गोवेकरांनी गुगलवर शोधले 'आयएसएल', 'बेकरी', 'सर्व्हायकल कॅन्सर'

‘गुगल सर्च’मध्ये गोव्याची छाप : विविध विभागांतील यादीत राज्याचे मोठे योगदान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd January, 12:02 am
गोवेकरांनी गुगलवर शोधले 'आयएसएल', 'बेकरी', 'सर्व्हायकल कॅन्सर'

पिनाक कल्लोळी
गोवन वार्ता
पणजी : गुगल सर्च इंजिनने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान देशभरात शोधण्यात आलेल्या शब्दांची माहिती जारी केली आहे. यानुसार गोवेकरांनी गुगलवर एका वर्षात आयएसएल, बेकरी, सर्व्हिकल कॅन्सर (गर्भाशयाचा कर्करोग), आंबा लोणचे रेसिपी, ऑल आईज ऑन राफा असे विविध शब्द शोधले. अन्य राज्यांच्या तुलनेत लोकसंख्या कमी असूनही मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही गोव्याने गुगल सर्चमध्ये आपली छाप पाडली आहे.
यंदाच्या विविध विभागातील ‘टॉप टेन’ शोधल्या गेलेल्या शब्दांच्या यादीत गोव्याचे भरीव योगदान आहे. यावर्षी ‘इंडियन प्रीमयर लीग’ हा शब्द देशातून सर्वाधिक वेळेस शोधण्यात आला. हा शब्द शोधण्यात गोवा देशात दहाव्या क्रमांकावर आहे. याशिवाय टी-२० वर्ल्ड कप, इलेक्शन रिझल्ट २०२४, ऑलिंपिक २०२४, रतन टाटा असे शब्द ट्रेण्डिंग होते. हे शब्द शोधण्यात गोवा देशात सातव्या स्थानी राहिला.
रेसिपी विभागात देशभरातून आंब्याच्या लोणच्याची रेसिपी दुसऱ्या क्रमांकवर शोधली गेली. याबाबत अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक सर्च गोव्यातून झाले आहेत. 'नियर मी' या विभागात बेस्ट बेकरी आणि राम मंदिर हे शब्द शोधण्यात गोवा देशात पहिल्या स्थानी राहिला. गोव्यातील फुटबॉल प्रेम सर्वश्रुत आहे. यामुळेच इंडियन सुपर लीग (आयएसएल) शोधण्यात आले आहे. तर गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जाणून घेण्यासाठी सर्व्हिकल कॅन्सर शब्द शोधण्यात आला.
गुगल सर्च इंजिनतर्फे दरवर्षी प्रत्येक देशातून, प्रांतातून तसेच राज्यांतून कोणता शब्द सर्वाधिक शोधला गेला याची माहिती जाहीर करण्यात येते. यामध्ये चित्रपट, बातमी, पाककला, टीव्ही किंवा वेब सिरीज, एखद्या गोष्टीचा अर्थ, गाणी, पर्यटन स्थळ, क्रीडा, नियर मी असे विविध उपविभाग असतात. या ट्रेंडच्या माहितीवरून विशिष्ट विभागातील व्यक्तींना कोणत्या गोष्टींमध्ये सर्वाधिक रस आहे हे समजून घेता येणे शक्य असते.
‘मटका' सर्चमध्ये गोवा अव्वल
गुगल ट्रेंडनुसार ‘मटका' शब्द सर्च करण्यात गोवा देशात अव्वल ठरला आहे. तर ‘अकाय’ या नावाचा अर्थ शोधण्यात दुसऱ्या स्थानी राहिला. तसेच गोव्यातून गोवा, इंडिया, सट्टा, कल्याण, आयपीएल, व्हॉट्स अॅप, वेदर हे शब्दही अधिक शोधण्यात आले.
ट्रॅव्हल सर्च मध्ये ‘साऊथ गोवा' दहाव्या स्थानी
गेल्या वर्षभरात देशभरातून ट्रॅव्हल डेस्टीनेशनसाठी म्हणजेच पर्यटनाबाबत विविध ठिकाणे शोधण्यात आली. यामध्ये साऊथ गोवा दहाव्या स्थानी आहे. या यादीत अझरबैजान, बाली, मनाली, कझाकस्थान, जयपूर यांचा समावेश आहे.