सर्दी, खोकला झाला की आजी मधात चिमूटभर हळद किंवा मिरपूड घालून देते आणि मग खोकला कुठल्या कुठे गायब होतो, घश्याला सुद्धा आराम मिळतो. आयुर्वेदात तर कफ कमी करण्यासाठी असलेल्या औषधांमध्ये मध हा सगळ्यात उत्तम उपाय सांगितला आहे. असा हा सर्दी, खोकला कमी करणारा मध.
मधाला संस्कृत भाषेत 'मधु' असे म्हणतात. मधाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
शरीराच्या एखाद्या भागावर जखम झाली असता ती जखम लवकर भरून येण्यासाठी मध लावल्याने फायदा होतो.
मध डोळ्यांसाठी अतिशय उत्तम आहे. दृष्टी सुधारण्यासाठी दिली जाणारी औषधं मधासोबत घ्यायला वैद्य सांगतात. पूर्वी तर मध काजळासारखा डोळ्यात घातला जात असे. पण असा डोळ्यात वापर करण्यासाठी मध उत्तम प्रतीचा व शुद्ध असला पाहिजे.
वजन कमी करण्यासाठी सुद्धा मध उपयोगी आहे.
तुमच्यापैकी जर कोणी गायन करत असतील, तर १ छोटा चमचा शुद्ध मध रोज खाणं तुमच्यासाठी उपयुक्त आहे. मध खाल्ल्याने आवाज सुधारतो.
मध बुद्धी वाढवणारा सुद्धा आहे. तुम्ही जर सुवर्ण प्राशन करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की सुवर्ण प्राशनासाठी दिलेल्या चाटणात मध असतोच.
सर्दी, खोकल्यासाठी दिली जाणारी औषधं बऱ्याचदा मधात कालवून चाटून खायला वैद्य सांगतात. त्यामुळे घश्यात, छातीत अडकलेला कफ सुटायला मदत होते.
मध खाण्याचे काही नियम सुद्धा आहेत बरं का!
मध हा कोणत्याही गरम पदार्थात मिसळून सेवन करू नये. म्हणजेच गरम पाण्यात, गरम चहा, कॉफी यात मध घालू नये. किंवा मध गरम करू नये. तुमची ताई किंवा दादा वजन कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात मध आणि लिंबाचा रस घालून पीत असतील तर त्यांना तसं करायचं नाही हे सांगा.
मध कधीही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाऊ नये.
मध शक्यतो जूना व शुद्ध असलेला वापरावा.
काय मग? आत्ता सुरू असलेल्या थंडीत रोज एक छोटासा चमचा मध खायला हरकत नाही.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य