ख्रिसमस आणि क्रिकेटचा इतिहास

Story: क्रीडारंग |
24th December, 05:10 am
ख्रिसमस आणि क्रिकेटचा इतिहास

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याची उत्सुकता अधिक वाढली आहे. जस जसा सामना जवळ येतोय. तसतसे प्रत्येकाला बॉक्सिंग डे टेस्ट असा शब्द ऐकायला मिळत आहे. पण बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे नक्की काय असते? आणि २६ डिसेंबरचे कनेक्शन काय? बॉक्सिंग डे टेस्ट हा शब्द खास करून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या टेस्ट मॅचसाठी संबोधला जातो. वर्षाच्या अखेरीस या तीन संघासोबत खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या टेस्टला बॉक्सिंग डे सामना म्हटले जाते. बॉक्सिंग डे म्हणजे ख्रिसमसच्या पुढचा दिवस. प्रत्येक वर्षी ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियात २६ डिसेंबरपासून एक टेस्ट मॅच खेळवली जाते. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी पहायला मिळते. आंतरराष्ट्रीय स्थरावर पहिला बॉक्सिंग डे टेस्ट १९५० साली खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या अॅशेसच्या सिरीजमध्ये हा सामना खेळला गेला. टीम इंडियाने आत्तापर्यंत ९ बॉक्सिंग डे सामने खेळले आहेत. त्यामध्ये केवळ दोन सामन्यात भारताला विजय प्राप्त झाला. ५ सामन्यांत भारत पराभूत झाला, तर २ सामने अनिर्णित राहिले. भारताने अखेरचा बॉक्सिंग डे सामना २०२२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

मेलबर्नच्या मैदानावर चौथा कसोटी सामना बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून खेळवला जाणार आहे. दरम्यान, बॉक्सिंग डे टेस्टसाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी रोहित शर्मासह विराट कोहली देखील नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. रविवारी आणि सोमवारी भारतीय खेळाडूंनी सरावासाठी मैदानात घाम गाळला. ब्रिस्बेन कसोटीत आपल्या फलंदाजीने भारतासाठी फॉलोऑन टाळणाऱ्या आकाशदीपने देखील फलंदाजीचा सराव केला. यावेळी त्याच्या हाताला दुखापत झाली. सराव सत्रानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने ही दुखापत किरकोळ असल्याचे सांगितले. तो म्हणाला, क्रिकेट खेळताना अशा दुखापती होत असतात. मला वाटते की ज्या खेळपट्टीवर मी सराव केला, ती खेळपट्टी ही पांढऱ्या चेंडूसाठी होती. मात्र, ही दुखापत सामान्य असून कोणतीही गंभीर प्रकारची समस्या नाही. असे त्याने सांगितले. ही कसोटी डब्ल्यूटीसी फायनलसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन्ही कसोटी जिंकाव्या लागणार आहेत.

मेलबर्नमध्ये भारताने १४ कसोटी सामन्यांमध्ये ४ वेळा विजय मिळवला आहे. त्यात १९७७, १९८२, २०१८ आणि २०२० मधील विजयांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघ यजमानांविरुद्ध ८ वेळा पराभूत झाला आहे. येथे भारताचा शेवटचा पराभव २०११ मध्ये झाला होता. २०१४ आणि १९८५ मधील दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले होते.


- प्रवीण साठे, दै. गोवन वार्ताचे उपसंपादक आहेत