राज्यात आजपासून थंडीची शक्यता

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पारा ३५ अंशांवर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd January, 12:13 am
राज्यात आजपासून थंडीची शक्यता

पणजी : राज्यात २ ते ७ जानेवारी दरम्यान वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान काही ठिकाणी धुके पडणार असून थंडीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २ ते ४ जानेवारी दरम्यान वाऱ्याचा वेगही ताशी ३५ ते ५५ किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
दरम्यान, नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील पारा ३५ अंशांच्यावर गेला होता. बुधवारी मुरगाव येथे कमाल ३५.४, तर पणजीत ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील सहा दिवस कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी या दरम्यान किमान तापमान देखील २० अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या स्वयंचलित केंद्राच्या नोंदीनुसार मोपा येथील कमाल तापमान ३४.३ अंश, तर पेडण्यातील ३३.३ अंश, तसेच साळगाव येथील ३६ अंश सेल्सिअस होते. बुधवारी पणजीत किमान तापमान २२ अंश, तर मुरगावमध्ये किमान २२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. म्हापसा येथे १९.७ अंश, तर साळगाव येथे २१.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.