणाची चटक लागलेली आहे. त्यामुळे हे प्राणी उपद्रवकारक ठरवून, त्यांना ठार करण्यासाठी बंदुकीचे परवाने मुक्तपणे द्यावे अशी मागणी जोर धरत आहे, तर आयाभगिनींची दिवसाढवळ्या अब्रू लुटणारे नराधम उजळ माथ्याने फिरत आहेत. हा विस्तारणारा विरोधाभास आज आमचे समाजजीवन प्रदूषित करत असताना, आम्ही हे सारे मुकाटपणे चालू देत आहोत.
सेंद्रिय शेती, श्वेतकपिला, गीर गाई, म्हशीचा दुग्ध व्यवसाय करत पर्यावरणस्नेही जीवन पद्धतीचा स्वीकार करण्याला आज आम्ही प्राधान्य देण्याची गरज आहे. गावठी कोंबड्यांचे पालन करत, शाश्वतरित्या मासेमारी करणे शक्य आहे. स्वदेशी विचार केवळ राष्ट्रीय सणापुरता खादीचे झेंडे दिखाऊपणासाठी हाती घेण्याऐवजी दरदिवशी स्वीकारण्याची तयारी महत्त्वाची आहे. भारत माझा देश ही प्रतिज्ञा रात्रंदिनी आमच्या ओठांवर राहिली तरच हा देश सदाहरित जंगलांची समृद्धी जगत खऱ्यारितीने सुंदर, सुरेख होईल आणि आमचे जीवन मंगलमय करील.
२०२५ या ग्रेगोरियन कालगणनेतील या पहिल्या दिवशी मद्यपान, अमली पदार्थ सेवन, आपल्या शरीराचे चोचले पुरवणे महत्त्वाचे मानलेले आहे आणि त्यामुळे कधीकाळी रौप्यकांतीने तळपणारे सागर किनारे, हिरव्यागार चुडतांनी समृद्ध आणि वाऱ्यावर डोलणारे माड, इथले फेसाळणारे पाणी त्यांचे आकर्षण ठरले होते. परंतु आज गोव्याची प्रतिमा इथल्या राज्यकर्त्यांनी अमाप पैसा कमावण्याच्या एकमेव उद्दिष्टापायी पूर्णपणे बदलली आहे. पेडणेतल्या धारगळात संपन्न झालेला सनबर्न किंवा ठिकठिकाणी जुन्या वर्षाला निरोप देत २०२५ चे स्वागत करण्यासाठी आयोजित नृत्यरजनींचे झगमगाटी स्वरूपाचे कार्यक्रम म्हणजे गोवा, अशी ओळख निर्माण झालेली आहे. पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्यातील रस्ते दिवसरात्री पर्यटकांच्या असह्यकारक गर्दीने व्यापलेले आहेत आणि त्यामुळे इथल्या पर्यावरणीय संवेदनशीलतेचे तीनतेरा वाजलेले आहेत. रस्त्यावर वाहनांमुळे उद्भवणाऱ्या अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून, त्यात सध्या तरी सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
पर्यटकांचे लोंढे गोव्यातील सागरकिनाऱ्यांनी, डोगरांनी, जंगलांनी व्यापलेले असून, त्यामुळे इथे सौजन्य, शिस्त, कायदा धाब्यावर बसवण्याची मानसिकता समाजात वृद्धिंगत होत चालली आहे. मांगल्याचा, सौंदर्याचा गोवा आज बेहोशी, मद्यपी, जुगारी, व्यसनी बदफैली आणि बेशिस्त पर्यटकांचा स्वर्ग ठरलेला आहे आणि त्याचा फटका कित्येक वर्षांपासून इथल्या माती, संस्कृती, निसर्ग आणि पर्यावरणाची कास घरून शांत, प्रसन्न जीवन जगणाऱ्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके शिल्लक राहिलेल्या गोवेकरांना बसलेला आहे. २०२५ या वर्षात नवे संकल्प आणि गोव्याला नवीन दिशा देण्याच्या हेतूने वावरणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज व्यापक होण्याची गरज आहे आणि त्यासाठी झटण्याची तयारी महत्त्वाची आहे.
- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५