सत्तरी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश मागे
वाळपई : पर्ये देवस्थान मंदिर बंद करणे व १४४ कलम लावण्यासह माजिक महाजन गटाच्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्यानंतर शुक्रवारी रात्रभर सुमारे १ हजार सेवेकरी महाजनानी याला जोरदार विरोध केला. यानंतर सत्तरी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश मागे घेतला. यामुळे शनिवारी पारंपरिक सप्ताह साजरा करण्यात आला.
कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे उत्सव शांततेत पार पाडला. सध्या पर्ये देवस्थानच्या सभोवताली भागामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री ठिकठिकाणी अडथळे निर्माण करून बंद करण्यात आलेला गोवा चोर्ला महामार्ग उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपला आदेश मागे घेतल्यानंतर खुला करण्यात आला.
उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना दिले होते. त्यानुसार एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे शनिवारी साजरा होणारा पारंपरिक सप्ताह व रविवारी साजरा होणारा पारंपरिक गवळण काला यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पर्ये देवस्थान परिसरामध्ये १४३ कलम लावले होते व २४ डिसेंबरपर्यंत देवस्थान बंद करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला गावकर समाज वगळता इतरांनी जोरदार विरोध केला होता.
सध्य पर्ये भागातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. कोणताही गोंधळ झालेला नाही. पारंपरिक सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी भाग घेतला, अशी माहिती जीवबा दळवी यांनी दिली.
साखळी-चोर्ला महामार्ग दुपारी केला खुला
शुक्रवारी रात्री उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी साखळी-चोर्ला महामार्ग पर्ये या ठिकाणी रोखून धरला होता. यामुळे वाहतूक होंडा मार्गे मोर्ले केरी अशी वळविण्यात आली होती. शनिवारी दुपारी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश मागे घेतल्यानंतर महामार्ग खुला करण्यात आला.