राज्यात वाहतूक पोलिसांनी राबविल्या विशेष मोहिमा
पणजी : राज्यातील वाढते अपघाती मृत्यू आणि वाहतुकीत शिस्त येण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वर्षभरात वेगवेगळ्या विशेष मोहिमा राबवल्यात. याचा भाग म्हणून वाहतूक पोलिसांनी राज्यात २०२४ मध्ये दारू पिऊन वाहने चालविल्यामुळे ५,४३८ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. ही आकडेवारी पाहिल्यास दिवसा सरासरी १४ जण दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे समोर आले आहे.
राज्यात १ जानेवारी ते २६ डिसेंबर २०२४ या कालावधीत २,६४० अपघातांची नोंद झाली आहे. २५६ भीषण अपघातांत २७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच कालावधीत २०२३ मध्ये २,७९५ अपघात झाले होते. त्यांतील २५५ भीषण अपघातांत २७५ जणांचा बळी गेला होता. ही आकडेवारीवरून दररोज सरासरी ७ अपघात, तर ३२ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात आणि अपघाती मृत्यू होत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस विभागांना विशेष मोहीम सुरू करून कारवाई करण्याचे निर्देश वेळोवेळी दिले जात आहेत. यात प्रामुख्याने मद्यपी चालक, अतिवेगाने वाहन हाकणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्ट न घालणे, वाहनांना काळ्या काचा लावणे अशा प्रकारांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली आहे. या समितीने वाहतूक नियम न पाळणाऱ्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार, गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने मद्यपी वाहन चालकाचे परवाने जप्त करून ते तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यासाठी संबंधित वाहतूक खात्यात पाठविले आहेत.
मद्यपींवरील कारवाईत तीन पटीने वाढ
राज्यात वाहतूक पोलीस विभागाने मद्यपी चालकांवर कारवाई केली आहे. त्यानुसार, २०२४ मध्ये ५,४३८ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तर गेल्या वर्षी २०२३ मध्ये १,८०७ जणांवर कारवाई केली होती. २०२३ मधील कारवाईची तुलना केली असता, यंदा त्यात तीन पटीने वाढ झाली आहे.