सत्तरी : पर्येतील देवस्थानच्या वादाला हिंसक वळण

जमावाकडून दगडफेक : उपनिरीक्षकासह काही पोलीस जखमी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st December, 12:34 am
सत्तरी : पर्येतील देवस्थानच्या वादाला हिंसक वळण

वाळपई : पर्ये येथील भूमिका देवस्थानशी संलग्न असलेल्या साखळेश्वर देवस्थानच्या वर्धापनदिनी धार्मिक विधी करण्यावरून झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. शुक्रवारी रात्री उशिरा माजिक महाजन गटाच्या लोकांनी देवस्थानासमोर जमून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अटकाव केल्यामुळे संतापलेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक करून रोष व्यक्त केला. यात काही पोलीस जखमी झाल्याने पोलिसांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. जमावावर नियंत्रण आणण्यासाठी आणखी पोलीस कुमक मागविण्यात आली होती.


साखळेश्वर देवस्थानचा वर्धापनदिन सर्व १२ महाजनांनी करावा, असा आदेश सत्तरी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही माजिक गटाने शुक्रवारी पहाटे ५ वाजता हा विधी केल्यामुळे वादाची ठिणगी पडली. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी करीत अन्य गावकर मंडळींनी सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा इशारा दिला. उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांना बोलावून घेतले. त्यानंतर एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात सहदेव वासू माजिक, शांबा अर्जुन माजिक, पांडुरंग माजिक, अजय म्हसकर यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यावर गावकर मंडळींनी तिथून जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर २४ पर्यंत भूमिका देवस्थान बंद करण्याचा आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला. 


भूमिका देवस्थान २४ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिल्यामुळे २१ रोजी धार्मिक सप्ताह व २२ रोजी गवळण काला होणार नसल्याचे निश्चित झाले. यानंतर माजिक महाजन गटाचे लोक संतप्त बनले व त्यांनी सायंकाळी मंदिराच्या आवारात जमून आक्रमकपणे आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या. मंदिर बंद ठेवण्याच्या आदेशासह चौघांविरोधात नोंद केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी साखळी-केरी हा बेळगाव येथे जाणारा महामार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. काहींनी या महामार्गावर आग पेटवून वाहने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सदर प्रयत्न हाणून पाडला.

जमावापुढे पोलीस हतबल            

मंदिर २४ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याने तसेच मंदिराच्या आवारात पोलीस फौजफाटा तैनात केल्यामुळे संतापलेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. सुमारे ५०० लोकांच्या जमावापुढे पोलिसांचा टिकाव लागला नाही. एका उपनिरीक्षकासह काही पोलिसांना इजा झाल्यामुळे पोलिसांनी काढता पाय घेत सुरक्षित स्थळी आसरा घेतला. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री उशिरा आणखी पोलीस कुमक मागविण्यात आली.

यापूर्वी तुळशी वृंदावनावरून झाला होता वाद   

दोन महिन्यांपूर्वी भूमिका देवस्थानच्या प्रांगणामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या तुळशी वृंदावनाच्या उद्घाटनावरून हा वाद विकोपास गेला होता आता साखळेश्वर देवस्थान येथील वर्धापन दिनावरून पुन्हा वाद निर्माण झाला. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून सर्व बारा महाजनांनी एकत्र येऊन वर्धापन दिन साजरा करावा, असा तोंडी आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी १९ डिसेंबर रोजी दिला होता.