तुळशीदास गावस पदावर कायम : पंचाने बाउन्सरसोबत प्रवेश केल्यामुळे वातावरण तंग
ग्रामस्थांनी पंच बाळा शेटकर यांच्या कारभोवती घातलेला घेराव. (निवृत्ती शिरोडकर)
पेडणे : चांदेल-हसापूर सरपंच तुळशीदास गावस यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला.
चांदेल-हसापूर सरपंच तुळशीदास गावस यांच्यावर उपसरपंच रुचीरा मळीक, पंच बाळा शेटकर व पंच प्रजय मळीक यांनी अविश्वास ठराव आणला होता. त्या अविश्वास ठरावावर २० रोजी पंचायत कार्यालयात विशेष पंचायत मंडळाची बैठक बोलावली होती. त्यावेळी उपसरपंच रुचीरा मळीक व पंच प्रजय मळीक उपस्थित होते. मात्र पंच बाळा शेटकर हे चार-पाच बाऊन्सर घेऊन एका वाहनातून पंचायत कार्यालयात येताच उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना रोखले. ग्रामस्थांनीच बाळा शेटकर यांना पंचायत कार्यालयात येण्यापूर्वीच रोखून त्यांना वाहनातून परस्पर घरी पाठवले. त्यामुळे अविश्वास ठराव बारगळला.
उपसरपंच रुचीरा मळीक आणि प्रजय मळीक यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले, सरपंच तुळशीदास गावस यांच्यावर कसलाच रोष नाही. आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सांगण्यावरूनच अविश्वास ठराव आणण्यात आला होता.
चांदेल-हसापूर सरपंच तुळशीदास गावस हे दोन वर्षांपूर्वी पूर्ण पंचायत मंडळ सोबत आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक घेऊन अडीच वर्षासाठी सरपंच झाले होते. त्यानंतर पुढची अडीच वर्षे प्रजय मळीक यांना संधी मिळणार असा अलिखित करार झाला होता. त्यानुसार अडीच वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच सहा महिन्या अगोदर सरपंच गावस यांच्यावर उपसरपंच रुचीरा मळीक, पंच प्रजय मळीक व पंच बाळा शेटकर यांनी अविश्वास ठरावा दाखल केला.
सरपंच तुळशीदास गावस यांच्या विरोधात मागच्या दहा दिवसांपूर्वी अविश्वास ठराव आणला होता. त्यात उपसरपंच रुचीरा मळीक पंच प्रजय मळीक व पंच बाळा शेटकर यांनी गोवा मुक्ती दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यावरही बहिष्कार घातला होता. आणि हे तिन्ही पंच सदस्य गावात उपस्थित नव्हते. मात्र २० रोजी ज्यावेळी अविश्वास ठरावावर चर्चा आणि पंचायत मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी एका वाहनातून तिन्ही पंच सदस्य पंचायत कार्यालयात आले. परंतु बाळा शेटकर हे सोबत चार-पाच बाऊन्सर घेऊन आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थांनी त्यांना बाउंसरसह परस्पर त्यांच्या घरी पाठवले. त्यांना पंचायत कार्यालयात येण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे दोन पंच सदस्य उपस्थित असल्यामुळे हा अविश्वास ठराव बारगळला.
पंच प्रजय मळीक यांनी सांगितले, आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अविश्वास ठराव आणायला सांगितला. त्यानुसार आम्ही तो ठराव आणला. भविष्यात आम्ही सर्व पंचमंडळी एकत्रित राहणार आहोत.
यावेळी चांदेल-हसापूर गावचे ग्रामस्थ सरपंच तुळशीदास गावस यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. शिवाय मांद्रेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच अमित सावंत, जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर, कोरगावचे सरपंच अब्दुल करीम नाईक, उपसरपंच जाधव, पेडणेच्या माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर, माजी नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, पोरस्कडे सरपंच निशा हळदणकर, गावातील पंच सदस्य, नागरिक यावेळी उपस्थित होते.
उपसरपंच, पंचांचा सरपंचांना पाठिंबा
अविश्वास ठराव आणलेल्या उपसरपंच रुचीरा मळीक व प्रजय मळीक यांनी सरपंच तुळशीदास गावस यांच्यासोबत उपस्थित राहून छायाचित्र घेतले आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करत सरपंच तुळशीदास गावस यांनीही आपण सहा महिन्यानंतर सरपंच पदाचा राजीनामा देऊन पंच प्रजय मळीक यांना संधी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र शेवटपर्यंत पंच बाळा शेटकर पंचायत कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत.
अविश्वास ठराव का आणला, हे जनतेला माहित आहे. परंतु भविष्यात आपल्याला अडीच वर्षाचा सरपंच कार्यकाळ हा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अलिखित करारानुसार दिला होता. आपण अडीच वर्षे सरपंच पदावर राहणार असून पुढील सरपंच म्हणून प्रजय मळीक यांना संधी देणार आहे.
तुळशीदास गावस, सरपंच, चांदेल-हसापूर