चापोलीचा कोटणी नाला

चापोली गावाची जीवनदायिनी असणारा कोटणी नाला वारेमाप जंगलतोड, विदेशी वृक्षांची बेशिस्त लागवड आदी पर्यावरणीय संकटांबरोबर प्रस्तावित कोटणी धरणाच्या विळख्यात सापडलेला आहे, ही चिंतेची बाब आहे.

Story: विचारचक्र |
07th January, 11:43 pm
चापोलीचा कोटणी नाला

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या कक्षेत येणाऱ्या जांबोटी घाटात येणारे चापोली गाव समृद्ध अशा जंगलात वसलेले असल्याकारणा‌ने आणि तेथे ये-जा करण्यासाठी वन खात्याचे निर्बंध असल्याने आज दुर्लक्षित गणलेले आहे. परंतु एकेकाळी खानापूर शहराला पावसाळा ओसरल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापुरातील चंदगड तालुक्याशी जोडण्याची कामगिरी करणारा चापोली गज‌बजलेला होता. जेव्हा सर्वसामान्यांबरोबर व्यापार, उद्योगातील व्यक्ती ये-जा करण्यासाठी घाटमार्गाचा, जलमार्गाचा उपयोग करायचे, तेव्हा चापोलीला महत्त्व लाभले होते. आज चापोली गाव जरी कर्नाटकात असले तरी गोवा कदंब राजवटीत त्याचा समावेश शिवचित्त पेरमाडी देवाच्या राज्यात व्हायचा आणि त्यामुळेच युद्धात मर्दमुकी गाजवणाऱ्या क्षत्रियांची अशा गावात वस्ती भरभराटीला आली होती. चापोलीच्या जंगलात आजही ठिकठिकाणी आढळलेल्या पाषाणी मूर्ती इथल्या शेकडो वर्षांच्या इतिहास आणि संस्कृतीची प्रचिती देत असतात. कुमेरी शेतीद्वारे वरी, कांगो, कुळीथ, नाचणी आदींची पैदासी करणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांच्या पारंपरिक व्यवसायांवर वन खात्याने कायदेशीर निर्बंध घातल्यानंतर इथल्या कष्टकऱ्यांना उपजीविकेचे गावात समर्थ पर्याय नसल्याने त्यांनी पोटापाण्यासाठी अन्यत्र स्थलांतर केलेले आहे आणि आज सण उत्सवांच्या मोजक्याच प्रसंगी तरुणाईची पावले चापोलीकडे वळतात.

घाटमाथ्यावरच्या गोवा कदंब राजकर्त्यांची राजधानी म्हणून खानापूरजवळच्या हळशी शहरात ये-जा करण्यासाठी जे मार्ग अस्तित्वात होते, त्यात जांबोटी घाटातून जाणारा चापोली गवाळीमार्गे हेम्माडगाच्या मोसमी मार्गाचा उपयोग व्हायचा, तेव्हा चापोली गजबजलेली होती. ब्रिटिश अमदानीतही चापोलीत जीपगाडीची ये-जा करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कच्च्या मार्गाचा वापर व्हायचा. आज वन खात्याच्या नाकर्तेपणामुळे तसेच सरकारी यंत्रणेच्या बेपर्वाईमुळे चापोली आणि परिसरातील गावांतील सहावी इयत्तेच्या पुढे शिक्षण घेण्यासाठी जंगली प्राण्यांनी प्रभावित बारा किलोमीटरची पायपीट करावी लागत असते. चापोली-कापोली या गावांबरोबर इथल्या सह्याद्रीत एकेकाळी अस्वले, वनमानव, खवले मांजर, शेकरू, पाखमांजरासारख्या जंगली श्वापदांची लक्षणीय संख्या होती. पट्टेरी वाघांसाठी आवश्यक असणारे तृणहारी प्राणी आणि मुबलक पाणी बारामाही वाहणाऱ्या इथल्या म्हादई नदीत असल्याने वाघांची संख्या चांगली होती. शिकारीची आवड असणाऱ्या नानासाहेब जांबोटकर सरदेसाईंनी पूर्वीच्या काळी वाघांना आपल्या बंदुकी‌द्वारे लक्ष्य ठरवल्याचे संदर्भ ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नोंदीत आढळतात. पट्टेरी वाघांच्या वास्तव्यामुळे जोबोटी घाट आणि परिसरात‌ील जंगल सुरक्षित होते आणि त्यामुळे इथून उगम पावणारे जलस्त्रोत प्रवाहित असायचे. इथल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून येणारे झरे, ओहळ यांचे पाणी वृक्षवेलींबरोबर पशुपक्ष्यांसाठी जीवनाधार ठरले होते. बारामाही वाहणाऱ्या झरे, ओहळातील पाण्यामुळेच चापोलीच्या जंगलातून उगम पावणारा कोटणी नाला या प्रदेशाची शान ठरला होता. चापोली परिसरात असलेल्या जांभ्या द‌गडांच्या पठारांपैकी रूम‌डवन सडा मान्सूनच्या वर्जन्यवृष्टीचे आकंठ प्राशन करून इथल्या ओहळ, नाल्यांत पाण्याचा निरंतर पुरवठा करायचे. ब्रिटिश राजवटीत इमारती बांधकामासाठी वारेमाप जंगलतोड करण्यात आली आणि त्या ठिकाणी युकालिप्टसची (निलगिरी) लागवड करण्यात आल्याने त्याचे दुष्परिणाम इथल्या वन्यजीवांबरोबर पर्यावरणीय परिसंस्थेवर झालेले आहे आणि त्यामु‌ळे कोटणी नाल्याचे गतवैभव लोप पावण्याच्या वाटेवर आहे. चापोलीच्या जंगलात उगम पावणाऱ्या कोटणी नाल्याला या परिसरातील ओहळ, नाले भेटत असल्याने पावसाळी मोसमात त्याचे स्वरूप प्रभावी असते आणि त्यामुळे हा नाला ओलांडून पल्याड जाण्यासाठी साकवांचा आधार घ्यावा लागतो. जांबोटकर सरदेसाई यांच्या संस्थानाचा भाग असलेल्या चापोली गावाला जुन्याकाळी इतिहास आणि संस्कृतीची श्रीमंती लाभली होती. इथल्या जंगलात उपलब्ध असलेल्या मोसमी भाज्या, रसदार जांभळे, हेळू, शिंदीसारखी फळे, कोटणी नाल्याच्या गोड्या पाण्यात वावरणारे मासे, खेकडे आणि कुमेरी शेतीत पिकणारे नाचणी, वरी, पारवड यासारखे अन्न, कोनगी, पोये, सातवीणसारखी मधाची पोळी आदी घटकांमुळे चापोलीतील जनतेचे जगणे सुखदायी होते.

