तापमान वाढीचा काजू, आंबा उत्पादनांना फटका शक्य

आयसीएआर वैज्ञानिकांची माहिती : काजू मोहोराला ‘टी मॉस्क्युटो’चा, तर आंब्याला ‘मँगो हॉपर’चा धोका


30th December 2024, 12:51 am
तापमान वाढीचा काजू, आंबा उत्पादनांना फटका शक्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दमट हवामान आणि तापमानात वाढ झाल्याने काजूच्या मोहोराला ‘टी मॉस्क्युटो’, तर आंब्याच्या मोहोराला ‘मँगो हॉपर’ किटाणूची लागण होऊन नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही किडीमुळे मोहाेर जळून तो खराब होतो, अशी माहिती आयसीएआरचे वैज्ञानिक डॉ. ए. आर. देसाई यांनी दिली.


टी मॉस्क्युटो किडीमुळे काजू पिकाचे झालेले नुकसान. (संग्रहित)
डॉ. ए. आर. देसाई पुढे म्हणाले की, डिसेंबर, जानेवारी हे थंडीचे महिने आहेत. या महिन्यांत चांगली थंडी पडली तर आंबा, काजू पिकांचा मोहोर फुलतो. तापमान वाढले किंवा दमट हवामानामुळे कीड तयार होऊन मोहोर काळा पडून तो खराब होतो. डिसेंबरच्या सुरुवातीला थंडी पडली, मात्र काही दिवसांनंतर तापमान वाढू लागले. मधेमधे दमट हवामान असते. रात्री दव पडते. तापमान वाढणे वा दव पडणे हे आंबा, कांजू मोहोरांना मारक ठरते. तापमान वाढले तर ‘टी मॉस्क्युटो’ कीड तयार होऊन ती काजू मोहोरातील रस चोखते. त्यामुळे मोहोर काळा पडतो. आंब्याच्या मोहोराला ‘मँगो हॉपर’ नावाची कीड लागते. ही कीड आंब्याच्या मोहोरातील रस चोखते. थंडी पडली आणि तापमान कमी झाले नाही तर ही कीड पडण्याची शक्यता नसते. त्यामुळे डिसेंबरमध्ये तापमान वाढणे आंबा तसेच काजू पिकांसाठी मारक ठरते.


‘मँगो हॉपर’ किडीमुळे आंब्याच्या झाडाचे झालेले नुकसान. (संग्रहित)
डिसेंबर व जानेवारीच्या सुरुवातीला थंडी पडली तर मोहोर फुलतो. त्यानंतर तापमान वाढू लागले तर मोहोराला फळधारणा होते. त्यामुळे योग्य वेळी थंडी पडणे आणि नंतर तापमान वाढणे आवश्यक असते. यंदा नोव्हेंबरमध्ये आवश्यक त्या प्रमाणात थंडी पडली नाही. डिसेंबरातील मोहोर टिकला तर मार्चपर्यंत आंब्याचे उत्पादन मिळणे शक्य असते. नाहीतर दुसरा मोहोर येऊन फलधारणा होण्यास उशीर होतो. बदलत्या हवामानामुळे आंबा तसेच काजू शेतकरी चिंतेत आहेत.
राज्यात दरवर्षी २५ ते २६ हजार टन काजू उत्पादन
गोव्यात दरवर्षी सरासरी २५ ते २६ हजार टन काजूचे पीक होते. मार्च आणि एप्रिल महिना काजूचा हंंगाम तेजीत असतो. २०२४ साली खराब हवामानाचा फटका काजू पिकाला बसला. सरासरीच्या ७० टक्केच काजूचे उत्पादन मिळाले. यंदा पाऊस पडलेला नाही. सांंगे, धारबांंदोडा, डिचोली, सत्तरी तालुक्यांतील बरेच शेतकरी काजू पिकावर अवलंबून आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात थंडी पडायला सुरू होते. त्यामुळे काजू झाडाला मोहोर फुलतो. आता मात्र मोहोर काळा पडू लागला आहे. पहिला मोहोर खराब झाल्यास दुसरा मोहोर येण्यास उशीर होतो. त्यामुळे उत्पादन कमी होते, तसेच ते उशिरा येते, अशी माहिती काजू बागायतदार माधव सहकारी यांनी दिली.
तिसवाडी, सासष्टीत आंब्याचे पीक अधिक
राज्यात आंब्याचे पीक उशिरा येते. फेब्रुवारी/मार्च महिन्यांत बाहेरील हापूस अांबा येतो. मार्चअखेरीस गोव्यातील माणकुराचा घमघमाट बाजारात येतो. आंब्याचा पहिला मोहोर करपला तर दुसऱ्या मोहोराची वाट पहावी लागते. त्यामुळे माणकूर, मांंगेलाल, साकरी हे आंबे बाजारात येण्याला आणखी उशीर होतो. तिसवाडी, सासष्टी तालुक्यांत आंब्याचे पीक अधिक येते. आंब्यापेक्षा काजू उत्पादनांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.