फातर्पेकरीण देवस्थानने आपण मुस्लिमांना रोखण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट केल्यामुळे इतरांनीही उगाच घाई करून दुसऱ्या धर्मातील लोकांच्या विरोधात निर्णय घेऊ नयेत.
फातर्पा येथील शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थान समितीने गेल्या आठवड्यात मुस्लिम समाजातील दुकानदारांना जत्रोत्सवात दुकान थाटण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोव्यातील अन्य देवस्थानांकडूनही तशा प्रकारचे निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. देवस्थानांच्या महाजनांची डोकी भडकावणारी एक टोळी धर्माची तळी घेऊन पुढे आली आहे. ते गावोगावी फिरून देवस्थानांच्या महाजनांना भेटतात आणि मुस्लिम, ख्रिस्ती समाजातील दुकानदारांना जत्रेत घेऊ नका, असे सांगतात. त्यांचे म्हणणे पटणारे काही साधे धर्मभोळे महाजन नंतर देवस्थानांच्या बैठकीत तसा प्रस्ताव आणतात. कुठलाच विचार न करता तो निर्णय मंजूरही होतो. फातर्पा येथील मंदिराच्या महाजन बैठकीत तसेच झाले असावे. त्या निर्णयानंतर मोठ्या अभिमानाने महाजनांनी निर्णयाविषयी प्रसारमाध्यमांना सांगितले. बातम्या छापून आल्या. प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. ‘गोवन वार्ता’च्या गुरुवार १९ डिसेंबरच्या अंकात या निर्णयाचा समाचार घेणारा ‘देवकार्याच्या साहित्याचे मूळ शोधणार का?’ या मथळ्याचा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. जत्रांमध्ये मुस्लिम दुकानदारांवर बंदी घातली तरी देवासाठी येणाऱ्या साहित्याचे मूळ असो किंवा हिंदूंचे ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाशी असलेले संबंध यांच्या मुळाशी कोण जाणार, असा प्रश्न त्यातून केला होता. गोव्यात शेकडो वर्षांपासून शांती, धार्मिक सलोखा जपला गेला आहे. जत्रा, फेस्त सारख्या उत्सवात दुसऱ्या धर्मियांना मान देण्याची गोव्यात काही ठिकाणी प्रथा आहे. गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असतात. हे प्रयत्न कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून, कधी शिवाजी महाराजांवरील विधानांवरून, कधी सेंट झेवियरवरून तर कधी जत्रांमध्ये दुसऱ्या धर्माच्या लोकांना बंदी घालण्यावरून सुरू असतात. दरवेळी अशा प्रयत्नांना गोव्यातील जनतेने नाकारले आहे. त्यामुळे फातर्पेकरीण देवस्थान समितीने घेतलेला निर्णयही चुकीचा होता, हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले असेल. तिथून सुरू झालेले हे लोण पेडण्यापर्यंत पोहचले आहे. जत्रांचा हंगाम सुरू असल्यामुळे इतरही मोठ्या जत्रांमध्ये ते पोहचणार आहे. ते आताच रोखणे गरजेचे आहे.
राज्य सरकार अशा निर्णयांना पाठबळ देत नाही, ही एक जमेची बाजू आहे. फातर्पेकरीण देवस्थानाच्या निर्णयानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेऊन संयुक्त बैठक बोलावली. मामलेदार, देवस्थान समितीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीत जत्रोत्सवात कोणत्याही धर्मियांवर बंदी घालण्याचा अधिकृत ठराव वा निर्णय झालेला नाही, असे देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्यामुळेच देवस्थान समितीला आपला निर्णय तूर्तास बदलावा लागला. आपल्यावर आलेले दुसऱ्यावर ढकलण्यासाठी देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांतील भूमिका ही त्या महाजनांची वैयक्तिक भूमिका असल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीत समितीच्याच पदाधिकाऱ्यांनी फातर्पेकरीण देवीचा वार्षिक जत्रोत्सव हा अनेक दशकांपासून सांप्रदायिक सलोख्यासाठी ओळखला जातो, विविध धर्म, जातीतले लोक या देवीच्या आशीर्वादासाठी येतात, हेही मान्य केले आहे. हाच साक्षात्कार देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांना व्हायला हवा होता, मात्र त्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना बैठक बोलवावी लागली.
दुसऱ्या धर्मियांना किंवा अन्य जातीतील बांधवांना रोखण्यासाठी कोणीच अशा प्रकारचे निर्णय घेऊ नयेत. धर्मिक स्थळे ही शांततेची प्रतिके व्हावीत, ती समाज दुभंगण्याची केंद्रे होऊ नयेत. गावागावांतील देवस्थाने ही गावातील शांती आणि सलोख्याची केंद्रे असतात. जिथे आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने सर्व धर्मियांना प्रवेश मिळतो. नवे नियम आणले जाऊ नयेत. हा चुकीचा आणि दुर्दैवी पायंडा गोव्यात सुरू होऊ नये. समाजानेही अशा गोष्टींना विरोध करायला हवा. आज धर्माच्या नावाने डोकी भडकवणारेच उद्या उपजातींच्या नावानेही डोकी भडकावण्याचे काम करतील. अशा लोकांचा हेतू साध्य होऊ न देणे, हाच या लोकांवर उपाय आहे. धर्माच्या नावाने एकमेकांमध्ये दरी निर्माण करणाऱ्यांना त्यांचे प्रयत्न करूद्या, पण त्यांच्यासाठी कुठल्याच धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाने आपल्या नियमांमध्ये नको ते बदल करू नयेत. फक्त हिंदू धर्मियांनीच नव्हे तर सर्वच धर्मियांनी तेवढी परिपक्वता दाखवावी. काही ठिकाणी दुसऱ्या धर्मातील लोकांना प्रवेश दिला जात नाही, कपड्यांवरून लोकांना रोखले जाते, महिलांना प्रवेश बंदी केली जाते या सगळ्या गोष्टी सामाजिक भेदभावाच्या आहेत. आपण हे सगळे जेवढे रोखू शकतो, तेवढा प्रयत्न धार्मिक संस्थांनी करण्याची गरज आहे. फातर्पेकरीण देवस्थानने आपण मुस्लिमांना रोखण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट केल्यामुळे इतरांनीही उगाच घाई करून दुसऱ्या धर्मातील लोकांच्या विरोधात निर्णय घेऊ नयेत.