वज्रापोयासारखा बारामाही कोसळणाऱ्या धबधब्यावर जांबोटीहून जंगलवाट तुडवून गेल्यावर चापोली - गवाळी कुशीत त्याचे नयनरम्य दर्शन घडते आणि त्यामुळे डिसेंबर नंतर पदभ्रमणार्थींची पावले चापोलीकडे वळतात. चापोलीतील कोटणी नाल्याचा संगम जेथे होतो, त्या परिसरात ‌कर्नाटक सरकारने म्हादई जलविद्युत निर्मिती प्रकल्पाबरोबर कोटणी धरणाची उभारणी करण्यासाठी गेल्या कित्येक द‌शकांपासून प्रयत्न आरंभलेले आहेत. ८६ मीटर उंच धरणाद्वारे ४२०.५ मिलियन क्यूसेक्स पाण्याचा साठा असलेला जलाशय निर्माण करण्याबरोबर २ x १० मेगावॅट जलविद्युत निर्मित केली जाणार आहे. म्हादई जलविवाद लवादाने जो अंतिम निवाडा दिलेला आहे, त्यात कर्नाटक निरावरी निगम मर्यादितद्वारे पर्यावरणीय आणि अन्य परवाने मिळाल्यानंतर कोटणी प्रकल्पासाठी हिरवा कंदील दाखवले‌ला आहे. कोटणीवर बांधल्या जाणाऱ्या धरणामुळे किरवाळे, कबनाळी आणि कोंगला येथील बरीच जमीन आणि जंगल पाण्याखाली जाणार आहे. कर्नाटक सरकारच्या जलसंसाधन खात्याची बारामाही वाह‌णाऱ्या म्हादई नदीच्या पाण्यावर वक्रदृष्टी असल्यानेच त्यांनी जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या प्रस्तावाला लवादामार्फत मान्यता मिळवलेली आहे.

यदाकदाचित चापोलीत कोटणी धरणाला आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्पाला चालना मिळाली तर त्याचे पर्यावरणीय तसेच सामाजिक दुष्परिणाम या गावाला भोगावे लागणार आहेत. २८८९.५ हेक्टर क्षेत्रफळातील गावात लक्षणीय जंगलाचे नैसर्गिक वैभव असून, आज तेथे १२५ च्या आसपास असणाऱ्या घरांत ६०० च्या आसपास लोकांचे वास्तव्य आहे. जांबोटी ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या चापोलीच्या सीमा ओलमणी, गवसे, कालमणी, कापोली पास्टोली, गवाळी, दारोळी आदी गावांशी भिडत आहेत. चापोली गावाची जीवनदायिनी असणारा कोटणी नाला वारेमाप जंगलतोड, विदेशी वृक्षांची बेशिस्त लागवड आदि पर्यावरणीय संकटांबरोबर प्रस्तावित कोटणी धरणाच्या विळख्यात सापडलेला आहे, ही चिंतेची बाब आहे.


- प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५