राजधानीत पार्किंगचे नियम धाब्यावर!

विविध मार्गांवरील वाहतूक कोंडीत वाढ; स्थानिकांसह वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th December 2024, 12:31 am
राजधानीत पार्किंगचे नियम धाब्यावर!

एकीकडे सुरू असलेले स्मार्ट सिटीचे काम तर दुसरीकडे पार्क केलेली वाहने. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत राजधानी पणजीतील अनेक भागांमध्ये विविध प्रकारची कामे सुरू असतानाच, पणजीत येणाऱ्या वाहन चालकांकडून पार्किंगच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा मोठा फटका स्थानिक जनता आणि इतर वाहन चालकांना बसत आहे.
राज्याची राजधानी असलेल्या पणजीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी गेल्या सुमारे दोन वर्षांपासून पणजीत विविध कामे सुरू आहेत. त्यासाठी अनेक भागांतील रस्त्यांची खोदाई करण्यात आलेली आहे. या कामांमुळे विविध भागांतील वाहतुकीवर परिणाम झालेला असतानाच, कामांनिमित्त पणजीत येणाऱ्या स्थानिक तसेच पर्यटनानिमित्त गोव्यात आलेल्या विविध राज्यांतील पर्यटकांनीही पणजीतील पा​र्किंगच्या नियमांकडे पूर्णपणे कानाडोळा केलेला आहे. त्यामुळे पणजीतील वाहतूक कोंडीत प्रत्येक दिवशी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
पणजीतील १८ जून, दयानंद बांदोडकर आदी मार्गांवरून दिवसभर वाहनांची रहदारी​ सुरू असते. या मार्गांवर चारचाकी पार्क करण्यासाठी जागा निश्चित करून दिलेली असतानाही अनेक वाहन चालक भररस्त्यात वाहने पार्क करीत असल्यामुळे या मार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे इतर वाहन चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वाहतूक पोलिसांचे लक्ष पर्यटकांवर
पर्यटन हंगाम असल्यामुळे राज्यात यंदाही मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक दाखल झालेले आहेत. त्यामुळे पोलीस खात्याने पणजीत सर्वत्रच वाहतूक पोलिसांच्या नेमणुका केलेल्या आहेत. परंतु, हे वाहतूक पोलीस दिवस-रात्र केवळ पर्यटकांवर लक्ष ठेवून आहेत. पणजीतील बेशिस्त पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याकडे ते दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहन चालकांकडून त्यांच्याप्रती रोष व्यक्त करण्यात येत आहे.