राज्यात गतवर्षी ९२ जणांचा बुडून मृत्यू

अग्निशामक दलाला वर्षभरात १४८ कॉल, ५ जणांना जीवदान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd January, 12:33 am
राज्यात गतवर्षी ९२ जणांचा बुडून मृत्यू

पणजी : राज्यात समुद्र, नदी किंवा अन्य पाणथळ ठिकाणी बुडून मरण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान ९२ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये आत्महत्या केलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. यातील सर्वाधिक १३ घटना पणजी आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. वरील कालावधीत अग्निशामक दलाला बुडणाऱ्या ५ व्यक्तींना वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात मागील वर्षभरात वरील कालावधीत अग्निशामक दलाला बुडण्याच्या घटनांबाबत १४८ कॉल आले होते. यामध्ये ९२ जणांचा बुडून मृत्यू झाला तसेच पाण्यात पडलेल्या ५ जनावरांना वाचवण्यात देखील अग्निशामक दलाला यश आले होते. 'अग्निशामक'कडे आलेल्या एकूण कॉलपैकी पणजीनंतर सावर्डे येथून १०, जूने गोवेतून ७, मडगावातून ६, लोटली, म्हापसा, केपे, मुळगाव येथून बुडण्यासंबंधी प्रत्येकी ४ कॉल आले होते.
यानंतर काणकोण, कांदोळी, चिंचणी, कुठ्ठाळी, कुडचडे पेन्हा दी फ्रांका आणि ताळगाव येथून प्रत्येकी ३ कॉल आले होते. तर हळदोणे, हणजूण, असोळना, बाणावली, कळंगुट येथे बुडून मृत्यू पावण्याच्या प्रत्येकी २ घटनांची नोंद झाली आहे. फेब्रुवारी ते मे या उन्हाळी महिन्यात पोहायला गेलेल्या २७ जणांचा बुडून मृत्यू झाला होता.
८० टक्के मृत्यू बुडून                        

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या  माहितीनुसार, मागील वर्षी राज्यात विविध आपत्कालीन परिस्थितीत ११४ जणांना मृत्यू आला होता. यातील ९२ म्हणजेच ८०.७० टक्के मृत्यू हे बुडून झाले होते.