पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)च्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तूनख्वामधील बाजौर जिल्ह्यातील सालारझाई भागात पाकिस्तानी लष्करी तळावर कब्जा केला. ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी पाकिस्तानी लष्करी तळावर कब्जा केल्याचा दावा 'टीटीपी'ने केला आहे. या भागात दहशतवादी कारवायांमध्ये सातत्याने वाढ होत असून 'एखाद्या देशाचा लष्करी तळ दहशतवाद्यांनी ताब्यात घेणे', ही मोठी घटना मानली जात आहे.
टीटीपीच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कर आणि अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबान सैन्य यांच्यात युद्धासारखी परिस्थितीही निर्माण झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्ताने सीमेवर शस्त्रे आणि सैन्यबळ तैनात केले आहे. पाकिस्तानी लष्कराने एका सादर केलेल्या निवेदनानुसार, पाकिस्तानने १३ टीटीपी दहशतवाद्यांना ठार केले आहे, तर उत्तर वझिरीस्तानमध्ये एका वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यासह अनेक सैनिक मारले गेले आहेत. या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया केवळ बाजौरपुरती मर्यादित नव्हती, तर उत्तर आणि दक्षिण वझिरीस्तानमधील काही जुने लष्करी तळही रिकामे करण्यात आले आहेत आणि सैनिकांना नवीन तळांवर स्थलांतरित करण्यात आले आहे.
अफगाणिस्तानात महिलांच्या हक्कांवर बंदी असताना तालिबान आता त्यांच्या घरातही निर्बंध लादत आहेत. अशातच तालिबानने आणखी एक महिलाविरोधी नवा फतवा जारी केला आहे. त्यानुसार आता याठिकाणी जी काही नवीन घरे बांधली जातील ती खिडक्यांशिवाय बांधली जातील. महिला या खिडक्यांमधून बाहेर पाहतात त्यामुळे नवी घरे खिडक्यांशिवाय बांधली जातील आणि सध्या जी घरे आहेत त्यांच्याही खिडक्या बंद केल्या जातील. कारण स्वयंपाकघरात, अंगणात किंवा विहिरीतील पाणी भरताना महिलांना पाहिल्यास ते अश्लील कृत्य होऊ शकते. तालिबानने मुली आणि महिलांना प्राथमिक शिक्षणानंतरच्या शिक्षणावर बंदी घातली, त्यांना काम करण्यास बंदी घातली आणि त्यांना पार्क आणि स्टेडियममध्ये जाण्यास बंदी घातली. इतकेच नाही तर तालिबानने महिलांना सार्वजनिक ठिकाणी कविता गाण्यासही मनाई केली आहे. तालिबानचे म्हणणे आहे की हा कायदा महिलांना घराबाहेर त्यांचा आवाज आणि शरीर झाकण्याची सक्ती करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या काही स्थानिक रेडिओ आणि दूरचित्रवाणी केंद्रांनीही महिलांच्या आवाजाचे प्रसारण बंद केले आहे.
- गणेशप्रसाद गोगटे