मुस्लिम राष्ट्र बनण्याच्या दिशेने बांगलादेश

जनतेची तीव्र इच्छा म्हणून दडपशाहीविरोधात पाकिस्तानला सोडचिठ्ठी देत बांगलादेश अस्तित्वात आला होता. ती मुक्ती आणि लोकशाही याला सत्तेवरील धर्मांध शक्ती नाकारत आहेत, हे त्या देशातील जनतेचे दुर्दैव आहे.

Story: विचारचक्र |
01st January, 11:10 pm
मुस्लिम राष्ट्र बनण्याच्या दिशेने बांगलादेश

बां गलादेशमधील अंतर्गत राजकीय  घडामोडींचा भारताला असलेला धोका वाढत असून, चीन आणि पाकिस्तान त्या देशातील स्थितीचा लाभ घेत आपले बस्तान बसविण्याचा जो प्रयत्न करीत आहेत, त्यावरून तो देश भारताला कायमचा दुरावत चालला आहे असे स्पष्टपणे जाणवते आहे. चीनशी सीमा असलेला ईशान्येतील पाच राज्यांच्या सुरक्षेवर याचा थेट परिणाम होत आहे. याच कारणास्तव भारताने काही प्रमाणात नमते घेत बांगलादेशशी असलेले संबंध बिघडू नयेत यासाठी प्रयत्न चालविले आहेत. व्यापारी संबंध टिकविण्यासाठी निर्यातीवर भर दिला जात आहे. त्यात प्रामुख्याने तांदळाचा समावेश आहे. बांगलादेशमधील आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्याने तेथील जनतेची कोंडी आणि उपासमार होत आहे. याचाच परिणाम म्हणून तेथील जनताच आता युनूस सरकारविरोधात उठाव करेल, अशी शक्यता वाढली आहे. सत्ताभ्रष्ट झालेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या अवामी लीग पक्षाला त्या देशात असलेले स्थान पाहता, त्यांनी युनूस सरकारविरोधी तोफ डागायला सुरवात केली आहे. न्यूयॉर्क आणि लंडनमधील बांगलादेशी नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी विद्यमान सरकारच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. यामागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप त्या देशात केला जात आहे. जमाते आणि बांगला नॅशनल पार्टी यांचा भारतविरोधी सूर त्यात दिसून येतो. शेख हसिना यांना देशातून पलायन करावे लागल्यानंतर त्यांच्या समर्थकांनीही देश सोडायला सुरवात केली होती. याउलट ज्यांची संपत्ती लुटली गेली, अत्याचार केले गेले, बळी घेतले गेले त्या अल्पसंख्य हिंदू समाजातील नागरिकांनी पलायन करण्याऐवजी एकत्रित येत अन्यायाविरोधात लढा द्यायचे ठरविले, ही जगातील एक दुर्मिळ घटना मानली जाते. बौद्ध धर्मगुरू चिन्मय कृष्णदास यांना अटक करून सरकारने अल्पसंख्य समाजाला अनायासे नेतृत्व मिळवून दिले असे राजकीय निरीक्षक मानतात. अशा प्रकारचा प्रतिकार अन्य कुठल्याही देशात झाल्याचे ऐकिवात नाही. निःशस्त्र लोक निर्दय लष्करशाहीला सामोरे जात आपले अस्तित्व त्या देशातच कायम कसे टिकेल, यावर भर देत आहेत.

