मुख्यमंत्र्यांसह तिन्ही आमदार गोव्यात; प्रवीण आर्लेकर दिल्लीत

राज्य मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात दिल्लीत हालचालींना वेग

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st December, 11:42 pm
मुख्यमंत्र्यांसह तिन्ही आमदार गोव्यात; प्रवीण आर्लेकर दिल्लीत

पणजी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथे घेतलेल्या जीएसटी तसेच अर्थसंकल्पपूर्व बैठकीला उपस्थिती लावून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवारी गोव्यात परतले. त्यांच्यासोबत चार्टर विमानाने राजस्थानला गेलेले आमदार जीत आरोलकर, दाजी साळकर आणि प्रेमेंद्र शेटही दिल्लीत न जाता गोव्यात परतलेले असताना, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर भाजपश्रेष्ठींच्या आदेशानुसार दिल्लीत दाखल झालेले आहेत. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ फेरबदलांबाबत दिल्लीत खलबते सुरू असल्याचे स्पष्ट झाले.      


गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलासह मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होण्याच्या चर्चा सुरू असतानाच काही मंत्री तसेच भाजपचे आमदार दिल्लीत जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या आमंत्रणानुसार काहीच दिवसांपूर्वी आमदार संकल्प आमोणकर, केदार नाईक आणि अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये दिल्लीत पोहोचले. या तीन आमदारांच्या दिल्ली दौऱ्यावरून मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना ऊत आलेला असतानाच, संसदेचे​ कामकाज पाहण्यासाठी आपण त्यांना दिल्लीत बोलावून घेतल्याचे स्पष्टीकरण तानावडे यांनी दिले. त्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजस्थानात आयोजित जीएसटी आणि अर्थसंकल्पपूर्व बैठकीला जात असताना चार्टर विमानाने आपल्यासोबत जीत आरोलकर, दाजी साळकर आणि प्रेमेंद्र शेट यांना सोबत घेतले. या तिन्ही आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री राजस्थानमार्गे दिल्लीला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात होती. आमदार दाजी साळकर यांनी तशी माहिती ‘गोवन वार्ता’शी बोलतानाही दिलेली होती. परंतु, त्याच चार्टर विमानाने मुख्यमंत्री आणि इतर तीन आमदार शनिवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची बैठक राजस्थानमध्येच झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.