गोवा पोलिसांत सहा नवी अधीक्षक पदे

वित्त खात्याची मंजुरी : पुढील महिन्यातील मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Story: प्रसाद शेट काणकाेणकर |
30th December 2024, 05:38 am
गोवा पोलिसांत सहा नवी अधीक्षक पदे


गोवन वार्ता
पणजी : गोवा पोलीस खात्यात नवीन सहा वरिष्ठ श्रेणी अधिकारी तथा अधीक्षक पदे तयार केली आहेत. यासाठी वित्त खात्याने मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीत पोलीस खात्यात २२ अधीक्षक पदे आहेत. वरील पदे मिळून २८ पोलीस अधीक्षक पदे होणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कार्मिक खात्याने २६ मे २०२२ रोजी अधिसूचना जारी करून गोवा पोलीस खात्यासाठी वरिष्ठ श्रेणी (अधीक्षक) आणि कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या (उपअधीक्षक) बढतीसाठी गोवा पोलीस सेवा नियमावली २०२२ रोजी लागू केली. त्यानुसार, वरिष्ठ श्रेणी तथा अधीक्षक पदासाठी २२ पदे तयार केली आहेत. त्यात अधीक्षक - विशेष विभाग, अधीक्षक - पोलीस मुख्यालय, अधीक्षक - अमली पदार्थ विरोधी पथक (एएनसी), प्राचार्य - पोलीस प्रशिक्षण शाळा, अधीक्षक - गुन्हे शाखा, अधीक्षक -सुरक्षा, डेप्युटी कमांडंट जनरल होमगार्ड आणि उपसंचालक नागरी संरक्षण, अधीक्षक - भ्रष्टाचार विरोधी पथक (एसीबी), अधीक्षक - किनारी सुरक्षा पोलीस, अधीक्षक - राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, अधीक्षक - कायदा व दक्षता विभाग, अधीक्षक- दहशतवादी विरोधी पथक(एटीएस), अधीक्षक - आर्थिक गुन्हा विभाग (ईओसी) असे प्रत्येकी एक मिळून १३ पदे आणि डेप्युटी कमांडंट - भारतीय राखीव दल (आयआरबी)ची नऊ पदे मिळून २२ पदांचा समावेश आहे. तर, आता पोलीस खात्याच्या मागणीनुसार, प्रशासकीय सुधारणा खात्याने (एआरडी) सहा अधीक्षक पदे तयार केली आहेत. त्याला वित्त खात्याने मंजुरीही दिली आहे. दरम्यान, तयार करण्यात आलेली पदे पोलीस खात्यात कार्यरत असून त्यावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. मात्र, वरील पदे तयार करण्यात आलेली नाहीत तसेच त्या पदांना मंजुरी नाही. त्यामुळे त्या पदावर कार्यरत असलेले अधिकारी मंजुरी असलेल्या पदाचे वेतन घेत आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कार्मिक खात्याकडून पोलीस अधीक्षकांच्या ६ पदांसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.


मंजूर केलेली नवीन अधीक्षक पदे
पोलीस अधीक्षक - कोकण रेल्वे
पोलीस अधीक्षक - पर्यटन पोलीस
पोलीस अधीक्षक - विशेष विभाग
पोलीस अधीक्षक - मोटार वाहन विभाग
पोलीस अधीक्षक - बिनतारी संदेश
पोलीस अधीक्षक - पिंक फोर्स
पोलीस अधीक्षक - मानवी तस्करी विरोधी पथक
सध्या १२ पोलीस अधीक्षक कार्यरत
पोलीस खात्यात सद्यस्थितीत गोवा पोलीस सेवेचे (जीपीएस) १२ पोलीस अधीक्षक कार्यरत आहेत. तर, वरील पदे मिळल्यानंतर खात्यात २८ अधीक्षक पदे होणार आहेत. त्यामुळे १६ पदे रिक्त राहणार आहेत. त्यात पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे, एडविन कुलासो, नेल्सन आल्बुकर्क, सुचिता देसाई, एझिल्डा डिसोझा, सुनीता सावंत, राजेंद्र राऊत देसाई, धर्मेश आंगले, किरण पौडवाल, प्रबोध शिरवईकर, हरीश मडकईकर आणि संतोष देसाई यांचा समावेश आहे.
सध्या २९ पोलीस उपअधीक्षक कार्यरत
पोलीस खात्यात सध्या पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर, सलीम शेख, विल्सन्स डिसोझा, फ्रान्सिस कॉर्त, रॉय पेरेरा, नोलास्को रापोझ, ब्रांझ मिनेझिस, नूतन वेर्णेकर, गुरुदास कदम, सिद्धांत शिरोडकर, जीवबा दळवी, राजन निगळ्ये, राजेंद्र प्रभूदेसाई, नेर्लोन आल्बुकर्क, आशिष शिरोडकर, प्रवीणकुमार वस्त, सागर एकोस्कर, राजेश कुमार, तुषार वेर्णेकर, विश्वेश कर्पे, सुदेश नार्वेकर, सूरज हळर्णकर, सुदेश नाईक, रूपेंद्र शेटगावकर, नीलेश राणे आणि शिवराम वायंगणकर आहेत. तर भारतीय राखीव दलाचे अमित बोरकर आणि नरेश मांगडकर यांचाही समावेश आहे.
पुढील वर्षात दोन अधिकारी होणार निवृत्त
२०२५ मध्ये गोवा पोलीस खात्यातील वरीष्ठ श्रेणी तथा अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क २८ फेब्रुवारी २०२५ रोजी तर कनिष्ठ श्रेणी तथा उपअधीक्षक संदेश चोडणकर ३० जून २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत.