सांगे पोलीस स्थानकासाठी लवकरच नवी इमारत

पोलीस महासंचालक : काही जणांच्या गैरप्रकारांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळते


20 hours ago
सांगे पोलीस स्थानकासाठी लवकरच नवी इमारत

उत्कृष्ट पोलीस स्थानकाचा प्रथम क्रमांक पटकावलेल्या वास्को पोलिसांसोबत पोलीस महासंचालक अलोक कुमार व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी.  (नारायण पिसुर्लेकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : वर्षभरात पिंक पोलीस दलाने ९,५०० कॉल हाताळण्यासह संकटात सापडलेल्या महिलांची मदत केली आहे. गोवा पोलिसांच्या तपासाचे प्रमाण ८८.३८ टक्के आहे. सांगे पोलीस ठाण्यासाठी वर्षभरात नवी इमारत उभारली जाईल. चोडण आणि केरी येथे पोलीस चौकीसाठी इमारत बांधण्यात येईल, असे प्रतिपादन पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी केले.
पोलीस मुख्यालयात शुक्रवारी पोलीस स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्तम कामगिरी बजावलेल्या पोलिसांचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यात पोलीस म्हासंचालक अलोक कुमार यांनी पोलीस खात्याच्या कामगिरीचा आढावा घेतला. या वर्षी पोलीस खात्यात निर्माण होणाऱ्या मूलभूत सुविधांची माहिती त्यांनी दिली.
काही पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन अयोग्य असते, त्यांचा गैरप्रकारांत हात असतो. अशा कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळते. योग्य वर्तणुकीसह प्रत्येकाने जबाबदारीने आणि जनतेला न्याय देण्याच्या नजरेतून सेवा देण्याची गरज आहे. गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांनी सर्वांच्या कामांवर लक्ष ठेवले पाहिजे, असा सल्लाही महासंचालकांनी दिला.
पोलीसांना सुविधा देण्यासह बढती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदा ३०२ कर्मचाऱ्यांना बढती मिळाली. केपे, मायणा कुडतरी, फातोर्डा पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतींची कामे सुरू आहेत. येत्या वर्षात पोलीस मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे काम सुरू होईल. यासाठी सरकारने ४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यावर्षी सांगे पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे काम सुरू होईल. तसेच चोडण आणि केरी येथे पोलीस स्थानकासाठी नवी इमारत बांधली जाईल. आल्तिनो येथे पोलिसांसाठी नवी निवासी इमारत उभारली जाईल. सध्याच्या पोलीस मुख्यालयात प्रशासकीया विभागासाठी नवी इमारत बांधली जाईल, अशी माहितीही पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली.
वाहतूक नियमभंग; २९ कोटींचा दंड वसूल
अमलीपदार्थ विरोधी कायद्याखाली (एनडीपीएस) १५४ गुन्ह्यांची नोंद होऊन १७८ जणांना अटक करण्यात आली. एकूण ९ कोटींचा २५५ किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आला. वर्षभरात वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल ४,९१,७९६ गुन्ह्यांची नोंद झाली. २९,२८,१२,४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वर्षभरात ३६,८०५ विद्यार्थी तसेच ४३,७३६ चालकांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्यात आले. सायबर गुन्हे शाखेने १५ गुन्ह्यांचा तपास करून ३८ आरोपींना अटक केली. सायबर गुन्ह्यांविषयी जागृती कार्यक्रम पार पडले.