वैष्णोदेवीला दर्शनासाठी ऑक्टोबर २०२४ पर्यंत ८६ लाखांहून अधिक लोक पोहोचले. हा आकडा एक कोटीच्या वर पोहोचेल, असे वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ९५ लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली होती. त्यामुळे जम्मू - काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा हिल्समध्ये वैष्णोदेवी श्राइन बोर्ड २५० कोटी रुपये खर्चून तारकोट मार्ग आणि कटरा येथील सांझी छट दरम्यानच्या १२ किलोमीटरच्या मार्गावर भक्तांच्या दर्शनासाठी रोपवे बांधत आहे. या रोपवे प्रकल्पाविरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे.
जम्मू चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने बंदला पाठिंबा देऊन प्रशासनाला चर्चेद्वारे समस्या सोडविण्यास सांगितले. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी आंदोलकांना समर्थन देत सांगितले, जनतेचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. कारण या प्रकल्पामुळे ४० हजार लोकांचा रोजगार जाणार आहे. वैष्णोदेवी दर्शनासाठी भाविकांना फक्त खेचर आणि पालखीनेच तेथील नागरिक घेऊन जातात. हेच त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे रोपवे प्रकल्पाला ते विरोध करत आहेत.
आंदोलकांनी सांगितले की, कटरा पोलिसांनी शांततेने आंदोलन करणाऱ्या लोकांना अटक केली. त्यांच्यावर लाठीचार्जही केला. या कारणास्तव आम्ही बंद वाढवला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री जुगल शर्माही आंदोलकांच्या समर्थनार्थ उतरले. कामगार संघटनेचे अध्यक्ष भूपिंदरसिंग जामवाल आणि शिवसेनेचे (यूबीटी) प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांनी रोपवे प्रकल्पामुळे बाधित प्रत्येक नागरिकाला २० लाख रुपयांची भरपाई देऊन बाधितांसाठी पुनर्वसन योजना बनविण्याची मागणी केली आहे.
जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले, रोपवे प्रकल्पाचा उद्देश यात्रेकरूंना जलद, सुरक्षित प्रवास प्रदान करणे आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने मंगळवारी कटरा रोपवे प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांशी चर्चा करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आणि आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्वांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, अटकेत असलेल्यांची सुटका करून येथील बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी येथील दुकाने सुरू करण्यात आली. ते म्हणाले की, जोपर्यंत समिती चर्चा पूर्ण करत नाही तोपर्यंत रोपवेचे काम पुढे ढकलले जाईल.
- ऋषभ एकावडे