१९७१ पूर्वीची स्थिती निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील हे महम्मद युनूस यांचे निवेदन गोंधळात टाकणारे आहे. त्या वर्षापर्यंत बांगलादेश हा पाकिस्तानचा भाग होता. त्यांच्या निवेदनाचा नेमका अर्थ काढणे कठीण आहे, मात्र पाकिस्तान सरकारची ढवळाढवळ आणि पाकिस्तानी नागरिकांचा प्रवेश सहजसुलभ केला जात आहे, हे त्या देशासाठी सुचिन्ह म्हणता येणार नाही. पाकिस्तानी वकालत याबाबत अतिशय सक्रियपणे काम करू लागली आहे. बांगलादेश निर्मिती आणि मुक्तीलढा यासाठी शेख मुजिबूर रेहमान यांनी केलेले यशस्वी आंदोलन आणि त्यानिमित्त जनतेने दिलेला ‘जॉय बांगला’ हा नाराही आता विस्मरणात जाऊ लागला आहे. काही विमानतळांची नावे बदलून राज्यकर्त्यांची नावे देण्याचा घाट घातला जात आहे. प्रत्यक्षात स्वतंत्र बांगलादेश आणि पाकिस्तानचा भाग असलेला देश अशा दोन विचारसरणीत बांगलादेशातील जनता विभागली गेली आहे. याला धार्मिक बाजू जोडली जात असून, अत्याचाराविरोधात लढणारे हिंदू हे शेख हसिना यांचे समर्थक असल्याचे चित्र रंगविले जात आहे. बांगलादेश हा धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी देश असावा या संकल्पनेला विरोध करणारे पाकिस्तानधार्जिणे घटक आणि सबळ तथा लोकशाही नांदावी असे मानणारे स्थानिक देशप्रेमी अशी विभागणी झाली आहे, ज्यात पाकिस्तान आणि पाश्चिमात्य देश आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत. बांगलादेश हे मुस्लिम राष्ट्र बनवावे या मताचे सरकार सत्तेवर असून, त्या दिशेने पावले टाकली जात आहेत. जनतेची इच्छा म्हणून पाकिस्तानला सोडचिठ्ठी देत बांगलादेश अस्तित्वात आला होता. ती मुक्ती आणि लोकशाही याला धर्मांध शक्ती नाकारत आहेत, हे त्या देशातील जनतेचे दुर्दैव आहे. याच धर्मवेड्या शक्तीचे वर्चस्व सध्या त्या देशावर प्रस्थापित झाले 

आहे.

काळजीवाहू सरकारला जनतेचा भरघोस पाठिंबा असल्याचा दावा केला जात असला तरी संसद अस्तित्वात नसल्याने किंवा लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधी निवडले गेले नसल्याने हे सरकार जनतेचे सरकार आहे, असे म्हणणे हा मूर्खपणा म्हणावा लागेल. २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या प्रारंभी देशात निवडणुका घेतल्या जातील असे एका ठिकाणी म्हणणारे महम्मद युनूस आपण काही वर्षे तरी सत्ता सोडणार नसल्याचे मुलाखतीत सांगतात, याला काय म्हणावे. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे बांगलादेश आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करीत आहे. महागाई रोखणे सरकारच्या हातात राहिलेले नाही. यामुळे जनतेमधील असंतोष वाढत चालला आहे. त्यामुळे भारतविरोधी मोहिमेला अधिक प्राधान्य देत जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे खटाटोप सरकारने सुरू केले आहेत, असे म्हणता येईल. निवडणूक लांबणीवर टाकणे, हा याचाच एक भाग आहे. हंगामी सरकार असा ज्याचा उल्लेख केला जातो ते सरकार दहशतवादी संघटनांच्या हातचे बाहुले बनले आहे. अन्य देशांतही बंदी आहे, अशा संघटनांवरील बंदी उठवणे, जहाल दहशतवाद्यांची सुटका करणे सरकारला भाग पडले ते याचमुळे. त्याचप्रमाणे शेख हसिनांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या पोलिसांना अटक करणे, गोळ्या घालणे अशी मानवताविरोधी कारवाई करीत बांगलादेश सध्या कट्टर मुस्लिम देश बनण्याच्या दिशेने जात आहे, हे तर स्पष्टच दिसते आहे.


- गंगाराम केशव म्हांबरे

(लेखक पत्रकार असून विविध 

विषयांवर लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४