नाताळ सणाची परंपरा

येशूच्या जन्माने नव्या विचारांची दिशा लाभून भाविकांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधारा लोप पावला. जगण्याला नवे तेज, आत्मबळ लाभल्याची भावना भाविकांत प्रचलित झाली. त्यामुळे नाताळ सणात उत्साहाला उधाण येते.

Story: विचारचक्र |
25th December, 12:01 am
नाताळ सणाची परंपरा

जगाबरोबर भारतातही येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाचा सोहळा नाताळ म्हणून साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताला परमेश्वराचा पुत्र मानून त्याच्यावर अढळ श्रद्धा ठेवणे, हे ख्रिस्ती धर्मीय आपले कर्तव्य मानतात. येशू ख्रिस्ताला सुळावर दिले तरी तो सदासर्वकाळ जिवंत आहे आणि मानवी समाजाच्या मुक्ततेसाठी त्याचे पृथ्वीतलावर आगमन झालेले आहे, अशी ख्रिस्ती समाजाची धारणा आहे. श्रीमंत, गरीब, काळा, गोरा, उच्च, नीच अशी भेदाभेद न मानता, जो आपल्या पापाची कबुली करून त्याबाबत पश्चाताप करतो त्यांचे येशू रक्षण करतो, अशी ख्रिश्चनांची श्रद्धा आहे. देव एकच असला तरी आकाशातील पिता, त्याचा पुत्र येशू व पवित्र आत्मा अशी त्याची तीन रूपे असून, ही तिन्ही रूपे मिळूनच एकच परमेश्वर याचे पालन ख्रिस्ती समाज करतो. परमेश्वर सनातन, स्वयंभू, अनंत असून तोच सृष्टी निर्माता आहे आणि सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आहे, अशी ख्रिश्चनात श्रद्धा आहे. स्वर्गातल्या पवित्र आत्म्याने येशूचा अभिषेक केला म्हणून ग्रीक भाषेत ख्रिस्त शब्द त्याला रूढ झाला आणि त्यामुळेच त्याच्या अनुयायांना ख्रिस्ती म्हटले जाऊ लागले. येशूने ईश्वराला मानवी समाजाचा पिता मानले आणि त्याच्यावर भक्ती करण्याचा संदेश दिला. समस्त मानव ही प्रभूची लेकरे असून, त्यांच्यावर प्रेम करणे हीच खरीखुरी ईशभक्ती मानली.

ख्रिस्ती धर्मात कर्मकांडाऐवजी प्रार्थनेला महत्व असून परमेश्वराच्या अनंत उपकारांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याची प्रार्थना करून, देवाचे राज्य आणि येशूचे पुनरागमन व्हावे, अशी भाविक इच्छा व्यक्त करतात. पॅलेस्टाईनच्या प्रदेशात यहुदीचे वास्तव्य होते. इसवी सनाच्या ६३ वर्षांच्या पूर्वी हा प्रदेश रोमन साम्राज्याखाली आला तेव्हा तेथे यहुदी धर्माला विशेष स्थान राहिले नाही म्हणून तेथील लोक तारणहाराच्या प्रतिक्षेत असताना येरुशलेमजवळच्या बेथलेहम येथे देवदूत गॅब्रियलने मेरीच्या उदरी तेजस्वी देवपुत्राचा जन्म होणार असल्याची सुवार्ता दिली. मेरीचा ज्याच्याशी विवाह ठरला होता त्या योसेफला त्याची कल्पना दिली. हेरोद राजाने आरंभलेल्या जनगणनेत सहभागी होण्यासाठी मेरी आणि योसेफ बेथलेहम येथील माळरानावरच्या गोठ्यात असताना गाई-मेंढ्यांच्या सान्निध्यात रात्री बाराच्या सुमारास येशूचा जन्म झाला तो गवताच्या बिछान्यावर. त्यावेळी आकाशातही तेजस्वी तारा उगवला आणि दिव्य संकेताने त्या ताऱ्याचा शोध घेत आलेल्या पूर्वेकडच्या तीन पंडितांना बाल येशूचे दर्शन झाले. राजांचा राजा येशूच्या जन्माने हेरोद राजाला आपल्या अस्तित्वाला संकटांची भ्रांती निर्माण झाली आणि त्यासाठी त्याने बेथलेहेमव परिसरात जन्माला आलेल्या बालकाची हत्या करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येशूच्या मात्यापित्याने त्याला इजिप्समध्ये सुरक्षित स्थळी हलवण्यात यश मिळवले. कालांतराने येशू जाता जाता मोठा होत गेला तसे त्याने रोग, मृत्यू व पाप यांच्यावर विजय मिळवणारी अद्वितीय शक्ती आप‌ल्या ठायी असून, आपणच ईश्वर असल्याचे प्रतिपादन केले. कर्मकांडांना प्रखर विरोध आरंभला आणि यामुळे रोमन अधिकाऱ्यांनी त्याला पकडून सुळावर दिले.

