योग की स्ट्रेंथ ट्रेनिंग?

योग ही काही व्यायामाची पद्धत नाही. त्याला इतर पैलू आहेत. योगाला जिमनॅस्टिकची प्रक्रिया बनवणे हा खूप मोठा गुन्हा ठरेल. पण उप-योग या नावाची एक गोष्ट आहे, जिचा अर्थ आहे उप-प्रकार किंवा गोष्टी करण्याच्या उपयुक्त प्रक्रिया, ज्याला आध्यात्मिक पैलू जोडलेला नाही.

Story: विचारचक्र |
05th January, 09:24 pm
योग की स्ट्रेंथ ट्रेनिंग?

सद्गुरू : मानवी स्नायू प्रणाली ही एक अद्भुत गोष्ट आहे. आपले स्नायू जे काही करू शकतात ते विलक्षण आहे. आणि हे स्नायूंना बळकट करून वाढवले जाऊ शकते, पण त्याचबरोबर त्यांना खूप लवचिक करता येते. जर तुम्ही फक्त वजन उचलत राहिलात, तर तुमचे स्नायू मोठे दिसतील पण त्यांच्यात लवचिकता नसेल. जर तुम्ही अशा लोकांना पाहिले, ज्यांनी खूप मोठे स्नायू वाढवले आहेत, ते नमस्कार सुद्धा व्यवस्थित करू शकत नाहीत. ते अगदी वाकूही शकत नाहीत.

जर तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी चांगले स्नायू हवे असतील, तर आजकाल त्यासाठी सोपे मार्ग आहेत. तुम्ही स्नायूंचे रोपण करू शकता. सिलिकॉन फक्त स्तनांमध्ये नाही, तर स्नायूंमध्ये, पिंडरीच्या स्नायूंमध्ये, सर्वत्र वापरले जाते. ते निरुपयोगी असले तरी फरक पडत नाही. तुम्हाला कठोर मेहनत करण्याची, कॉर्टिसोन आणि हार्मोन्स घेण्याची आणि वजन उचलत राहण्याची गरज नाही. जर प्रश्न फक्त चांगले दिसण्याचा असेल तर इतर सोपे मार्ग आहेत.

होय, बॉडीबिल्डिंगमुळे तुम्हाला बळ मिळते. पण तेच बळ तुम्ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मिळवू शकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्ही तुमचे शरीर लवचिक ठेऊ शकता, जे खूप महत्वाचे आहे. आरोग्य, ऊर्जा, मन आणि आध्यात्मिक आयाम या दृष्टीने निरोगी राहण्याचे हे विविध पैलू आहेत. जेव्हा आपण सकाळी ३० मिनिटे ते एक तास गुंतवतो, तेव्हा आपल्याला सर्व बाजूंनी फायदा व्हायला हवा हे पाहतो, केवळ काही ठिकाणी वर आलेले स्नायू नकोत.

जर तुम्हाला स्नायू वाढवायचे असतील तर काहीच वजन उचलू नये का? तुम्ही उचलू शकता, कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनातून शारीरिक व्यायाम आणि हालचाल बरीच कमी झाली आहे. सर्वकाही यंत्रांद्वारे केले जात आहे. तुमच्या आयफोन व्यतिरिक्त तुम्हाला खरेतर काहीच उचलावे लागत नाही. म्हणून, दिवसभर तुम्ही तुमचे अवयव वापरत नसल्यामुळे, जिममध्ये जाऊन हलके वजन उचलणे ठीक आहे.

