गुन्हा करणाऱ्या शॅक किंवा क्लब मालकांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करतानाच त्यांच्या अस्थापनांवरही बुलडोझर फिरवायला हवा. मनमानी करणाऱ्या बोट मालकांनी पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले नाही, तर त्यांच्या बोटींवरही कारवाई करायला हवी.
पर्यटकांनी गोव्याचे किनारे फुलले आहेत. पर्यटन व्यवसायाशी संबंधित प्रतिनिधींच्या म्हणण्याप्रमाणे हॉटेलच्या ९० टक्के खोल्या भरलेल्या आहेत. याचाच अर्थ नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेले आहेत. गोव्यातील पर्यटनाची बदनामी सुरू असताना आणि गोव्यात पर्यटक कमी झाले अशी आवई उठवली जात असताना, कोविडनंतर दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत आहे, ही गोव्यासाठी चांगली गोष्ट आहे.
गोव्यात पर्यटकांचे स्वागत चांगल्या प्रकारे व्हावे, त्यांना वेगवेगळ्या सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. गोव्यातील पर्यटनाची बदनामी का होत आहे, यावर चर्चा व्हायला हवी. गोवा कुठे चुकत आहे? कुठे कमी पडतोय? पर्यटकांकडून होणारे आरोप खरे आहेत का? खरोखरच पर्यटकांना गोव्यात चांगली वागणूक मिळत नाही का? क्षुल्लक कारणांवरून पर्यटकांना मारहाण करणे, त्यांचा अपमान करणे, त्यांच्यावर हल्ला करणे, हे कितपत योग्य आहे? अशा सर्व गोष्टींबद्दल विचार व्हायला हवा. पण तसा विचार कुठे होत आहे आणि पर्यटकांशी वाईट वागणाऱ्यांना योग्य शिक्षा दिली जात आहे, असे दिसत नाही. अनेक महाभाग सोशल मीडियावर राज्याची बदनामी करत असतात. अशा लोकांना समजावण्याचे काम कोणाचे? गृह खाते आणि पर्यटन खाते संयुक्तपणे अशा वाईट प्रवृत्तींवर कारवाई का करत नाहीत? घडलेल्या प्रकरणांची जबाबदारी घेऊन कारवाई का होत नाही? हे प्रश्न उपस्थित होतात.
सनबर्न संगीत पार्टीच्या परिसरात ड्रग्ज सेवन करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवला जातो. सनबर्नमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू होतो. तरीही शासकीय पातळीवर कोणीही व्यक्त होत नाही. यातूनच संवेदनशीलतेचा अभाव दिसतो. मुळात, दरवर्षी कोण ना कोण मरण पावतो, तर मग प्रत्येक वेळी कुठे काय चुकते? ड्रग्ज चाचणी करणारे पथक असताना अशा पार्ट्यांमध्ये ड्रग्ज कसे पोहचतात, याची चौकशी का होत नाही? अशा महोत्सवांची खरोखरच गरज आहे का, त्यावरही विचार व्हायला हवा. गोव्यातील पर्यटन क्षेत्रातील अशा घटनांवर सरकारने ठोस भूमिका घ्यायला हवी. सरकारकडून काहीही प्रतिक्रिया येत नसल्यास, त्याचा विपरीत परिणाम गोव्यातील पर्यटन क्षेत्रावर होईल. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकार नेमके काय करत आहे? पोलीस खात्याची भूमिका काय? या गोष्टींची जबाबदारी कोण घेणार? अशा प्रश्नांची उत्तरे लोक मागत आहेत. सरकारने त्यासाठी जबाबदारी निश्चित करावी लागेल.
गेल्या आठवड्यात झालेली बोट दुर्घटना, सनबर्नमध्ये सहभागी झालेल्या युवकाचा मृत्यू आणि कळंगुट किनाऱ्यावरील शॅकमध्ये पर्यटक तरुणाचा खून हे काही ताजे मुद्दे आहेत. खून प्रकरणात पोलिसांनी तीन कर्मचारी, शॅक मालक आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर पर्यटन खात्याने त्वरित तो शॅक जमीनदोस्त करणे अपेक्षित होते. त्यामुळे इतर शॅक मालकांनाही यातून धडा मिळाला असता. यापूर्वीही शॅकमध्ये पर्यटकांना आणि स्थानिकांना मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. ऑक्टोबरमध्ये तीन पशुचिकित्सकांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याचवेळी बागामध्ये एका क्लबच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक युवकांना मारहाण केली होती. त्यानंतर तो क्लब बंद करण्यात आला होता. स्थानिक असो वा पर्यटक, शॅक मालक तसेच क्लब मालक आणि त्यांच्या बाऊन्सरच्या दादागिरीला सगळेच बळी पडत आहेत. त्याकडे सरकारचे लक्ष नाही असेच म्हणावे लागेल. कुठल्याही प्रकरणात सरकारने कठोर कारवाई केलेली नाही. गुन्हा करणाऱ्या शॅक किंवा क्लब मालकांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करतानाच त्यांच्या अस्थापनांवरही बुलडोझर फिरवायला हवा. मनमानी करणाऱ्या बोट मालकांनी पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले नाही, तर त्यांच्या बोटींवरही कारवाई करायला हवी. गोव्यातील पर्यटन व्यवसायाची जे लोक प्रतिमा खराब करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
कळंगुटमध्ये शॅकवर झालेल्या भांडणात पर्यटकांना दंडुक्यांनी मारहाण केली, पण नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणेला याचा पत्ताही लागत नाही. यावरून सुरक्षा पद्धतीमध्ये त्रुटी स्पष्टपणे दिसतात. गोव्यात यापूर्वी स्कार्लेट किलिंगसारखे मोठे प्रकरण घडलेले आहे. त्यामुळे किनारी भागात सुरक्षा यंत्रणा सतर्क असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एका तरुणाचा ओव्हरडोसने मृत्यू झाल्याचा संशय आहे आणि दुसऱ्या एका तरुणाचा खून झाला आहे. हे निश्चितच गोव्यासाठी चांगले नाही.