सुळावर आत्मबलिदान केल्यानंतर तीन दिवसांनी येशूचे पुनरुत्थान झाले आणि त्याने आपल्या शिष्यांना दर्शन दिले. त्यानंतर चाळीस दिवसांनी येशू स्वर्गस्थ झाला. पॉल नामक धर्मोपदे‌शकाने येशूला मसिहा मानून त्याची शिकवण सर्वसामान्यांना देण्यास आरंभ केला. सीरियातील अंटिओख येथे ख्रिस्ती धर्माचे तत्वज्ञान व आचार यांचा प्रचार करण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी रोमन सम्राटाने ख्रिस्ती समाजाची छळवणूक आरंभली. अनुयायांना जीवे मारले, परंतु जेव्हा इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या पूर्वार्धात रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली, तेव्हा ख्रिस्ती धर्माला राजाश्रय लाभला आणि युरोप ख्रिस्ताच्या प्रभावाखाली आला. येशूचा अनुयायी सेंट थॉमस इसवी सनाच्या ५२ साली भारतातील मलाबार प्रांतात आला आणि तेथे त्याने चर्च उभारली. इराण व अशियामायनर येथील धार्मिक छळवादाच्या प्रसंगी ख्रिश्च‌नांना भारतात आश्रय मिळाला. त्यानंतर ख्रिस्ती धर्माचा सक्तीने प्रसार करण्यात पोर्तुगीज सत्ताधिशांसोबत असलेल्या धर्माधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे गोवा, कोचिन, तुतिकोरीन ही ख्रिस्ती धर्मियांची भारतातील महत्त्वाची केंद्रे बनली.

आरोग्य, समाजसेवा, शिक्षण आदी क्षेत्रात ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी प्रवेश करून ब्रिटिश अमदानीत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यात यश मिळवले. आज भारतभरातील ख्रिस्ती समाजासाठी नाताळ सण आनंदाचा सोहळा ठरलेला असून, २४ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता येशूचा जन्मदिवस उत्साहाने साजरा केला जातो. येशूचा जन्म गोठ्यात झाला, त्या घटनेची आठवण ख्रिसमस क्रिब म्हणजे नाताळाच्या गोठ्याद्वारे जागवली जाते. बाराव्या शतकापर्यंत ख्रिस्ती भाविक बेथलेहेमला जाऊन मूळ जन्मस्थानाचे दर्शन घेत होते, परंतु तेराव्या शतकात हा प्रांत मुसलमानांच्या ताब्यात गेल्याने ख्रिस्ती भाविकांना तेथे भेट देणे कठीण बनले, तेव्हा इटलीतील फ्रान्सिस व त्याच्या साथीदारांनी बेथलेहम येथील गोठ्याची प्रतिकृती असिसी येथे बन‌वली आणि तेव्हापासून माता मेरी व बाल येशू यांच्या प्रतिमेसह गोठा उभारण्याची परंपरा लोकप्रिय होत गेली. आदिमानव आदाम व इव्ह यांनी देवाज्ञेचा भंग करून पारादीस बागेतील ज्ञानवृक्षाच्या फळाचा आस्वाद घेतला आणि त्यामुळे त्यांच्या हातून पापकर्म घडले. त्यांच्या पापासाठी आणि समस्त मानवाच्या उत्थानासाठी क्रुसावर आत्मबलिदान केले त्याची स्मृती ख्रिसमस वृक्षाने जागवली जाते.

लॅटिन भाषेतील 'दियेस नातालीस' या लॅटिन शब्दांद्वारे भगवान येशूच्या जन्मदिनाला नाताळ ही संज्ञा लाभली. ज्ञानी लोकांना येशूचरणी नेणाऱ्या ताऱ्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ ख्रिस्ती घरासमोर सुंदर तारा लटकवण्याची परंपरा रूढ झाली. सहा हरणांच्या गाडीतून बालगोपाळांना मिठाई वाटणारा संत निकलस सांताक्लॉजच्या रूपात नाताळाचा आनंद द्विगुणित करतो. येशूच्या जन्माने नव्या विचारांची दिशा लाभून भाविकांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधारा लोप पावला. जगण्याला नवे तेज आणि आत्मबळ लाभल्याची भावना भाविकांत प्रचलित झाली आणि त्यामुळे नाताळाच्या सणात उत्साहाला उधाण येते. देशभर नाताळ साजरा होत असला तरी गोव्यासारखी नाताळाची परंपरा अन्यत्र अभावाने पहायला मिळते.


- प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५