योग - व्यायाम नाही

योग ही काही व्यायामाची पद्धत नाही. त्याला इतर पैलू आहेत. योगाला जिमनॅस्टिकची प्रक्रिया बनवणे हा खूप मोठा गुन्हा ठरेल. पण उप-योग या नावाची एक गोष्ट आहे, जिचा अर्थ आहे उप-प्रकार किंवा गोष्टी करण्याच्या उपयुक्त प्रक्रिया, ज्याला आध्यात्मिक पैलू जोडलेला नाही. जर तुम्ही उप-योग किंवा अंगमर्दन या योग पद्धती केल्या, तर तंदरुस्त राहणे निश्चित होते. शिवाय, तुम्हाला कोणत्याही उपकरणांची गरज लागणार नाही. तुम्हाला फक्त जमिनीवर सहा-बाय-सहा फुटांच्या जागेची गरज आहे. तुम्ही खूप तंदरुस्त व्हाल आणि तुमचे स्नायू आणि सर्वकाही करू शकाल. अंगमर्दन आणि उप-योगामध्ये जे सर्व व्यायाम प्रकार आहेत त्यासाठी तुमच्या स्वतःच्या शरीराच्या वजनाचा वापर केला जातो. मग तुम्हाला असे कारण सांगता येणार नाही की आजूबाजूला जिम उपलब्ध नाही. तुम्ही जिथे कुठे असाल, तिथे व्यायाम करू शकता कारण तुमच्याकडे तुमचे शरीर आहे. जिममधील वजन उचलण्याच्या प्रशिक्षणाइतकेच हे शरीरसौष्ठवासाठी प्रभावी आहे. यामुळे तुम्ही समंजस माणसासारखे दिसाल आणि यंत्रणेवर अनावश्यक ताण न देता बलशाली बनाल. फक्त एकच गोष्ट होईल की, यामुळे तुमच्या स्नायूंना उभार येणार नाही. बरेच लोक असे बनले आहेत. त्यांना वाटतं की, ते तंदरुस्त आहेत पण मला वाटते की ते एका साच्यात जखडले गेले आहेत! यंत्रणा योग्य पद्धतीने काम करण्यासाठी फक्त ताकद किंवा स्नायूंचा उभार जरुरीचा नाही तर शरीराची लवचिकता देखील महत्वाची आहे.

योगामध्ये आपण फक्त स्नायूंच्या ताकदीकडे पाहत नाही. अवयवांचे आरोग्य देखील खूप महत्वाचे आहे. योग पद्धती अशी विकसित झाली आहे की, अवयवांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. जरी तुमच्याकडे खूप स्नायू असले तरी, जर तुमचे यकृत व्यवस्थित काम करत नसेल तर काय उपयोग? शरीर लवचिक आणि वापरण्यायोग्य असणे खूप महत्वाचे आहे. अवयव सुखावह असणे देखील महत्वाचे आहे. एक पैलू असा आहे की, शरीरातील बहुतेक महत्वाचे अवयव छाती आणि पोटाच्या भागात असतात. हे अवयव कडक नाहीत, ते खिळे आणि चिमट्यांनी बसवलेले नाहीत. ते अधांतरी असतात. जेव्हा तुम्ही पाठीचा कणा सरळ ठेवून बसता, तेव्हाच तुमचे अवयव जास्तीत जास्त आरामात असतात. आता, आरामाची आधुनिक कल्पना मागे झुकून बसण्याची आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने बसलात, तर तुमचे अवयव कधीही आरामात राहणार नाहीत. ते त्यांना हवे तसे काम करणार नाहीत.

शरीर सरळ ठेवणे हे आम्हाला आराम आवडत नाही म्हणून नाही, तर आम्ही आरामाला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने समजतो आणि अनुभवतो म्हणून आहे. तुम्ही तुमच्या स्नायूंना पाठीचा कणा सरळ ठेवून आरामात राहण्याचे प्रशिक्षण देऊ शकता पण झुकून बसताना तुमच्या अवयवांना आरामात राहण्याचे प्रशिक्षण देऊ शकत नाही. ते करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून आम्ही शरीराला प्रशिक्षण देण्याचे निवडतो, जेणेकरून आपलाहाडांचा सांगाडा आणि स्नायू प्रणाली अशा पद्धतीने बसण्यामुळे आरामात असेल.

योग - अस्तित्व उलगडणे

योग ही तुम्ही बारीक होण्यासाठी किंवा पाठदुखी किंवा डोकेदुखीसाठी करण्याची गोष्ट नाही. निरोगी आणि शांत राहणे हे तसेही घडेल पण हे सारे योगाचे दुय्यम परिणाम आहेत, योगाचे मुख्य ध्येय नाही. वजन कमी करण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी तुम्हाला योग करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त समजूतदारपणे खायला हवे, टेनिस खेळायला हवे किंवा पोहायला हवे. योगाचे ध्येय तुमच्या आत भौतिकतेपलीकडचा एक नवीन पैलू जिवंत करणे हा आहे. जेव्हा तो जिवंत होतो, तेव्हाच हे अस्तित्व हळूहळू तुमच्यासाठी लाखो वेगवेगळ्या मार्गांनी उघडते. ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत असे तुम्हाला कधी वाटले नाही, त्या गोष्टी तुमच्यासाठी जिवंत वास्तव बनतात, कारण भौतिकतेपलीकडचा आयाम जिवंत झाला आहे.


- सद् गुरू
ईशा फाऊंडेशन