पुस्तकांमुळेच नैराश्यातून बाहेर पडलो : गोविंद गावडे

मध्यवर्ती ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन


20 hours ago
पुस्तकांमुळेच नैराश्यातून बाहेर पडलो : गोविंद गावडे

पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे. सोबत इतर. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राजकारणात आलो तेव्हा काही काळ मला नैराश्य आले होते. विविध पुस्तकांचे वाचन केल्यानेच मी नैराश्यातून बाहेर पडलो, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले. शुक्रवारी खात्यातर्फे मध्यवर्ती ग्रंथालयात आयोजित पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खात्याचे संचालक सगुण वेळीप, डॉ. सुशांत तांडेल, सुभाष वेलिंगकर व अन्य उपस्थित होते.
गावडे पुढे म्हणाले की, मी राजकारणात आलो तेव्हा सुरुवातीचे काही दिवस गोष्टी मनाप्रमाणे घडत नव्हत्या. यामुळे मला निराशा आली होते. त्यावेळी मला एका परिचिताने अब्राहम लिंकन यांचे आत्मचरित्र वाचण्याचा सल्ला दिला. ते व अशी विविध पुस्तके वाचल्यानंतर मला प्रेरणा मिळाली. यामुळेच मला नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडण्याची शक्ती मिळाली. यानंतर माझ्यात आत्मविश्वास आला. त्यामुळे मी कोणत्याही राजकीय पक्षासमोर मान झाली न घालता राजकारणात यशस्वी झालो.
ते म्हणाले, सध्याच्या काळात तणावमुक्तीसाठी वाचन हा एक चांगला उपाय आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके न वाचता अावांतर वाचन करणे आवश्यक आहे. पुढील दहा वर्षांत पुस्तकांच्या वाचनातून ज्ञान प्राप्त होईल. पुस्तकांमुळे आपण घरी बसून जगाचा प्रवास करू शकतो. कोणतेही वाचन किंवा ज्ञान हे कधीच वाया जात नसते. त्याची फळे मिळण्यासाठी आपल्याकडे केवळ संयम हवा.
सगुण वेळीप यांनी सांगितले की, हे प्रदर्शन २० ते २३ डिसेंबर दरम्यान ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी ८ ते सायं. ७ दरम्यान सुरू असेल. यामध्ये देशभरातील ४८ पुस्तक विक्री करणाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. प्रदर्शनाशिवाय येथे विद्यार्थ्यांसाठी योग, कॅलिग्राफी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, चर्चासत्रे, करियर मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुस्तकांनी मस्तक सुधारते. सुधारलेले मस्तक कधीच झुकत नाही. मस्तक सरळ असेल तर अन्य गोष्टीही साध्य होतात. पुस्तकांमुळे आपल्याला ताठ मानेने जगण्याची प्रेरणा मिळते.
_ गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री