सं​विधानात काँग्रेसकडून गरज नसतानाही अनेक दुरुस्त्या

सदानंद शेट तानावडे : विरोधकांमुळेच संसदेचे कामकाज ठप्प झाल्याची टीका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13 hours ago
सं​विधानात काँग्रेसकडून गरज नसतानाही अनेक दुरुस्त्या

पणजी : केंद्रात सत्तेत असताना काँग्रेसने भारतीय संविधानात ७७ वेळा दुरुस्ती केली. त्यातील अनेक दुरुस्त्या गरज नसतानाही करण्यात आल्या. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात स्थापन झाल्यानंतर दहा वर्षांच्या काळात जनतेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या केवळ बाराच दुरुस्त्या संविधानात करण्यात आल्या. यातून संविधानाचे खरे शत्रू कोण हे जनतेने शोधावे, असे आवाहन राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी शनिवारी केले.
पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आमदार दयानंद सोपटे यावेळी उपस्थित होते. केंद्रात सत्तेत असताना काँग्रेसने संविधानात वारंवार बदल करून संविधानाचा अपमान केला. तीच काँग्रेस आता भाजपला दोष देत आहे. परंतु, काँग्रेसने तब्बल ७७ वेळा घटनेत बदल केला. काहीवेळा गरज नसतानाही दुरुस्त्या करण्यात आल्या. पण, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात स्थापन झाल्यानंतर भारतीय जनतेला आवश्यक अशाच केवळ १२ दुरुस्त्या घटनेत करण्यात आल्या, असे तानावडे यांनी स्पष्ट केले.
संसद अधिवेशनातून देशभरातील जनतेचे अनेक प्रश्न, समस्या सुटत असतात. त्यामुळे अधिवेशन निश्चित काळापर्यंत सुरू राहणे महत्त्वाचे असते. पण, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी काही विषयांवरून संसदेत गदारोळ माजवल्याने अनेक प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही. गोव्याच्या अनुषंगाने आपण अनेक लेखी प्रश्न राज्यसभेत उपस्थित केले. त्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

एसटी आरक्षणावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा
गोव्यातील एसटी आरक्षण विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात संमत झाले असते. परंतु, विरोधी काँग्रेसने काही विषयांवरून सभागृहात गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे या विधेयकावर लोकसभेत पुढील चर्चा झाली नाही. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विधेयकावर चर्चा होऊन संसदेच्या दोन्ही सभागृहांत या विधेयकांना मान्यता मिळेल, असेही सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

मुस्लिमांच्या स्टॉल्स बंदीबाबत माहिती घेऊनच बोलेन!
संपूर्ण देशाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या गोव्यातील फातर्पेकरीण जत्रोत्सवात मुस्लिमांच्या स्टॉल्सना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गोव्याची बदनामी होणार नाही का असा प्रश्न विचारला असता, या विषयाची पूर्ण माहिती आपण करून घेतलेली नाही. याबाबतची माहिती मिळाल्यानंतरच आपण त्यावर बोलू, असे तानावडे यांनी सांगितले.