देशाला वारंवार आर्थिक संकटातून बाहेर काढणाऱ्या या नेत्याचे नाव सदैव स्मरणात राहणार आहे. काहींची आठवण पुतळे उभारून काढली जाते. डॉ. सिंग यांच्या नेतृत्वगुणांचा पुतळा लाखो लोकांच्या मनात कायम उभा राहणार आहे. देशासाठी त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.
देशाच्या राजकारणात डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी फार महत्त्वाची मानली जाते. काँग्रेसमध्ये सर्वसाधारण नेते असलेले डॉ. सिंग देशाचे एकदा नव्हे तर सलग दोनवेळा म्हणजेच दहा वर्षे यशस्वी पंतप्रधान राहिले. २००४ ते २०१४ हा त्यांच्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ त्यांच्यातील अर्थतज्ज्ञाच्या भूमिकेतून दीर्घकाळ स्मरणात राहील. भलेही त्यांच्यावर विरोधकांनी ते फार बोलत नसल्यामुळे टीका केली, त्यांना मौनी बाबा संबोधून त्यांची खिल्ली उडवली असली तरी ते बोलले ते त्यांच्या कार्यातून, कर्तृत्वातून, धोरणांतून, निर्णयांतून. त्यांच्या नम्र स्वभावामुळेच ते देशाच्या राजकारणात आदराचे नेते बनले. त्यांच्यावर आरोपही करताना विरोधकांना शंभरवेळा विचार करण्याची वेळ आली. कुठलाच बडेजावपणा नाही. स्वच्छ प्रतिमेच्या या नेत्याने देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांना श्वसनाच्या त्रासामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. देश एका अभ्यासू, गुणसंपन्न राजकारण्यासह एका अर्थतज्ज्ञाला मुकला आहे. आपल्या कामाप्रती प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, ज्ञानसमृद्ध आणि प्रगल्भ विचारधारा असलेले नेते म्हणून त्यांची जगभरात ख्याती होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक आर्थिक सुधारणा केल्या, प्रगती साधली. डॉ. सिंग १९८२ ते १९८५ या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यानंतर नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष अर्थात मंडळाचे नेतृत्वच त्यांनी केले. वेगवेगळ्या पदांवर काम केलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांचा राजकारणातला प्रवेशही आश्चर्यकारक आहे. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना अचानक देशाच्या अर्थमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात बोलावले. तेथूनच त्यांची राजकारणातली भूमिका सुरू झाली. त्यांच्या अर्थमंत्रिपदाच्या कार्यकाळात भारताने अनेक ऐतिहासिक, कठोर निर्णय घेतले, जे देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे बदल घडवणारे ठरले. भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या सुधारणा आणि पंतप्रधानपदाचा त्यांचा कार्यकाळ त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि नेतृत्वाचे आदर्श उदाहरण होय. मनमोहन सिंग यांनी १९९१ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक सुधारणा घडवून आणल्या होत्या, ज्यामुळे भारताचे आर्थिक स्वरूप बदलले आणि जागतिक स्तरावर भारताची छाप उमटली. भारताची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडण्याच्या काठावर असताना राव यांनी डॉ. सिंग यांना अर्थमंत्रिपदी आणले होते. त्याचा देशाला मोठा फायदा झाला. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तत्कालीन सरकारने मान्य केल्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था शाबूत राहिली. त्यांचे त्यावेळचे योगदान आजही भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण बाब म्हणून मानली जाते. असा दूरदृष्टी असलेला तज्ज्ञ देशाला अर्थमंत्री म्हणून लाभला आणि त्यांच्या या कर्तृत्वामुळेच पुढे काँग्रेसने त्यांच्याकडे देशाचे नेतृत्व दिले. पंतप्रधान असतानाही त्यांनी कुठल्या जाती, धर्माप्रती किंवा व्यक्तीसाठी पक्षपातीपणा केला नाही. एक तटस्थ आणि देशाला दिशा देणारी विचारसरणी त्यांनी ठेवली. उच्चविद्याविभूषित, नम्र, शांत, संयमी आणि मृदुभाषी नेता म्हणून त्यांची ओळख तयार झाली. कितीही टीका झाली तरी त्यांनी कधीच मनाचा तोल ढळू दिला नाही. साऱ्या गोष्टींकडे त्यांनी संयमाने पाहिले आणि आपल्या कार्यातून त्यांनी प्रत्येक टीकेला उत्तर दिले.
डॉ. मनमोहन सिंग हे काही फक्त प्रभावी आणि सक्षम प्रशासक म्हणूनच नव्हे, तर एक संवेदनशील आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारा नेता म्हणूनही ओळखले गेले. राजकारणात नीतिमूल्यांना पायदळी तुडवणारे नेते पावलोपावली दिसत असताना अलौकिक प्रतिभेचा हा नेता नेहमी पाय जमिनीवर ठेवूनच जगला. आपल्या नेतृत्वाने त्यांनी भारतीयांनाच नव्हे तर जगातील अन्य नेत्यांना, देशांना प्रभावित केले, प्रेरित केले. अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी याहीपलिकडे त्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली ठरले. त्यामागे त्यांची संयमी भूमिका महत्त्वाची होती. त्यांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर काहीजणांनी सिनेमा, पुस्तकांद्वारे त्यांच्या स्वभावाची, नेतृत्वाची चिकित्सा करताना त्यांना चुकीच्या पद्धतीने समोर मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी खरेच मनमोहन सिंग अशा लोकांना कधी कळले नाहीत. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही. देशाला वारंवार आर्थिक संकटातून बाहेर काढणाऱ्या या नेत्याचे नाव सदैव स्मरणात राहणार आहे. काहींची आठवण पुतळे उभारून काढली जाते. डॉ. सिंग यांच्या नेतृत्वगुणांचा पुतळा लाखो लोकांच्या मनात कायम उभा राहणार आहे. देशासाठी त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.