प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरू; राजकीय पडसाद कायम
म्हापसा : जमीन हडप प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्दिकी उर्फ सुलेमानला क्राईम ब्रँचच्या कोठडीतून पलायन करण्यास मदत करणाऱ्या संशयित आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक याची शनिवारी पणजी न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. परंतु, या प्रकरणातील प्रमुख आरोप सिद्दिकी उर्फ सुलेमान अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, सुलेमानच्या पलायन प्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाच्या अधीक्षकांमार्फत चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.
सिद्दिकी उर्फ सुलेमानने अमित नाईक याच्या मदतीने कोठडीतून पलायन केल्याच्या प्रकरणाला आठ दिवस उलटले आहेत. त्याच्या शोधासाठी क्राईम ब्रँच आणि गोवा पोलिसांची दोन पथके कर्नाटक आणि हैदराबादमध्ये तळ ठोकून आहेत. परंतु, सिद्दिकी अजूनही त्यांच्या हाती लागलेला नाही.
सिद्दिकी गेल्या १३ डिसेंबर रोजी आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक याच्या मदतीने क्राईम ब्रँचच्या रायबंदर येथील पोलीस कोठडीतून पसार झाला. अमित नाईक याने त्याला हुबळीत सोडल्याचे नाईक याच्या चौकशीतून समोर आले. त्यानंतर तो हुबळीतून हैदराबादला पोहोचल्याचे उघडकीस आल्यानंतर गोवा पोलिसांनी हुबळीसह हैदराबादमध्ये त्याचा शोध सुरू केला आहे. परंतु, अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यातच अमित नाईक याची न्यायालयाने जामिनावर सुटका केलेली आहे. त्यामुळे पोलीस खात्याने या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या अधीक्षक अर्शी आदिल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून चौकशी सुरू केली आहे.
अधीक्षक आदिल यांनी या प्रकरणात गुन्हा शाखेच्या पोलिसांचीच पडताळणी सुरू केलेली आहे. सिद्दिकीला जमीन हडप प्रकरणातील विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) अटक केली होती. त्यांच्याच पोलीस कोठडीतून तो पसार झाला आहे. असे असतानाही गुन्हे शाखेच्या पोलिसांचीच खात्याने चौकशी सुरू केल्यावरून पोलिसांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमित नाईकने पोलीस कोठडीत असताना फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.