मन की बात भाग : ११७ | संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक : पंतप्रधान मोदी

मन की बातच्या आजच्या भागात पंतप्रधान मोदींनी शेतकरी, कॅन्सर आणि एआय यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th December 2024, 04:08 pm
मन की बात  भाग : ११७ |  संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या त्यांच्या कार्यक्रमाच्या ११७ व्या भागात संपूर्ण देशाला संबोधित केले. २६ जानेवारी २०२५ रोजी देशात संविधान लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच देशाचे हे संविधान आपल्याला प्रत्येक मार्गावर मार्गदर्शन करत आहे असे ते यावेळी म्हणाले. संविधानाने प्रदान केलेल्या अधिकारांमुळेच मी तुमच्याशी बोलू शकतो असेही ते म्हणाले. मन की बातच्या आजच्या भागात पंतप्रधान मोदींनी शेतकरी, कॅन्सर आणि एआय यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

संविधान दिनासंदर्भात काय म्हणाले मोदी  :

 वर्षभर चालणाऱ्या अनेक उपक्रमांना २६ नोव्हेंबरच्या संविधान दिनापासून सुरुवात झाली आहे. संविधानाच्या वारशाशी नागरिकांना जोडण्यासाठी constition75.com नावाची वेबसाइटही तयार करण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही संविधानाची प्रस्तावना वाचून तुमचा व्हिडिओ अपलोड करू शकता. वेगवेगळ्या भाषांमध्ये संविधान वाचू शकतो, संविधानाबद्दल प्रश्नही विचारू शकता असे यावेळी मोदी म्हणाले.

महाकुंभ संदर्भात काय म्हणाले मोदी  :

पुढील महिन्यात १३ तारखेपासून प्रयागराज येथे महाकुंभ होणार आहे. संगम काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे.  कुंभ कार्यक्रमात प्रथमच अल चॅटबॉटचा वापर केला जाणार आहे. याद्वारे कुंभशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती तब्बल ११ भारतीय भाषांमध्ये मिळू शकते. यासह, कोणीही मजकूर टाइप करून किंवा बोलून कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतो.

जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट संदर्भात काय म्हणाले मोदी :

जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच WAVES समिट पुढील वर्षी देशात प्रथमच आयोजित करण्यात येणार आहे. WAVES समिटसाठी जगभरातून मीडिया आणि मनोरंजन जगतातील अनेक मान्यवर लोक भारतात येणार आहेत. भारताला जागतिक सामग्री निर्मितीचे केंद्र बनवण्याच्या दिशेने ही शिखर परिषद एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे

चित्रपट क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींसंदर्भात काय म्हणाले मोदी :

 राज कपूर यांनी चित्रपटांद्वारे जगाला भारताच्या सॉफ्ट पॉवरची ओळख करून दिली. रफी साहेबांच्या आवाजात अशी जादू होती जी प्रत्येकाच्या हृदयाला भिडली. भक्तिगीते असोत, रोमँटिक गाणी असोत की वीरह गीते असोत त्यांनी प्रत्येक भावना आपल्या आवाजाने जिवंत केल्या. अक्किनेनी नागेश्वर राव गारु यांनी तेलुगू सिनेमाला नव्या उंचीवर नेले. त्यांच्या चित्रपटांनी भारतीय परंपरा आणि मूल्ये उत्तम प्रकारे मांडली. तपन सिन्हा यांच्या चित्रपटांनी समाजाला एक नवी दृष्टी दिली.

बस्तर ऑलिम्पिक संदर्भात काय म्हणाले मोदी :

बस्तरमध्ये अनोखे ऑलिम्पिक सुरू झाले आहे. प्रथमच बस्तर ऑलिम्पिक आयोजित केल्याने बस्तरमध्ये एका नवीन क्रांतीचा जन्म होत आहे. बस्तर हे एकेकाळी माओवादी हिंसाचाराचे साक्षीदार होते. या भागात अशाप्रकारची अभिनव कल्पना सत्यात उतरावी हे स्तुत्य आहे. ‘फॉरेस्ट बफेलो’ आणि ‘पहारी मैना’ हे याचे  शुभंकर आहे. यातून बस्तरची समृद्ध संस्कृती प्रतिबिंबित होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बूथ कार्यकर्त्यांसह  मन की बातचा कार्यक्रम पाहिला. पंतप्रधानांनी मन की बातच्या आपल्या संबोधनात गोव्यात मागेच पार पडलेल्या ईफ्फी चित्रपट महोत्सवातील भारत है हम या माहितीपटाचा उल्लेख केला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती मुलांपर्यंत पोहचावी यासाठी स्वातंत्र्यसैनिकांवर केंद्रित असलेल्या ॲनिमेटेड मालिकेचे १ डिसेंबरपासून दूरदर्शन, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि WAVES यासह विविध प्लॅटफॉर्मवर प्रक्षेपण करण्यात येत आहे. भारतीय ॲनिमेशन उद्योगाचे समर्थ्यही यामाध्यमातून प्रदर्शित होत आहे असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले होते.  मन की बातचा हा २०२४चा शेवटचा भाग होता.