सक्काळी सक्काळी ब्लँकेटमधून बाहेर यावंसंच वाटत नाही इतकी थंडी असते. पण अश्या थंडीत उठून शाळेला जायची मजा ही वेगळीच असते. या थंडीच्या ऋतूला हिवाळा म्हणतात. आणि तुम्हाला माहीत आहे??? सहा ऋतूंपैकी हा सगळ्यात हेल्दी म्हणजेच आरोग्यदायी ऋतू. या दिवसात आपली पचन शक्ती, शारीरिक शक्ती, रोग प्रतिकार शक्ती बॅस्ट असते. आणि त्याचमुळे या दिवसांमध्ये आपण जास्त आजारी पडत नाही.
थंडीत भूक मात्र खूप लागते. म्हणूनच या ऋतूत चांगले पौष्टिक पदार्थ खावे असा आपला आयुर्वेद सांगतो. हे पौष्टिक पदार्थ कोणते ते आपण आज बघू.
आपण जर नीट बघितले तर आपल्या लक्षात येईल, याच थंडीच्या दिवसात विविध गावांमध्ये जत्रा, कालोत्सव इ. साजरा केले जातात व त्यानिमित्ताने घरात गोड पदार्थ जसे की पारंपरिक खिरी, शिरवळ्या व नारळाचा रस, पायस, खतखते असे पदार्थ केले जातात. हे पदार्थ पचायला थोडे कठीण पण भूक भागवणारे आणि ताकद देणारे असतात. शिरवळ्या तुम्ही खाल्ल्या आहेत का कधी? नूडल्सचा हेल्दी प्रकार म्हणजे शिरवळ्या. या तांदळाच्या पिठापासून बनवल्या जातात. आणि नारळाचे दूध, गूळ घालून शिजवले जाते व त्यात वेलची पूड घालून या चविष्ट रसाबरोबर शिरवळ्यांवर ताव मारला जातो. नुसते ओले खोबरे व गूळ घालून सुद्धा या खाता येतात आणि तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर या शिरवळ्यांना कांदा, टोमॅटो, मटर इ. घालून मस्त फोडणी देऊन चटपटीत नूडल्ससुद्धा बनवून खाता येतात आणि गंमत अशी की या तांदळाच्या पिठापासून बनवल्या असल्यामुळे पचायला सोप्या आणि विकतचे नूडल्स खाऊन पोटात चिकटा होतो, शी घट्ट होते, पोटात दुखतं असे त्रास देखील होत नाहीत. नाचणीच्या पिठापासून सुद्धा अश्या शिरवळ्या बनवता येतात. कधी खाल्ल्या नसतील तर या चविष्ट शिरवळ्या आईला - आजीला मुद्दाम बनवून द्यायला सांगा आणि खा.
तसेच या थंडीत
गुळापासून बनवलेले पदार्थ जसे की गूळ पोळी, मूगडाळ हलवा, अळीव लाडू खावे
दूध व दुधाचे पदार्थ - खीर, दही, तूप इ. सुद्धा खाऊ शकता.
गव्हाची चपाती- पुऱ्या - पराठे, वेगवेगळ्या प्रकारच्या गरमा गरम भाकऱ्या, थालीपीठ सुद्धा पौष्टिक आहे.
आवळ्याचे पदार्थ, तीळ - गूळ घातलेले पदार्थ सुद्धा खावेत.
आणि थंडीतही तुम्हाला नीट भूक लागत नसेल, काहीही न खाता पोट टम्म फुगल्यासारखे वाटत असेल तर जेवणाआधी एक पातळ आल्याचा तुकडा थोडेसे सैंधव मीठ लावून चावून चावून खा, असे केल्याने जीभेची रुची वाढून कडकडून भूक लागते.
चला मग... छान छान चविष्ट पदार्थ खाऊन थंडी एन्जॉय करा.
- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य