हृदयविकाराच्यावेळी ठरणार उपयुक्त : सार्वजनिक आरोग्य कायद्यात बदल
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : निवासी प्रकल्पात हृदयविकाराचा झटका आल्यावर प्रथमोपचार म्हणून वापरले जाणारे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) उपकरण बसवणे आवश्यक करण्यात आले आहे. पन्नासहून अधिक फ्लॅट असणाऱ्या निवासी प्रकल्पांना एईडी बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. उपकरण इमारतीमधील सर्व रहिवाशांना सहज उपलब्ध होईल, अशा ठिकाणी बसवणे गरजेचे आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य कायद्यातील बदल नुकतेच अधिसूचित करण्यात आले आहेत. याशिवाय येथे राहणाऱ्या २५ टक्के रहिवाशांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक करण्यात आले आहे. यामध्ये कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) प्रशिक्षण तसेच ‘एईडी’ उपकरणाच्या वापराचे प्रशिक्षण यांचा समावेश आहे. प्रशिक्षणातून एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास किंवा अन्य कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत त्या व्यक्तीचे जीवन वाचवण्याची माहिती मिळणे, हे अपेक्षित आहे.
असे प्रशिक्षण सरकारी मान्यता असणाऱ्या संस्थेकडून घ्यावे लागणार आहे. अशा गृह प्रकल्पांच्या सूचना फलकावर हृदयाशी संबंधित वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आल्यास कोणती आणि कशी प्रक्रिया करावी याची माहिती लावणे आवश्यक आहे. या प्रक्रियेची माहिती सूचना फलकावर सर्वांना स्पष्टपणे आणि सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
व्यावसायिक अास्थापनांनाही ‘एईडी’ बसवण्याची सूचना
गेल्या काही वर्षात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी 'एईडी' उपकरण उपयुक्त ठरते. याचा विचार करून मागील वर्षी नगरनियोजन खात्याच्या बैठकीत निवासी प्रकल्पात एईडी उपकरण लावण्याबाबत निर्णय झाला होता. यानुसार नव्या बांधकाम प्रकल्पांना परवाना देताना असे उपकरण असणे आवश्यक करण्यात आले आहे. याआधी आरोग्य खात्याने व्यावसायिक अास्थापनांना एईडी उपकरण बसवण्याची सूचना केली होती.