अमेरिकेने नुकतेच तैवानला शस्त्रास्त्रांची विक्री करण्याची आणि अन्य मदत करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला इशारा देत अमेरिकेने आगीशी खेळू नये असे म्हटले आहे. तैवान हा चीनच्या हितसंबंधांचा मुख्य मुद्दा असून, अमेरिकेने चीनबरोबरील संबंधांमध्ये ही सीमारेषा ओलांडू नये, असा सज्जड दम दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, ‘शस्त्रास्त्र विक्रीची घोषणा ‘एक चीन’ तत्त्वाचा आणि अमेरिका-चीन यांच्यातील तीन संयुक्त निवेदनांचा भंग आहे. ही गोष्ट चीनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या हितसंबंधांचे उल्लंघन आहे; तसेच तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देणार नाही, या अमेरिकी नेत्यांच्या वचनांचाही भंग आहे.
तैवानला ५७.१३ कोटी डॉलरची शस्त्रास्त्रे व अन्य लष्करी मदत देण्याची आणि आवश्यक प्रशिक्षण देण्याची घोषणा व्हाइट हाऊसने शुक्रवारी केली होती; तसेच नियंत्रण, दळणवळण व अन्य प्रणालींच्या आधुनिकीकरणासाठीही मदत जाहीर करण्यात आली. तैवानने या मदतीसाठी अमेरिकेचे आभार मानले आहे. मात्र चीनच्या संरक्षण मंत्रालयाने तैवानला केलेली आर्थिक मदत आणि शस्त्र विक्रीचा निषेध केला आहे. चीनच्या लष्करी सुरक्षेच्या विस्ताराबाबत अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा अहवाल सादर करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी चीनने तैवानप्रकरणी अमेरिकेच्या कारवाईवर टीका केली आहे.
चीनने अमेरिकेला तैवानला शस्त्रे पुरवण्याचे थांबवण्याचे आवाहन केले आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या या कृतीमुळे या प्रदेशातील स्थैर्य व शांतता धोक्यात येऊ शकते. चिनी स्टेट काउंसिलच्या प्रवक्त्या झू फेंगलियान यांनीही अमेरिकेच्या या कृतीचा तीव्र विरोध केला आहे. तर दुसऱ्या बाजूला, तैवानने अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अमेरिकेने १९७९ मध्ये चीनसोबत संबंध सुधारले आणि तैवानसोबतच्या राजनैतिक संबंधांना समाप्ती दिली. तरीही, अमेरिकेने चीनच्या विरोधाला डावलून तैवानला शस्त्रे पुरवली आहेत. अमेरिकेनेही ‘वन चायना पॉलिसी’ला समर्थन दिले आहे, पण तैवानच्या मुद्द्यावर त्याची भूमिका साशंक राहिली आहे. १९४० च्या दशकात चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यावर राष्ट्रवादी तैवानमध्ये गेले आणि तिथे लोकशाही सरकार स्थापन केले. चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश समजतो. चीन तैवानच्या हवाई सीमांमध्ये सातत्याने घुसखोरी करत असून, अमेरिकन नौदलाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सैन्य तैनात करत आहे.
- गणेशप्रसाद गोगटे