बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग

Story: राज्यरंग |
26th December, 10:25 pm
बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग

विधानसभा निवडणुकीला अद्याप सुमारे दहा महिने असले तरी बिहारमध्ये राजकीय हालचालींना आतापासूनच वेग आला आहे. रालोआचे नेतृत्व विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमारच करतील, असे सध्याचे चित्र आहे. ‘इंडि’ आघाडीत मात्र राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेस यांच्यात आघाडीचे नेतृत्व कोणी करावे यावरून मतभेद समोर येत आहेत. हरियाणा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आघाडीचे नेतृत्व काँग्रेसनेच करावे का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

मागील विधानसभा निवडणूक २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२० या काळात पार पडली होती. राजदने सर्वाधिक ७५, भाजपने ७४, तर नितीश कुमार यांच्या जनता दल (यु)ने ४३ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला फक्त १९ जागांवर समाधान मानावे लागले होते. २४३ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी १२२ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली रालोआचे सरकार राज्याचा कारभार हाकत आहे.

प्रत्येक पक्ष आपली ताकत वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आघाडीतील आपला वाटा वाढवण्यासाठी मित्रपक्षालाच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने बिहारमध्ये जदयूला मोठेपण दिले आहे. जदयूने दिल्ली विधानसभा निवडणुकीतही ५ जागा मागितल्या आहेत. दिल्लीत जदयूने २०१० मध्ये चार उमेदवार उभे केले होते. पैकी तीन उमेदवार विजयी झाले होते. मात्र त्यानंतर सलग दोन निवडणुकांत पक्षाला आपले अस्तित्वही राखता आलेले नाही. जदयूच्या या मागणीमुळे रालोआत मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी इंडि आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या होत्या. त्यांपैकी १९ जागा जिंकल्या. ही पार्श्वभूमी पाहता यावेळी राजद काँग्रेससाठी जास्त जागा सोडेल, अशी स्थिती नाही. लालूंनी ममतांना दिलेला पाठिंबा हेच सूचित करत आहे.

काँग्रेसचे नेते ग्यानराजन गुप्ता यांनी राजदला सुनावले आहे. काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. आम्ही राज्यातील सर्व २४३ मतदारसंघांमध्ये तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाला मोठे होण्याचा अधिकार आहे. मात्र जागावाटप, आघाडी धर्म या गोष्टी चर्चा करण्याच्या आहेत, त्याबाबत माध्यमांशी चर्चा करण्यात काहीही हशील नाही.

राज्यात काँग्रेस आणि राजद पक्षांमध्ये मतभेद आणि दिलजमाई यांचा सिलसिला अनेक दशकांपासून सुरू आहे. प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत रालोआ आणि इंडियाची भूमिका काय राहाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रदीप जोशी