आगशीत भरधाव थार बनली काळ

दोन स्कूटरना धडक : एकाचा जागीच मृत्यू; थार चालकाला अटक


30th December 2024, 12:59 am
आगशीत भरधाव थार बनली काळ

अपघातात थार जीपखाली सापडलेली दुचाकी.

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. रस्त्यांवर वाहनाची वर्दळ वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी आगशी येथे भरधाव थारने दोन दुचाकींना ठोकरले.  यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. थार चालकाला पोलिसांनी अटक केली. गंभीर जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
‍आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगशी बाजारात रविवारी सायं. ६ वा. थार जीप आणि दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर, हवालदार सुनील मुळगावकर व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. थार जीपीच्या खाली दोन दुचाकी सापडल्या होत्या. जमलेल्या नागरिकांनी जीपखाली सापडले दुचाकी चालक राजेश देविदास नाईक (३९, वरुणापुरी-वास्को), त्यांच्या पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाला बाहेर काढले. राजेश नाईक यांचा जागीच मृत्यू झाल्याचे १०८ रुग्णवाहिकेतील डाॅक्टरांनी घोषित केले. पत्नी आणि मुलाला गोमेकॉत दाखल करण्यात आले. मुलाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली. हवालदार सुनील मुळगावकर यांनी पंचनामा केला. उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर यांनी थार जीप चालक विल्सन आरावजो (सांताक्रूझ) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
थार जीप कुठ्ठाळीहून पिलारच्या दिशेने येत होती. आगशी बाजारात जीप चुकीच्या दिशेने घेत पार्क केलेल्या दोन दुचाकींना धडक दिली. राजेश नाईक कुटुंबीयांसह दुचाकीवर थांबले होते. थार जीपने धडक दिल्यामुळे त्यांची आणि आणखी एक दुचाकी जीपखाली सापडली. त्यात राजेश नाईक ठार झाले.